09 March 2016

स्त्रियांनो, संघटीत व्हा!

काल जागतिक महिला दिना निमित्त माटुंगा पोलिस ठाणे, मुंबई ह्यांनी एक चर्चास्त्र आयोजित केले होते. ह्या चर्चासत्रामध्ये सोशल मिडीयाचा वापर करून स्त्रियांच्या बाबतीत घडणारे गुन्हे व त्यावरील उपाययोजना आणि खबरदारी ह्या विषयावर बोलण्यासाठी माटुंगा पोलिसांनी मला आमंत्रित केलं होतं. सदर विषयाबद्दल बोलताना सोशल मिडीयावर कोणती माहिती व कशाप्रकारे शेअर केली जावी, ह्याबद्दल मी मत व्यक्त केलं. अनेक भगिनींनी त्याला दुजोरा दिला. श्रोत्यांमधील काही भगिनींनी स्वत:चे अनुभव, अन्याय, अत्याचार यांबाबत ह्या चर्चासत्रामध्ये मोकळेपणाने चर्चा केली. अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करून अनेक वर्ष बोलण्याची संधी न मिळालेल्या महिलांना बोलतं करून, त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा माटुंगा पोलिसांचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे. या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मी त्यांचे मन:पूर्वक आभार मानते व भविष्यात त्यांच्याकडून आणखी चांगले उपक्रम राबवले जातील अशी अपेक्षा करते. माझ्या मनोगताचा गोषवारा असा:

स्वत:ला कधीही कमी लेखू नका. तुमच्यामध्ये काय शक्ती आहे हे तुम्हाला तोपर्यंत कळत नाही, जोपर्यंत ती शक्ती आजमावण्याची तुमच्यावर वेळ येत नाही.

आजकाल बऱ्याच भगिनी सोशल मिडीयावर वेळ घालवतात. फेसबुक, व्हॉट्सअप ही संवादाची साधनं बनलीत. हे जरी आभासी जग असलं तरी अनुभवांच्या बाबतीत तितकंच खरं आहे. स्त्रियांना खासकरून बाहेरच्या जगाचे वाईट अनुभव येतात पण त्या अनुभवांपेक्षाही वाइट अनुभव ह्या आभासी जगामुळे तुम्हाला मिळू शकतात.

रस्त्यात छेड काढणाऱ्या गुंडाला एक वेळ चपलेने बडवता येतं पण ह्या आभासी जगामध्ये तुमच्याविषयी आकस धरून असलेली व्यक्ती तुमचा कसा आणि कुठे सूड उगवण्याचा प्रयत्न करेल हे सांगता येत नाही. खऱ्या जगात समोरच्या व्यक्तीमधील एखादा गुण-दोष आपण तोंडावर सांगू शकतो पण व्हर्च्युअल जगामध्ये काही भेकड लोक कॉम्प्युटर, मोबाईलच्या चौकोनी खिडकीमागून आपली खरी ओळख लपवून वार करतात.

अशा लोकांपासून सावध रहा. अनेक विवाहीत भगीनी आपल्या पतीसोबतचे, लहान मुलांसोबतचे फोटो सोशल मिडीयावर खूप आवडीने पोस्ट करतात. त्यांचा हेतू निर्मळ असतो पण ते फोटो पाहाणारी प्रत्येक व्यक्ती ते फोटो निर्मळ मनाने पाहातेच असे नाही. चार कौतुकाचे शब्द कमेंटमध्ये येतात पण त्याच वेळेस एखादा विकृत इसम त्यातून वेगळाच, त्याला हवा तसा अर्थ काढतो.

नवऱ्याने मागून आपल्या कमरेत हात घातलेले फोटो पोस्ट करणे हा तर अनेक विवाहीत स्त्रियांचा पतीवरील स्वत:चं प्रेम दाखवण्याचा सर्वसाधारण मानक आहे पण विकृत व्यक्तींना त्यातून हा संदेश मिळतो कि त्याच्यासोबत ती अशी उभी राहू शकते, तर माझ्यासोबत का नाही. स्त्री-पुरूष संबंधांमधील ही एक नैसर्गिक भावना आहे. पण त्या नैसर्गिक भावनेला विकृत रूप देणारे लोक कमी नाहीत.

तुम्हाला वाटेल कि स्वत:चे फोटो पोस्ट न करता, कुटुंबाचे फोटो पोस्ट केले तर काही बिघडत नाही. पण विचार करा, हल्लीच्या काळात लहान मुलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झालेली असताना तुमच्या गोंडस, गोजिऱ्या लहान मुलांचे फोटो तुम्ही सोशल मिडीयावर नुसते पोस्टच करत नाहीत तर "आज माझं कोकरू पहिलीत गेलं" अशा आशयाची पोस्ट टाकून तिथे शाळेचं नाव वगैरे पोस्ट करता. आपल्या हातांनी तुम्हीच आपल्या लेकरांसाठी असा सापळा तयार केलात तर पुढे काय अनर्थ ओढवेल ह्याबद्दल न बोललेलं बरं.

मी स्वत: अशा विकृत इसमाचा त्रास सहन केला आहे. सुरूवातीला त्याला मी दुरूत्तरही केली नव्हती पण माझा सभ्यपणा म्हणजे बुळेपणा अशी जेव्हा त्याने समजूत करून घेतली, तेव्हा त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं. तेव्हा जर दुर्दैवाने अशा प्रकारची परिस्थिती तुमच्यावर ओढवली तर घाबरून जाऊ नका. तुमचं मन पवित्र असेल तर तुमचं कुणी काही बिघडवू शकणार नाही.

हे झालं सोशल मिडीयाबद्दल पण आपल्या घरातल्या इतर स्त्रियांशी आपण कसं वागतो हे देखील आपण स्वत: तपासून पाहिलं पाहिजे. हे सासू-सून, नणंद-भावजय वाद कुठवर चालणार? प्रत्येक घरात दोन स्त्रियांचं पटत नाही, असं का? फक्त एकदा तुम्ही त्या दुसऱ्या स्त्रीला समजून घ्या आणि पहा कसा बदल घडतो.

मला सासरी त्रास झाला म्हणून सूनेनेही सासूरवास भोगला पाहिजे ही भूमिका सोडा. नवऱ्याची आई आहे म्हणून काहीही बोललं तरी चालतं असा विचार करताना आपल्या आईशी आपण जे बोलू शकत नाही, ते शब्द सासूबद्दल का उच्चारावेत ह्याचाही विचार केला जावा. सासू,सून ह्या दोन स्त्रियांचा एकमेकींशी संबंध येतो तो एका पुरूषामुळे. एकीचा तो मुलगा असतो, तर एकीचा नवरा. पण तुमच्यातले वाद त्याच्यापर्यंत गेले तर तो काय म्हणतो? "तुमचं तुम्ही बघून घ्या." मग आता खरोखरच तुमचं तुम्ही बघून घ्यायला शिका.

आपल्या जवळच्या नात्यातील स्त्रियांच्या आवडीनिवडी समजून घ्या, त्यांना प्रोत्साहन द्या. जमल्यास स्वत: मदत करा. तुमच्यातील हे सकारात्मक बदल त्यांच्यातही सकारात्मकता निर्माण करतील. जुन्या पिढीच्या स्त्रियांना माझं सगळंच बोलणं पटेल असं नाही पण आजच्या पिढीच्या स्त्रियांनी हे समजून घ्यावं. तुम्हाला सासुरवास सहन करावा लागला म्हणून तुमच्या येणाऱ्या सुनांवर ती वेळ आणण्याची काही गरज नाही.

शेजारणीचा दु:स्वास, तीच्याकडे मोठा टि.व्ही आला म्हणून जळफळ, हे सगळं सोडा. आपली परिस्थिती स्विकारा आणि तोंडभरून तिचं कौतुक करा. बघा, कसा चमत्कार घडतो ते. जर नात्यातल्या स्त्रिया, शेजारणी आपल्या चांगल्या मैत्रीणी झाल्या तर मनातलं नैराश्य दूर पळेलच पण सोशल मिडियावर तासन्‌तास घालवण्याची गरजच पडणार नाही.

मला एका गोष्टीवर पूर्ण विश्वास आहे कि सर्व जगातील स्त्रिया अशा एकमेकांशी मिळूनमिसळून वागू लागल्या तर जगातील अनेक मोठेमोठे वाद उद्भवणारच नाहीत कारण तिथे स्त्रियांनाच लक्ष्य केलेलं असतं म्हणून संघटित व्हा.

No comments:

Post a Comment