26 March 2016

उन्हाळ्यातली सुट्टी

उन्हाळा सुरू झाला कि शाळेतले दिवसच आठवतात. एप्रिल महिन्यात परिक्षा असायची त्यामुळे मार्च महिन्यात मी आणि भाऊ घाण्याला जुंपून घेतलेल्या बैलासारखा अभ्यास करायला बसायचो. दहावी झाल्यावर मला सर्वात जास्त कसला आनंद झाला असेल तर आता कॉलेजमध्ये गणित विषय नसेल ह्याचा. पण तो आनंद फार काळ टिकला नाही. अर्थशास्त्र हा विषय अनिवार्य करून आर्ट्सवाल्यांच्या जीवाला फुकटचा घोर लावून ठेवला होता कॉलेजने. असो.

सुटीची खरी मजा अनुभवली ती लहानपणीच.एप्रिल महिन्यात परिक्षा संपेपर्यंत आम्ही दिवस मोजायचो. एरव्ही शाळा सुटल्यावर कधी एकदा शाळेतून बाहेर पडतो असं वाटणाऱ्या शाळेच्या आवारात परिक्षेच्या शेवटच्या दिवशी मात्र आपोआप पावलं रेंगाळायची. आपला पेपर आधीच झाला असेल तर मैत्रीणींची वाट पहायची. वेळ जावा म्हणून आवारातल्या त्या पापडीच्या झाडाच्या सुकलेल्या पापड्या गोळा करणं, रफ वहीवर चित्रकलेच्या नावावर रेघोट्या ओढणं सुरू असायचं. मित्रमैत्रीणींचा निरोप घेतला कि घरी जाईपर्यंत सुट्टीत काय काय करायचं ह्याचे बेत सुरू असायचे.

ह्या सगळ्या बेतांमध्ये गावी जाणं हा बेत कधीही नसायचा. गाव मला कधी आवडलाच नाही. बाबा लहानपणी घेऊन जात असत पण गावाचं आणि माझं नात कधी जुळलं नाही हेच खरं. शहरात राहिल्यामुळे असेल कदाचित. आधी तिथे वीज नव्हती, त्यात प्रातर्विधीसाठी झाडीझुडपं वगैरे... दोन दिवसांतच मी आई-बाबांच्या मागे लकडा लावायचे "घरी चला" म्हणून. एक वर्षं मात्र आम्ही गावी धम्माल केली होती. माझे चुलत भाऊ-बहिण व आम्ही एकाच दिवशी गावी पोहोचलो होतो.

खोतांच्या घरी एक मोठा लाकडी झोपाळा होता. आम्ही सगळी चिल्लीपिल्ली त्या एकाच झोपाळ्यावर दाटीवाटीने बसायचो, मागे उभे राहायचो आणि गाण्याच्या भेंड्या खेळायचो. आमचा तो निरागसपणा असला तरी आता कळतं फार गोंगाट करायचो आम्ही. खोतांनी आम्हाला कसं सहन केलं असेल कुणास ठाऊक? पण दर वर्षी आम्हा चुलत भावा-बहिणींचं गावी जाण्याचं गणित नेमकं चुकायचं. जेमतेम एक-दोन दिवस सोबत खेळायला मिळायचे. त्यात मेंढिकोट, जोडपत्ते, मुंगुस, नवा व्यापार असले खेळ रंगायचे. एकटेच असलो तर कुठे चाफ्याच्या झाडावर चढून कुठवर लांब परिसर दिसतो ते बघ, शेतावर फेरी मारून ये,आमराईत गारव्याला लोळत पड असं करून दिवस काढावे लागायचे.

दुपारच्या त्या सुम्म वातावरणात माझ्या डोक्यात एकच विचार... आता ह्या वेळेस बिल्डींगखालून गोळेवाला चालला असेल. त्याच्याकडे लालचुटूक गोळे मिळतात. ती आठवण तीव्र झाली कि मग मात्र "घरी चला"चा लकडादेखील आणखी तीव्र होऊन जायचा. आमच्या घरी मात्र सुटीत आम्ही खूप मजा करायचो. सकाळी येऊरला नाहीतर ग्लॅक्सो कंपनीच्या दिशेने फिरायला जायचं. तिथे रस्त्यारस्त्यात जास्वंदीची झुडूपं होती. लालचुटूक कळ्या अगदी सहज खुडता यायच्या. रस्त्यात मध्येच एक बिंडुकल्यांचं झाड लागायचं. करवंदांपेक्षा बारीक आकाराची ही तुरट गोड फळं माझ्या आवडीची होती.

येऊरला फिरायला गेलो तर परतताना करवंदं, ताडगोळे ठरलेले.रविवारी बाबा घरी असायचे; मग जोडीला कलिंगडदेखील यायचं. मस्तपैकी मेजवानी करून ताणून दिली कि संध्याकाळी चोर-पोलिस, सोनसाखळी खेळायला उत्साहाने आम्ही सळसळत असू.कधीतरी मावश्या, मोठ्या बहिणी उपवनला सहलीचा बेत आखत. उपवनला पूर्वी छान व्यवस्था होती. तिथे सिमेंटच्या लांबच लांब घसरगुंड्या बनवलेल्या होत्या. त्यावर तासन्‌तास खेळायचं.एवढं करूनही शरीर अजिबात थकलेलं नसायचं. रात्री आईच्या हातचं सुग्रास जेवणं जेवून पुन्हा खाली पळायचो बॅडमिंटन खेळायला. नियम-बियम अजिबात माहित नव्हते. ते पिसाचं फूल खाली पडलं नाही पाहिजे म्हणजे झालं.

सुटीच्या दिवसांमध्ये आणखी एक गंमत असते. एरव्ही शाळेसाठी हाका मारून मारून उठवलं तरी जाग येत नसे पण उन्हाळ्याच्या सुटीमध्ये मात्र कुणीही हाक न मारता अगदी स्वच्छ जाग येत असे. मग लवकर उठल्यावर उगीच आईला लुटूपुटूची मदत कर, कॉलनीत एक फेरफटका मारून ये असे उद्योग असायचे. रविवारी स्पायडरमॅन, जंगल बुक, मिकी माऊस, डॉनल्ड डक, हि-मॅन ही मंडळी आमच्या मनोरंजनासाठी सज्ज असायची.

दीड महिना उत्साहात कसा सरायचा हे कळायचंच नाही. मग एक दिवस बाबा पुढच्या इयत्तेची शाळेची पुस्तकं घेऊन यायचे. त्या पुस्तकांचा सुगंध मन भरून घेतला कि लक्षात यायचं, "चला आता येत्या सोमवारपासून शाळा सुरू होतेय. सुटीचे दिवस संपले". मग मी चुपचाप बाबांसोबत नव्या वह्या-पुस्तकांना कव्हरं घालायला बसायचे पण मनात नवा अभ्यास, नव्या इयत्तेबद्दल प्रचंड उत्सुकता घेऊनच.

No comments:

Post a Comment