28 October 2014

सू, सू, सू आ गया, मै क्या करू?

मुसळधार पावसामध्ये एक काकू हातात दोन पिशव्या घेऊन भिजत चालल्या होत्या. त्यांनी स्वत:हून "मला जरा तुझ्या छत्रीत घेतेस का दहा मिनिटं?" अशी विनंती केली. यात मी नाकारण्यासारखं काहीच नव्हतंच. रस्त्यावर कोणतंही वाहन थांबायला तयारच नव्हतं. त्यांचं घर आल्यावर त्यांनी मला "अच्छा" केलं. मी त्यांच्या घरचं टॉयलेट मला पाच मिनिटांसाठी वापरता येईल का, अशी विनंती केली. कारण मला आणखी बरंच पुढे चालत जायचं होतं. त्या काकूंनी माझी विनंती साफ धुडकावली. वर जाता-जाता म्हणाल्या, "हल्ली कुणाचा भरवसा देता येत नाही नं, काय करू गं. सॉरी हं."

मला आश्चर्य वाटलं. कोणत्या भरवशावर त्या गेली पंधरा मिनिटे माझ्या छत्रीमधून निर्जन रस्त्यावर चालल्या होत्या? मला अक्षरश: रडकुंडीला आल्यासारखं झालं होतं. मुसळधार पावसामुळे रस्ता निर्जन असला तरी आडोसा कुठेच नव्हता म्हणून मी रस्त्यावर बसण्याचा मार्ग निवडला नाही पण पोटात खूप दुखायला लागलं होतं. शेवटी आणखी दहा मिनिटांनी जेव्हा मी इच्छित स्थळी पोहोचले, तेव्हा आधी तिथलं टॉयलेट गाठलं. टॉयलेट स्वच्छ, अस्वच्छ याच्याशी देणंघेणं असावं अशी परिस्थितीच नव्हती ती.

जर एखादी स्त्री रस्त्याच्या कडेला बसून लघवी करत असेल, तर बघणार्‍यांचा दृष्टीकोन निरनिराळा असू शकतो. अगदी "फालतूच असेल" पासून "बिच्चारी" पर्यंत काहीही विचार मनात येऊ शकतात. पण पुरूष रस्त्याच्या कडेला कुठेही लघवी करताना दिसतात, त्यात आपल्याला काहीही वावगं वाटत नाही. आपण अस्वच्छतेच्या मुद्द्यावर नाक-तोंड मुरडतो पण नैसर्गिक विधी करण्यामागची आवश्यकता समजून घेत नाही. पुरूषांना लघवी करणं आवश्यक असतं, तसंच स्त्रियांनादेखील नसतं का? पण त्यांच्या रस्त्यावर बसण्याचा देखील गैरफायदा घेतला जातो.

कित्येक मोठ्या-मोठ्या कार्यालयांमधील शौचालयं किंवा प्रसाधनगृहांची अवस्था पाहिली की तिथे पुन्हा जाणं नको वाटतं. तिथल्या कार्यालयांमध्ये काम करणार्‍या अनेक स्त्रिया दुपारच्या जेवणानंतर पाणी पित नाहीत. कारण अस्वच्छ टॉयलेटमध्ये बसून आजारपण मागे लावून घेण्यापेक्षा तहानलेलं राहून लघवी होण्याची शक्यता कमी केलेली बरी, हे त्यांना जास्त परवडणारं असतं.

स्त्री-पुरूषांच्या भिन्न शरीररचनेमुळे लघवी करताना पुरूषाला जितकी सुविधा मिळते, तशी स्त्रीला मिळत नाही. सर्व कपडे आवरून-सावरून शौचाला बसतो, तशाच स्थितीमध्ये खाली बसावं लागतं. जवळपास प्रसाधन गृह नसताना घाईची लागलेली, एक साडी नेसलेली किंवा पंजाबी ड्रेस घातलेली बाई रस्त्याच्या कडेला लघवी करायला बसली आहे, अशी नुसती कल्पना केली तरी अशा प्रकारे नैसर्गिक विधी करण्यामधील अडथळे आणि धोके समजून घेता येऊ शकतील. हेच अडथळे अणि धोके टाळण्यासाठी कित्येक स्त्रिया नैसर्गिक विधीची उबळ घर येईपर्यंत दाबून ठेवतात किंवा नशीबाने रस्त्यात एखादं प्रसाधन गृह उपलब्ध झालं तरच मोकळ्या होतात.

नैसर्गिक विधी अशा प्रकारे रोखून धरण्याचे शरीरावर काय, काय दुष्परिणाम होतात, याबद्दल मी निराळं काय सांगणार? अनेकदा स्त्रियांची नाजूक मन:स्थिती गैरसमजाने मोजली-मापली जाते. त्या मन:स्थितीमागे अशी शारीरीक अडचण असेल हे कुणीही लक्षात घेत नाही.

स्त्रीया पोषाखाच्या बाबतीत आधुनिक बनत चालल्याचं हे देखील एक कारण असू शकेल. पण स्त्रीलादेखील पुरूषाइतकाच नैसर्गिक विधी करण्याचा अधिकार आहे आणि स्त्रीवर, ती केवळ स्त्री आहे म्हणून अतिप्रसंग केला जातो या दोन बाबी लक्षात घेऊन जागोजागी प्रसाधन गृह केव्हा बांधली जातील?

4 comments:

 1. खरंय... आपल्या सो कॉल्ड प्रगत मुंबईच्या एकाही रेल्वे स्टेशनवर, बस डेपोमध्ये एकही स्वच्छ प्रसाधनगृह नाही. अगदी बेसिक गरज आहे, ती पण उपलब्ध करून न दिल्याने अनेक आजारांना आपण निमंत्रण देत आहोत. ह्याच मुद्द्यावर राईट टू पी ह्या प्रोजेक्टसाठी मुंबईत ३३ NGO एकत्र काम करत आहेत, पण सरकारी इच्छाशक्तीची कमतरता असल्याने काम फार हळूहळू सुरु आहे...

  http://www.dnaindia.com/mumbai/report-the-right-to-pee-2012864

  ReplyDelete
  Replies
  1. हो ना! "सरकारी काम आणि महिनाभर थांब" ह्या म्हणीचा प्रत्यय येतो अशा कामांंमध्ये.

   Delete
 2. Chintamani Palsule10/28/2014 04:44:00 pm

  अत्यंत मुलभुत गरज आहे ही जी अनेकोवर्षे दूर्लक्षीत आहे.

  मा. मोदीजी सत्तेवर आल्यापासून यासाठी बोलत आहेत. काही उद्योग धंद्यांकडुन शिक्षण संस्थातुन, सार्वजनीक ठिकाणी स्वच्छता गृहे बांधण्यासाठी विचारणा होउन कामसुद्धा सुरू झाले आहे.
  ही आणी अशीक अनेक कामे मार्गी लावायचा प्रयत्न करणा-या "मोदी"ला न्यूनगंडाने पछाडलेल्या अनेक व्यक्ती "स्वच्छता गृहे बांधणे हे काय पंतप्रधानांचे काम आहे का" असे उद्दामपणे विचारत आहेत. तर काही जण "कोणी मोदीभक्त आहे का. कचरा झाडण्यासाठी बोलवायचे होते" असे कुत्सीत उद्गार काढून आपल्या अकलेचे (?) प्रदर्शन करीत आहेत.

  ReplyDelete
  Replies
  1. जे बोलत आहेत, त्यांना बोलू द्यावे. कामे दिसली की आपोआपच तोंडे बंद होऊन जातील. स्वच्छता गृहे बांधली जाणं ही चांगली बाब आहे. जर देशाच्या पंतप्रधानांना हा मुद्दा महत्वाचा वाटत असेल तर आपण स्वत:ला सुदैवी समजायला हवं.

   Delete

Advertisement


Books I read

Amerikechi C.I.A.
पर्व [Parva]
LOPAMUDRA
Asurved
Sathe Faycus
Nazi Bhasmasuracha Udyast
Mahanayak - A fictionalized biography of Netaji Subhas Chandra Bose
Hullabaloo in the Guava Orchard
The Magic Drum And Other Favourite Stories
Yash Tumachya Hatat
Baba Batesharnath
Panipat
Swami
Shriman Yogi
Mandir Shilpe
Mantra Shrimanticha
Avaghe Dharu Supanth
Women & The Weight Loss Tamasha
Majhi Janmathep
Amrutvel


Kanchan Karai's favorite books »