02 March 2016

स्मिता

आजकाल फार आठवण येते तुझी, बयो. तुझ्या चित्रपटांतली तुझी सगळी गाणी ऐकून झाली, यूट्यूबवर पाहून देखील झाली. आठवण कमी होण्याऐवजी जास्तच तीव्र होत गेली. तुला ना कधी प्रत्यक्ष पाहिलं, ना कधी तुला साधं पत्र लिहिलं पण तू मनात रुतून बसली आहेस. कायमचीच. आता तुझे फोटो पाहाताना खास तुला जाणून घेण्यासाठी वाचलेले एक-एक लेख आठवत जातात.

तुझं कुणाच्याही मदतीशिवाय स्कूटर शिकणं, स्टुडिओच्या आवारातल्या कुत्र्याच्या पिलांना ग्लुकोजची बिस्किटं खाऊ घालणं आणि कोका कोला पाजणं. तुझी नि रेखाची मैत्री, तिच्यासारख्या साड्या नेसूनही तसा लूक न मिळाल्याने तुला आलेला रूसवा. काय, काय आठवू गं?

वारीस सिनेमा पूर्ण झाला आणि त्याचं डबिंग पूर्ण होण्याआधीच तू निघून गेलीस. मग ते पूर्ण केलं रेखाने. "आपने तो मुझे जीतेजी मार दिया बाबुजी" हा संवाद डब करताना प्रत्येक वेळेस रेखा हमसून रडली. हे काही पाहिलं नाही मी, वाचलं फक्त पण का कोण जाणे त्यातली वेदना मनाला भिडून राहिली.

"मोगरा फुलला" - तसे अनेक पैलू आहेत ह्या नावाला. पण हा अभंग त्या चिरपरिचित चालीमध्ये ऐकला कि सर्व मोह, भावना त्यागून परमेश्वराला जीवन अर्पण केल्याचे भाव मनात दाटतात. हा अभंग तू तुझ्या बाळासाठी - प्रतीकसाठी रात्री अंगाईगीत म्हणून गायचीस हे जेव्हा कळलं, तेव्हा वाटलं कि तुला माझ्या मनीचे भाव कळतात कि काय!


हॉस्पिटलमध्येच अंगावर एक शेला पांघरून गौतम राजाध्यक्षांनी काढलेला तुझा हा फोटो. किती साधी आणि सुंदर दिसतेयंस तू ह्यात! ह्या फोटोनंतर काही पाहू नये असं वाटलं होतं तरीही पहावं लागलंच. तुझं शेवटचं दर्शन.

कपाळावर ठसठशीत कुंकू. डोक्यावर पदर. चेहेऱ्यावर कसलं तेज होतं कोण जाणे? ते शेवटचं दर्शन काही विसरता येत नाही. फार मोठी नव्हते गं मी तेव्हा. मोकळेपणी रडता येत होतं. आता डोळ्यांतून पाणी आलं तर लोक वेड्यात काढतील पण तुझी आठवण काही जात नाही, मीही तिला "जा" म्हणत नाही; मला म्हणताच येणार नाही.

मग मनाच्या ह्या बेचैनीचं काय करू गं? येशील का तू परत? खरंच ये. मला नाही भेटता आलं तुला तरी चालेल पण तू ये. मी आपली तुला पडद्यावर पाहून समाधान मानेन पण तू नसताना अवचित येणारी तुझी ही आठवण फार त्रास देते गं.

No comments:

Post a Comment