बदल

काही काही माणसं कशी अचानक बदलून जातात. त्यांचं वागणं, बोलणं सगळंच अनोळखी वाटू लागतं.

१० वर्षांपूर्वीचा हा किस्सा. मी ट्रेनने प्रवास करत होते. भांडूप स्टेशनला ’ती’ चढली. तिच्या अवताराकडे पाहूनच मी चाट पडले. तिला जवळजवळ १५-२० वर्षं तरी अगदी जवळून पाहिलेलं. आधीही काही गोबऱ्या गालांची, जाडजूड वगैरे नव्हतीच ती पण आता मात्र तिची रयाच गेली होती.

गालांवर बारीक बारीक सुरकुत्या, डोळ्यांखाली काळी वर्तुळं आणि आधीच सडपातळ असलेली काया आता पार सुकलेली दिसत होती. तिला पाहून धस्स झालं काळजात पण मी माझ्याही नकळत डोळे मिटून प्रार्थना केली, "हिची काही दु:ख असतील ती दूर कर रे देवा. ती पुन्हा पहिल्यासारखी दिसू दे."

डोळे उघडले तर ती समोरच उभी. ओळखीचं हसली आणि मला विचारलं, "कशी आहेस?"

तिचा प्रश्न विचारण्याची पद्धत, आवाज, सूर सगळं सगळं बदललं होतं. "असं काय घडलंय हिच्या आयुष्यात कि असा अवतार व्हावा हिचा?" माझ्या मनात उगीच विचार सुरू झाले.

ती आणि तिची मोठी बहिण नृत्यात पटाईत. गणेशोत्सव असो, बिल्डींगची पूजा असो, ह्या दोघी बहिणींनी नाच केला नाही असं कधी झालं नाही. अगदी फुलपाखरासारख्या भिरभिरत असायच्या. मग मोठीचं लग्न झालं पण दोघी बहिणींनी साथ सोडली नाही. मोठीचा सासरी छळ होतो, अगदी डाग देण्यापर्यंत मजल जाते, हे माहित असूनदेखील हिने बहिणीच्या धाकट्या दीराशीच लग्न केलं. सख्य्ख्या बहिणी, सख्ख्या जावा झाल्या. गंमत वाटली असेल त्यांना नाही?

मग झालं काय असं कि मोठीच्या मागोमाग हिच्याही चेहेऱ्यावर तोच भकासपणा दिसू लागला. लग्न करण्याचा तिचा निर्णय चुकला असेल का? कि सासरी होणाऱ्या जाचामुळे बहिण एकटी पडू नये म्हणून हिनेदेखील त्या अग्निकुंडात उडी घेतली, धग वाटून घेण्यासाठी. काहीच कळायला मार्ग नव्हता. मी तिला ट्रेनमध्ये तसलं काही विचारणं तर शक्यच नव्हतं.

तिच्या प्रश्नावर "बरी आहे" एवढं उत्तर देऊन मी स्मित केलं. ती समोरच रिकाम्या झालेल्या जागेवर जाऊन बसली आणि मागे डोकं टेकवून तिने डोळे मिटले. असं वाटलं कि तिच्या डोळ्यांमधले भाव मला वाचता येऊ नयेत म्हणून मिटले असावेत तिने डोळे.

माझ्या मनात मात्र विचार सुरूच होते. काय घडलं असेल? माणसाने आपल्या स्वभाव, सवयी अमूलाग्र बदलाव्यात इतकं गंभीर काय घडत असेल त्यांच्या आयुष्यात?

2 comments:

  1. असेही घडते जीवनात विश्वास बसत नाही.लोक असे का वागतात त्यामुळे जीवनाचा मार्ग बदलतो.............

    ReplyDelete
    Replies
    1. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात आपल्यामुळे काही बदल घडणार असेल तर तो सकारात्मक असावा असं मला वाटतं.

      Delete