Kanchan Karai's personal blog.

© 2020 मृण्मयी is an intellectual property of Kanchan Karai . Powered by Blogger.

सोयिस्कर देशप्रेम

0 comments
DDLJ सिनेमातल्या चौधरी बलदेवसिंगच्या देशप्रेमाचं मला नेहमीच कौतुक वाटत आलंय. "जरूरतों ने हाथ पॉंव जकड रखे है" म्हणत हा बलदेवसिंग आयुष्याची वीस-पंचवीस वर्षं लंडनमध्ये एक दुकान चालवून काढतो. त्या व्यवसायाच्या जोरावरच तो आपल्या दोन्ही मुलींना शिक्षण देतो, घरखर्च चालवतो. पण मनातून मात्र तो कधीही लंडनचा होऊ शकत नाही. तिथली संस्कृती, तिथले लोक त्याला आवडत नाहीत. त्याला आठवतो तो भारतामध्ये असलेला त्याचा गाव पंजाब. मग लंडनच्या बर्फाळ, ओलसर जमीनीवरही त्याला ’सरसों’चं फुललेलं शेत आणि त्यातून बागडणाऱ्या युवती दिसू लागतात. त्याचं हे देशप्रेम इतक्या पराकोटीचं असतं कि तो पंजाबमधल्या राहत्या घरातसुद्धा लंडनची संस्कृती सहन करू शकत नाही.

एक भारतीय म्हणून हा सिनेमा पाहताना बलदेवसिंगचा अभिमान वाटतो पण मग एवढं देशप्रेम जागृत असताना हा माणूस लंडनमध्ये काय करत होता? बलदेवसिंगचे बाकी सर्व नातेवाईक, अगदी आईसुद्धा पंजाबमध्ये दिसतात. म्हणजे त्यांचं तिथे व्यवस्थित चाललेलं असावं. समजा, जर त्यांच्याच गरजा पूर्ण करण्यासाठीच बलदेवसिंग लंडनला गेला असेल तर ज्या ब्रिटन देशाने, लंडन शहराने त्याला रोजी-रोटी मिळवून दिली, त्या शहराबद्दल कृतज्ञतेचा एक शब्दही त्याच्या तोंडून कसा निघत नाही? सतत टिकाच का बाहेर पडते? एवढं देशप्रेम उतू जात असेल तर त्याने पंजाबमध्येच राहून शेती का केली नाही?

तरी बरं कि बलदेवसिंग लंडनसारख्या कडक कायदे अंमलबजावणी असलेल्या शहरात गेला होता. नाहीतर भारत सोडून लंडनला यावं लागल्याचा राग त्याने काय, काय व्यक्त करून काढला असता कोण जाणे?

अनेक लोकांचं प्रांतिक किंवा देशीय प्रेम हे चौधरी बलदेवसिंगच्या देशप्रेमासारखं असतं. मी अमकाकर, मी ढिमकीकर असं म्हणुन आपल्याच देशातल्या निराळ्या शहरात गेल्यावर तिथे आपल्या गावाचे गुणगान गातात पण ज्या शहराने त्यांना कामधंदा मिळवून दिला, त्या शहराबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं तर दूरच पण तिथल्या असुविधांच्या नावाने नाकं मुरडणं, तिथल्या स्थानिकांना आपल्या गावाची महती सांगून हिणवणं असे एक ना दोन, अनेक प्रकार करतात. आता तर हा प्रकार इतका बोकाळला आहे कि सोशल मिडीयावरदेखील ह्या पोस्ट्सनी उच्छाद मांडलेला असतो.

असे लोक कधी विचार करतात का, कि त्यांना त्यांच्या गावाबद्दल इतकी आपुलकी, जिव्हाळा वाटत असेल तर आपल्या गावाच्या उत्कर्षासाठी काहीतरी करावं? आपल्याप्रमाणेच इतरांना गाव सोडून दुसऱ्या शहरात जाण्याची गरज पडू नये म्हणून आपण प्रयत्न करावेत? किंवा आपण स्वत:च आपल्या गावी परतावं आणि जिद्दीने लोकांसमोर हे सिद्ध करून दाखवावं कि प्रयत्न केले तर उपजीविकेसाठी गाव सोडून जाण्याची काहीच गरज नसते.

आपली सोय पाहाताना आपलं देशप्रेम, गावप्रेमही सोयीस्कर होत जातं का?

No comments:

Post a comment