28 October 2014

रामायण: विचारमंथन भाग २

राम-रावण युद्धानंतर सीतेचा स्वीकार रामाने करण्यास नकार दिला व तिने अग्निपरीक्षा देऊन आपले पावित्र्य सिद्ध केले. या प्रसंगी - "जर माझ्या पावित्र्यावर विश्वास नव्हता तर रावणाच्या तावडीतून मला कशाला सोडवलेत", असा प्रश्न करणार्‍या सीतेला राम उत्तर देतो की "एखाद्या इच्छेविरूद्ध बळाचा वापर करून पळवून नेलेल्या स्त्रीची सुटका करणे हे माझे कर्तव्य आहे". हीच समज राम अग्निपरीक्षेच्या बाबतीत का दाखवत नाही? जर कुठल्याही पुरूषाने एका स्त्रीशी तिच्या इच्छेविरूद्ध किंवा बळाचा वापर करून शरिरसंबंध प्रस्थापित केले, तर दोष त्या स्त्रीला दिला जाऊ नये ही गोष्ट राम जाणत नसेल का?


तीच गोष्ट अयोध्येला गेल्यानंतर सीतेचा त्याग करण्याचीही. एका धोब्याची बायको रात्रभर बाहेर राहिली म्हणून धोब्याने तिचा त्याग केला. म्हणून रामाने त्या धोब्याचे विचार योग्य आहेत असं समजून, रावणाच्या तावडीतून सीतेची सुटका केल्यानंतर तिने अग्निपरीक्षेने आपले पावित्र्य सिद्ध केलेले असतानाही तिचा त्याग केला. म्हणजे रामाच्या बुद्धीत आणि धोब्याच्या बुद्धित काहीच फरक नव्हता असं म्हणण्यात गैर काय? या ठिकाणी रामाचा अविचारी पणा दिसून येतो, असं मला वाटतं. कारण प्रजाजनांपैकी एकजण स्त्रीच्या पावित्र्याला आपल्या तोकड्या समजुतींच्या निकषावर पारखू पहातो, तेव्हा वास्तविक पहाता रामाने एक राजा म्हणून त्या प्रजाजनांना योग्य मार्गदर्शन करावयास हवे होते. इथे तर उलटच घडले. जर प्रजाजन राजाच्या निर्णयाने सुखी नसतील तर राजाला आदर्श राजा असे म्हटले जाणार नाही, असं जर राजा रामाला वाटत असेल, तर सीतेचे काय? ती त्याच्या प्रजाजनांपैकी एक नव्हती का?

राम-रावण युद्धानंतर राम जेव्हा लक्ष्मण व सीतेसह अयोध्येला परतला तेव्हा ती गरोदर नव्हती. ती गरोदर राहिली ती अयोध्येमध्ये रामाने राज्यकारभार ताब्यात घेतल्यानंतर. "सीतेचा त्याग रामाने कोणत्याही कारणासाठी केला असेल, पण त्याचं सीतेवर प्रेम होतं म्हणूनच त्याने राजमहालातदेखील वनवास्यासारखे आयुष्य व्यतित केले", असे म्हणतात. जर त्याचे सीतेवर इतके प्रेम होते, तर त्याने लक्ष्मणाला सीतेला वनात सोडून येण्याचा आदेश दिल्यानंतर तिच्या रक्षणाची काहीच जबाबदारी कशी उचलली नाही? विशेषतः ती गरोदर असताना. कारण जोपर्यंत रामाची मुले लव आणि कुश यांची ओळख स्वतः सीतेने "ही तुमची मुले" म्हणून करून दिली नाही, तोपर्यंत रामाला ती आपली मुले आहेत, हे माहितच नव्हते.

सीतेने रामाला त्याच्या मुलांशी ओळख करून दिल्यानंतर राम त्यांना ताबडतोब स्विकारतो पण सीतेला मात्र स्विकारण्यापूर्वी तिने पुन्हा एकदा अग्निपरिक्षा द्यावी अशी मागणी करतो. इतकी वर्षं पितृत्व नाकारणारा बाप अचानक आपल्याला पुत्र म्हणून स्विकारतो पण आपल्या आईला मात्र पुन्हा एकदा अग्निपरिक्षा देण्यास फर्मावतो, हा रामाचा दांभिकपणा लव-कुश यांनी कसा पटवून घेतला असेल? कदाचित याच पुरूषी मनोवृत्तीला कंटाळून सीतेने अग्निदिव्य करण्या ऐवजी धरणीमातेला साद घातली असावी. ती स्वाभिमानी स्त्री तेथेच आपल्या पावित्र्याचा दाखला देत धरणीच्या उदरात गडप होते व राम लव-कुश यांच्यासह पुन्हा अयोध्येला जातो व सुखाने राज्य करतो. पण सीतेने पावित्र्य सिद्ध करण्यासाठी १४ वर्षांपूर्वी केलेले अग्निदिव्य रामाने एका धोब्याच्या शंकेवरून बाद ठरवले असेल, तर पुन्हा सीतेला अग्निदिव्य करायला लावून तीची पवित्रता सिद्ध झाली की अयोध्येला नेण्यास तो कसा काय तयार होतो? १४ वर्षांनंतर केलेले अग्निदिव्य अधिक प्रखर असते असा त्याचा समज होता का?

समजा, दोन क्षण असा विचार केला की सीतेला रावणाने भ्रष्ट केले होते. पण यात तिची चूक काय? तिने लक्ष्मण रेषा ओलांडली, शापापासून वाचण्यासाठी. रावणाने तिचे बळाने हरण केले. त्यानंतर ती पूर्ण काळ राक्षसींच्या पहार्‍यात होती. अशा परिस्थितीमध्ये ती भ्रष्ट झाली असती तरी तिची चूक म्हणता येईल का? संपूर्ण रामायणामध्ये रामाची केवळ एकच चांगली गोष्ट नजरेसमोर येते, ती म्हणजे तो एकपत्नीव्रत होता. पण त्याच्या एकपत्नीव्रत असण्याची किंमत वारंवार सीतेनेच चुकती केलेली आढळते.

रामराज्य हा शब्द मी लहानपणापासून ऐकला. रामराज्य म्हणजे सुराज्य. पण रामाने अयोध्येमधे राज्यकारभार सांभाळल्यापासून सीतेचा त्याग एवढ्या एका घटनेपुरतीच रामराज्याची कल्पना येते. राम एक आदर्श राजा असेलही पण त्याचा पुरावा रामायणात कुठेही सापडत नाही, मग कसल्या आधारावर रामराज्य म्हणजे आदर्श राज्य, सुराज्य असे प्रत्येक नवीन पिढीच्या मनावर गेली वर्षानुवर्षे बिंबवले गेले आहे?


रामायण: विचारमंथन भाग १

No comments:

Post a Comment