02 November 2015

आला हिवाळा...

आता हिवाळा सुरू होईल. गोरगरीब, गरजूंना आपले जुने-पाने स्वेटर, मफलर्स देऊन मदत तर तुम्ही करालच पण त्या आधी स्वत:ची काळजी घ्यायला शिका.

ह्या ऋतूमध्ये कोरडेपणा विशेष जाणवतो. थोडी काळजी घेतलीत तर आपलंच जीवन सुखकर होणार आहे.


ज्यांना ओठ फुटणं, टाचांना भेगा पडणं (हिवाळ्यात सुद्धा पडतात) अशासारखे त्रास असतील त्यांनी आत्तापासूनच पेट्रोलियम जेली, फूट क्रिमचा वापर सुरू करावा. तहान लागल्यावर विहीर खणण्यात काही अर्थ आहे का? पाय स्वच्छ धुवून फूट क्रिम लावलं कि जुन्या मोज्यांनी पाय झाकत जा म्हणजे घरातल्या लाद्या तेलकट होणार नाहीत आणि पायही मळणार नाहीत.

योगाभ्यासाने जलनेती नावाचा एक उत्तम प्रकार आपल्याला दिलेला आहे. त्याची माहिती जालावर सहज सापडेल. जलनेती रोज करत जा म्हणजे नाक चोंदण्यासारख्या त्रासापासून दूर राहाल. जलनेती कुणी करावी, कुणी करू नये ह्याबाबतची माहिती नीट वाचून मगच करा, नाहीतर माझा गळा पकडाल.

सर्दीने नाक चोंदलच तर आपल्याकडे पूर्वी साजूक तूप किंवा खोबरल तेलाचे थेंब नाकात सोडण्याची पद्धत होती. मी अजूनही खोबरेल तेल व डॉक्टरांनी सांगितलेलं औषध असं दोन्ही वापरते. तुम्ही काय वापरायचं ते तुम्हीच ठरवा पण झोपताना नाकाने स्वच्छ श्वास घेता येईल असं पहा. अन्यथा हिवाळ्यामध्ये झोपेत उघड्या तोंडाने श्वास घेताना घशाला जितकी कोरड पडून असंख्य सुया टोचत असल्याची जी वेदनामय जाणीव होते, ती भरपूर मेहनत केल्यावर लागलेल्या तहानेनेसुद्धा होत नाही.

हे खास करून स्त्रियांसाठी - प्रवासामध्ये स्वत:जवळ एक मोज्यांचा जोड अवश्य ठेवा. बायका सगळं अंग शाल, स्वेटरमध्ये झाकून घेतील पण पाय शक्यतो चपला वापरण्याची सवय असल्याने गारठून जातात. रात्रीच्या प्रवासामध्ये केवळ पावलांना गारठा लागतो म्हणून झोप लागत नाही आणि अंग जास्तच आंबल्याची तक्रार निर्माण होते.

रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने हातपाय अवश्य धुवा. त्यामुळे हातापायांना उबदारपणा येऊन झोप चांगली लागते. झोपण्यापूर्वी त्वचेला आर्द्रता देणारे क्रिम किंवा सर्वात चांगले म्हणजे खोबरेल तेल अवश्य लावा.

बाकी धुंधुरमास करा, पाणी कोमट करून प्या, आईसक्रिम खाऊ नका असल्या सल्ल्यांकडे कुणी लक्ष देणार नाही म्हणून सांगत नाहीये पण ही पथ्यसुद्धा पाळलीत तर उत्तमच.

वरील सर्व सूचना स्वानुभवाने शहाणी होऊन करत आहे. त्या स्विकारणं, न स्विकारणं तुमच्या हाती.

No comments:

Post a Comment