शंभराच्या नोटा तुम्ही मला आणा राया!

चिडचिड होतेय नुसती चिडचिड. वैताऽऽग!

कारण माझ्याकडे सुट्टे पैसे नाहीत. गेल्या दोन महिन्यांपासून माझा नवरा मला घरखर्चासाठी जे पैसे देतो, त्या चक्क हजाराच्या नोटा असतात! का, तर म्हणे मला ATM मधे जाण्याची तसदी पडू नये म्हणून. अरे पण राव, तुझ्या त्या हजाराच्या नोटा रोज-रोज कुठे चालवू मी? हजाराच्या नोटा देतो आणि माझ्याकडे काय पन्नास शंभरच्या नोटा असतील, त्या मागून घेतो. रोज टॅक्सीला द्यायला लागतात म्हणे! आणि मला नाही का लागत? कैच्याकै! आता या हजाराच्या नोटा जर सुट्ट्या करून मिळत नसतील तर मला बॅंकेत हे पैसे भरून मग ATM मधून थोडे थोडे पैसे काढणं क्रमप्राप्त आहे ना? हा द्राविडी प्राणायाम झाला की नाही? पण नाही, माझ्या सरळसोट आयुष्यात थोडी हलचल पैदा केल्याशिवाय नवरोबाला चैनच पडत नाही.

१६ डिसेंबर, एक अविस्मरणीय दिवस!

सहसाच असा एखादा भारतीय सापडेल, ज्याला या दिवसाचं ऐतिहासिक महत्त्व ठाऊक नसेल. १६ डिसेंबर १९७१ या दिवशी पाकिस्तानने भारतापुढे शरणागती पत्करली. स्वतंत्र बांगला देशची निर्मिती झाली आणि तो दिवस आपण आज विजय दिन म्हणून साजरा करतो.


गेल्या वर्षी शिवाजी पार्कवर भारतीय सेनेतर्फे आयोजित केला गेलेला विजय दिन सोहळा पाहाण्यासाठी मी देखील गेले होते. आपल्या सेनेचं कर्तृत्व पाहून खूप खूप अभिमान वाटला. गर्वाने मान आणखी ताठ झाली. असं वाटू लागलं की सगळ्या जगाला सांगावं, "कुणाची हिम्मत आहे मझ्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहाण्याची? पाहाताय ना आमचं सैन्य?"