बायकांवरचे विनोद

आज एक नवीन प्रकार पाहिला. एक बाईच बायकांवर जोक्स करतायंत. टिपिकल पुरूषी जोक... बायको हा प्राणी, बायकोची बडबड, बायको माहेर गेली हे सुदैव वगैरे वगैरे. असले विनोद करून आपण स्त्री म्हणून स्वत:चाच दर्जा कमी करून घेत आहोत, हे त्या बाईंना कळत नसेल का? की पुरूषांच्या नजरेत आपण एक आधुनिक स्त्री आहोत हे दिसण्याची ही केविलवाणी धडपड आहे?

साधारण दोन वर्षांपूर्वी असल्या जोक्सचं फेसबुकवर पिक आलं होतं. अजूनही असे विनोद वाचायला मिळतात पण प्रमाण फारच कमी झालं आहे. पण त्यावेळेस ते विनोद वाचून अक्षरश: उबग यायचा. मित्रयादीमधील बरेचसे पुरूष स्त्री जातीवर विनोद करायचे. मग त्याला इतर पुरूषांचा हास्यास्पद प्रतिसाद, समदु:खी आहोत वगैरेचं रडगाणं. काही बायकादेखील खिदळत प्रतिसाद द्यायच्या.

रामायण: विचारमंथन भाग २

राम-रावण युद्धानंतर सीतेचा स्वीकार रामाने करण्यास नकार दिला व तिने अग्निपरीक्षा देऊन आपले पावित्र्य सिद्ध केले. या प्रसंगी - "जर माझ्या पावित्र्यावर विश्वास नव्हता तर रावणाच्या तावडीतून मला कशाला सोडवलेत", असा प्रश्न करणार्‍या सीतेला राम उत्तर देतो की "एखाद्या इच्छेविरूद्ध बळाचा वापर करून पळवून नेलेल्या स्त्रीची सुटका करणे हे माझे कर्तव्य आहे". हीच समज राम अग्निपरीक्षेच्या बाबतीत का दाखवत नाही? जर कुठल्याही पुरूषाने एका स्त्रीशी तिच्या इच्छेविरूद्ध किंवा बळाचा वापर करून शरिरसंबंध प्रस्थापित केले, तर दोष त्या स्त्रीला दिला जाऊ नये ही गोष्ट राम जाणत नसेल का?

रामायण: विचारमंथन भाग १


सीता. हे नाव उच्चारलं की आठवते ती रामाची पत्नी, एक पतिव्रता स्त्री, आपलं पावित्र्य सिद्ध करण्याकरता जिला वारंवार अग्निदिव्यातून जावं लागलं. जनकराजाची ही मानलेली मुलगी. तिचा जन्मच मुळी गूढ. जनकराजाला जमीन नांगरताना एक पेटीत सापडलेली ही मुलगी. कुणी म्हणतं की ती पद्माक्ष नावाच्या राजाची कन्या तर कुणी म्हणतं ती रावणाचीच कन्या. पण तिच्या कुंडलीतील अशुभ योगांमुळे रावणाने मंदोदरीला तिचा त्याग करण्यास सांगितलं. तिचे माता-पिता कुणीही असोत पण महाराजा जनक व महाराणी सुनयना यांनी सीतेला आपली मुलगी मानून तिचे पालन पोषण करतानाच तिच्यावर उत्तम असे संस्कार केले होते, याची प्रचिती आपल्याला रामायणातील अनेक प्रसंगांमधून येते. सीतेच्या शारिरीक बळाची कल्पना आपल्याला तिच्या आयुष्यातील केवळ एका प्रसंगातून दाखविण्यात आली आहे, याच प्रसंगामुळे जनकराजाला सीतेशी विवाह करण्यायोग्य वर मिळावा म्हणून एक पण ठेवावा लागला. जनकराजापाशी असलेलं शिवधनुष्य, जे केवळ उचलण्यासाठी शंभर माणसांचे बळ लागत असे, अशा जड शिवधनुष्याचा घोडा करून सीता आपल्या बालपणी खेळत असे. सीतेसारख्या सुकुमार वाटणा-या स्त्रीचे हे बाहूबल पाहूनच जनकराजाने तिला वीर्यशुल्का घोषित केले होते. अर्थात, सीतेला प्राप्त करण्यासाठी जो आपले बाहूबल सिद्ध करील, सीता त्यालाच वरील. यानंतरची रामाने प्रत्यंचा लावते वेळेस शिवधनुष्य मोडल्याची कथा तर सर्वांना माहितच आहे.

सू, सू, सू आ गया, मै क्या करू?


मुसळधार पावसामध्ये एक काकू हातात दोन पिशव्या घेऊन भिजत चालल्या होत्या. त्यांनी स्वत:हून "मला जरा तुझ्या छत्रीत घेतेस का दहा मिनिटं?" अशी विनंती केली. यात मी नाकारण्यासारखं काहीच नव्हतंच. रस्त्यावर कोणतंही वाहन थांबायला तयारच नव्हतं. त्यांचं घर आल्यावर त्यांनी मला "अच्छा" केलं. मी त्यांच्या घरचं टॉयलेट मला पाच मिनिटांसाठी वापरता येईल का, अशी विनंती केली. कारण मला आणखी बरंच पुढे चालत जायचं होतं. त्या काकूंनी माझी विनंती साफ धुडकावली. वर जाता-जाता म्हणाल्या, "हल्ली कुणाचा भरवसा देता येत नाही नं, काय करू गं. सॉरी हं."