28 October 2014

रामायण: विचारमंथन भाग १


सीता. हे नाव उच्चारलं की आठवते ती रामाची पत्नी, एक पतिव्रता स्त्री, आपलं पावित्र्य सिद्ध करण्याकरता जिला वारंवार अग्निदिव्यातून जावं लागलं. जनकराजाची ही मानलेली मुलगी. तिचा जन्मच मुळी गूढ. जनकराजाला जमीन नांगरताना एक पेटीत सापडलेली ही मुलगी. कुणी म्हणतं की ती पद्माक्ष नावाच्या राजाची कन्या तर कुणी म्हणतं ती रावणाचीच कन्या. पण तिच्या कुंडलीतील अशुभ योगांमुळे रावणाने मंदोदरीला तिचा त्याग करण्यास सांगितलं. तिचे माता-पिता कुणीही असोत पण महाराजा जनक व महाराणी सुनयना यांनी सीतेला आपली मुलगी मानून तिचे पालन पोषण करतानाच तिच्यावर उत्तम असे संस्कार केले होते, याची प्रचिती आपल्याला रामायणातील अनेक प्रसंगांमधून येते. सीतेच्या शारिरीक बळाची कल्पना आपल्याला तिच्या आयुष्यातील केवळ एका प्रसंगातून दाखविण्यात आली आहे, याच प्रसंगामुळे जनकराजाला सीतेशी विवाह करण्यायोग्य वर मिळावा म्हणून एक पण ठेवावा लागला. जनकराजापाशी असलेलं शिवधनुष्य, जे केवळ उचलण्यासाठी शंभर माणसांचे बळ लागत असे, अशा जड शिवधनुष्याचा घोडा करून सीता आपल्या बालपणी खेळत असे. सीतेसारख्या सुकुमार वाटणा-या स्त्रीचे हे बाहूबल पाहूनच जनकराजाने तिला वीर्यशुल्का घोषित केले होते. अर्थात, सीतेला प्राप्त करण्यासाठी जो आपले बाहूबल सिद्ध करील, सीता त्यालाच वरील. यानंतरची रामाने प्रत्यंचा लावते वेळेस शिवधनुष्य मोडल्याची कथा तर सर्वांना माहितच आहे.

माझ्या मते, रामाने शिवधनुष्य पेलूनदेखील त्याने जनकराजाने ठेवलेला पण पूर्ण केला नव्हता. कारण जनकराजाच्या पणानुसार शिवधनुष्याला जो प्रत्यंचा लावील तोच सीतेचा पति होणार होता. इथे तर रामाने प्रत्यंचा लावलेलीच नाही, उलट ते शिवधनुष्य मोडून ठेवले आहे. मात्र शिवधनुष्याला प्रत्यंचा लावताना एखाद्या मनुष्याला जितके धनुष्य वाकवावे लागले असते, त्याहीपेक्षा जास्त धनुष्य वाकवणारा राम हा राजा जनकाला जास्त शक्तीशाली वाटला असावा म्हणूनच त्याने रामाने पण जिंकल्याचे मान्य केले असावे, असे वाटते. मात्र सीतेकडे रामाच्याच तुल्यबळ बाहूबल असतानादेखील तिने स्वतःच्या अपहरणप्रसंगी रावणाशी मुकाबला करण्याकरता हे बाहूबल का वापरले नाही, हे एक कोडेच आहे. मुळात धनुष्यासारख्या आकार असलेल्या गोष्टीचा लहान मुलांच्या खेळण्यातील घोडयासारखा वापर करता येणे हे भौतिकशास्त्रीय दृष्ट्या चुकीचे वाटते. तसेच शिवधनुष्य हे प्रत्यक्ष भगवान शिवशंकरांकडून मिळालेले असल्याने राजा जनकाने त्या धनुष्याच्या पुजे-अर्चेची व सुरक्षिततेचीही काही ना काही व्यवस्था जरूर केलेली असणार, मग सीतेला ते लहानपणी खेळण्यासाठी म्हणून सहजगत्या उपलब्ध झाले असेल, असे वाटत नाही. त्यामुळे सीतेकडे अचाट बाहुबल बालपणापासून होते, असे जरी मान्य केले तरी ती शिवधनुष्याचा वापर खेळातील घोड्याप्रमाणे करत होती, हे तर्कसंगत वाटत नाही.

त्या काळी राजकुळातील माता-पिता अपत्यजन्मानंतर त्याचे भविष्य जाणून घेण्यास उत्सुक असत. राजगुरूंकडून अपत्याचे भविष्यकथन करून घेण्याची प्रथा अस्तित्वात असल्याचा दाखला आपल्याला प्रत्यक्ष रामाच्या जन्मानंतर दशरथाने रामाच्या जाणून घेतलेल्या भविष्यामुळे मिळतोच. सीता ही तर जनकाची रक्ताची मुलगी नव्हतीच. मग तर तिचा मुलगी म्हणून स्वीकार करण्यापूर्वी त्याने तिचे भविष्य नक्कीच जाणून घेतले असले पाहिजे त्यामुळे विवाहानंतर तिच्या नशीबात काय वाढून ठेवलं आहे, याची कल्पना त्याला भविष्यकथनामुळे आली नसेल का? कदाचित असे असू शकेल की जनकराजाला सीतेच्या आयुष्यात कोणकोणत्या गोष्टी घडणार आहेत, याची पूर्ण कल्पना राजगुरूंनी किंवा भविष्यवेत्त्यांनी दिली असावी, परंतू स्वतःची कन्या उर्मिला व आपला भाऊ कुशध्वज याच्या दोन्ही कन्या मांडवी व श्रुतकिर्ती (ज्या अनुक्रमे सीतास्वयंवराचे प्रसंगी रामाचे बंधू लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न यांच्या पत्नी बनल्या) यांच्या आयुष्याचे भविष्यदेखील जनकाने माहित करून घेतलेले असावे. त्यामुळे विवाहानंतर सीतेला आजन्म वनवास भोगावा लागला तरी इतर तीन मुलींचे आयुष्य मात्र राजप्रासादात, सुखाने व्यतित होणार आहे, ही गोष्ट जनकराजाला जास्त महत्त्वाची वाटली असावी. असा तर्क करण्यास कारणदेखील आहे.

कदाचित सीतेचे भविष्य जाणून घेतल्यानंतर आपल्या मुलींच्या सुखासाठी सीतेच्या विवाहाबाबतीत आपण पक्षपाती निर्णय घेत आहोत, याचा सल मनाला डाचत असल्यामुळे निदान सीतेचा पति तरी महापराक्रमी असावा, असा विचार करून त्याने शिवधनुष्याला प्रत्यंचा लावण्याचा पण ठेवला असावा. अन्यथा भगवान शंकरानी आपले पिनाक नावाचे धनुष्य (जे शिवधनुष्य म्हणून ओळखले जाते, ते) जनकाला उत्तराधिकारी म्हणून ठेवण्यास दिले असताना, जनकाने त्या धनुष्याचा असा वापर करून घेण्याचे प्रयोजन समजत नाही. वरीलप्रमाणे तर्क केल्यास सीतेच्या कुंडलीतील अशुभ योगांमुळेच मूळ माता-पित्यानेदेखील तिचा त्याग करण्यामागे तत्कालिन पण सुसंगत विचार होता असे वाटते. तसेच सीतेकडे शिवधनुष्याचा घोडा करण्याइतपत बाहूबल नव्हते हे देखील स्पष्ट होते.

सीतेचे भविष्य माहित असल्याने जनकराजाने तिच्यावर अशाप्रकारचे संस्कार केले असले पाहिजेत, जेणेकरून ती कोणत्याही परिस्थितीमधे आपले मनोधैर्य गमावून बसणार नाही. कारण सीतेच्या सत्त्वपरीक्षेशी संबंधित असा रामायणातील कोणताही प्रसंग घेतला असता, सीता ही मनाने ठाम, निग्रही व संयमी अशा स्वभावाची स्त्री आहे हे दिसून येते. एकदा श्रीरामाला वरल्यानंतर तिने आपले संपूर्ण आयुष्य पतिसेवेत वाहिल्याचे दिसून येते. रामाला झालेला वनवास हा काही तिच्यासाठी अनिवार्य नव्हता पण पतिवरील दृढ प्रेमामुळेच तिने रामासोबत हा वनवास आनंदाने पत्करल्याचे दिसून येते. मारीच वधाच्या प्रसंगीदेखील तिने लक्ष्मणाला रामाच्या मदतीकरीता पाठवणे व तद्नंतर साधूवेषातत आलेल्या रावणाला भिक्षा वाढण्यासाठी लक्ष्मणाने आखून दिलेली मर्यादारेषा ओलांडणे यात देखील तिचे पतिप्रेमच दिसून येते.

रामाच्या वनवासप्रसंगी लक्ष्मणासोबत केवळ सीताच वनवासाला गेली होती. लक्ष्मणाची पत्नी उर्मिला, भरताची पत्नी मांडवी व शत्रुघ्नाची पत्नी श्रुतकिर्ती या मात्र सासरीच राजवैभवात राहिल्या होत्या. लक्ष्मणाची पत्नी हिला १२ वर्षे विनाकारण पतिवियोग सहन करावा लागला मात्र तिने राजसुखे त्यागल्याचा दाखला मिळत नाही. लक्ष्मणरेषेविषयी काही गैरसमज समजामधे अजूनही पसरलेले आहेत जे पुरूषप्रधान संस्कृतीचे द्योतक आहेत असे मला वाटते. प्रत्यक्षात लक्ष्मणाने आखलेल्या रेषेमाधे काही वनौषधींचा रस मिसळली असण्याची शक्यता आहे, जेणेकरून ती रेषा पार करणा-या कुणाही व्यक्तीला, मग ती व्यक्ती पर्णकुटीच्या आत असो वा बाहेर, प्राणघातक इजा होईल. याच कारणास्तव त्याने सीतेला ही रेषा पार करू नकोस, अशी सूचना दिली असावी. मात्र सीतेला अशा द्रव्यावरील मारक औषध (अ‍ॅन्टीडोट) माहित असावे, अन्यथा तिने अशी रेषा पार करण्याचा धोका पत्करला नसता. परंतू पतिप्रेमामुळे ती समोरच्या माणसाची पारख करण्यास विसरली व रावणाकडून तिचे अपहरण करण्यात आले.

अपहरण होते समयी सीता आपल्या अंगावरील एक एक आभूषण रस्त्यात सोडून जात होती. जेणेकरून तिला कोणत्या मार्गाने नेले आहे कळावे. पण सीतेकडे वनवासात असताना इतके दागिने कुठून आले, ज्यायोगे ती स्वत:च्या मार्गाचा ट्रॅक ठेवू शकेल. सौभाग्यलेणी म्हणून जरी ती अलंकार वापरत असेल तरी त्यांची संख्या किती असू शकेल?

रावणाने अपहरण केल्यानंतर देखील त्याचे वैभव पाहून सीतेचे चित्त जराही विचलीत झाले नाही, असे दिसून येते. कारण सीतेने वारंवार विवाहाला नकार दिल्यामुळेच रावणाने तिची रवानगी अशोकवनात, राक्षिसीणींच्या पहार्‍यात केली. येथेदेखील सीतेने पराकोटीचे धैर्य व श्रीरामावरील अढळ श्रद्धा वारंवार सिद्ध केली आहे. भयानक असे रूप असलेल्या राक्षिसीणींच्या बंदिवासातून सुटका व्हाव्ही म्हणून रावणाने तिला आपल्या संपत्तीचे आमिष दाखवले नसेल का? रावणाने तिला पट्टराणी करण्याचे वचन दिले होते. मात्र सीतेने त्याच्या कोणत्याही वचनाला बळी न पडता आपल्या पतिची वाट पहाणे पसंत केले. येथे सीता केवळ पतिवरील प्रेमच सिद्ध करत नाही, तर आपल्या पतिच्या पराक्रमावरदेखील विश्वास ठेवते, हे दिसून येते. हनुमान जेव्हा रामाचा निरोप घेऊन सीतेकडे येतो, तेव्हाही संधी असूनदेखील सीता हनुमानासोबत लंकेतून पसार होत नाही, याचे कारण देखील तिला आपल्या पतिच्या पराक्रमाचा अपमान करावयाचा नाही, यापेक्षा वेगळे देता येत नाही.

या ठिकाणी सीतेचे विचार बाजूला ठेवून थोडासा रावणाच्या दृष्टीकोनातून विचार करावासा मला वाटतो आहे. स्वतःच्या बहिणीच्या अपमानाने व्यथित झालेल्या रावणाने प्रतिशोध घेण्यासाठी सीतेचे अपहरण का करावे हा एक प्रश्नच आहे. वास्तविक पहाता, मारीच वधाचे प्रसंगी राम व लक्ष्मण या दोघांशीच त्याला लढावे लागले असते व तसे करणे जास्त सोपेही गेले असते. कदाचित स्वतः शूरवीर असलेल्या रावणाने असा विचार केला असावा की माझ्या बहिणीसारख्या एकाकी स्त्रीचा या दोन बंधूंनी अपमान केला, तसंच यांच्यासोबत असलेल्या एकाकी स्त्रीला मी पळवून नेल्याने हे दोघे बंधू अपमानित होतील.

सीतेला पळवून नेऊन तिला आपलीशी करण्यात रावणाला फार स्वारस्य होते, असे मला वाटत नाही कारण अपहरण प्रसंगी अनिवार्य म्हणून सीतेला स्पर्श केल्यानंतर त्याने पुन्हा सीतेला स्पर्श केल्याचा दाखला मिळत नाही. तो सीतेवर केव्हाही जबरदस्ती करू शकला असता. जर त्याच्याबाबतीत एखाद्या स्त्रीला इच्छेविरूद्ध स्पर्श केल्यास शापवाणी सत्य ठरणार असण्याची शक्यता असती, तर सीतेला भ्रष्ट करण्याचे इतर अनेक उपाय त्याने अवलंबिले असते. पण तसे न करता, एका स्त्रीच्या इच्छेचा आदर राखत त्याने वारंवार तिच्याकडे विवाहाची फक्त विचारणाच केली व तिचा नकार ठाम आहे असे पाहून त्याने कोणताही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष भ्रष्ट मार्ग न अवलंबिता सीतेची रवानगी अशोकवनात केली असावी किंवा त्याने रामाला ओळखले असावे व राम आणि लक्ष्मण यांच्याशी एकांतात न लढता, सर्व युद्ध व सैन्याची जमवाजमव करण्याची त्यांना संधी द्यावी व मग शूरवीर राम व लक्ष्मण यांचा पराभव करून जेतेपणाचा आनंद लुटावा असे रावणाच्या मनात असावे.

रामायण: विचारमंथन भाग २

No comments:

Post a Comment