06 May 2016

रिमोट तुमच्या हाती

अजूनही आवडत्या नावडत्या सिरीयल्सवर चर्चा होत असते पण मला आता त्यावर मत द्यावंसं वाटत नाही. मी अशा मालिका पाहातच नाही म्हटल्यावर त्यातला न पाहिलेला बटबटीत अभिनय, भडक मेकअप आणि लांबवत नेलेलं कथानक याची चर्चा करण्याचा अधिकार उरतोच कुठे?

जे पाहातात अशा मालिका त्यांनी खुशाल करावी चर्चा आणि मांडावं आपलं मत पण मालिका पाहूनच्या पाहून मग तिच्या क्वालिटीवर नाक मुरडणाऱ्या लोकांना मला कधी कधी विचारावंसं वाटतं कि "तुम्हाला टिव्हीसमोर कुणी खुर्चीला साखळदंडाने जखडून, पापण्यांना चिमटे लावून डोळे सताड उघडे ठेवून ही मालिका पाहण्याची सक्ती केलेली असते का हो?" अथ पासून इतिपर्यंत मालिका पहायची तर पहायची आणि पुन्हा ती कशी वाईट बनवली आहे ह्यावर चर्चाही करायची? नसेल पाहायची मालिका तर बंद करा टिव्ही. रिमोट हाताशीच असतो की!

सर्वात जास्त वाईट कुणाचं वाटतं तर एखादी मालिका पाहण्याची इच्छा नसूनही घरातल्या काही सदस्यांच्या मर्जीखातर ती मालिका डोळ्यांखालून ज्यांना घालावी लागते त्यांचं. बिचारे! घर सोडून दुसरं आसऱ्याचं ठिकाण नसतं आणि घरात बसावं तर हा इमोसनल अत्याचार सहन करावा लागतो. अशा लोकांना हातात रिमोट नसला कि किती असहाय्य वाटत असेल ना? मालिकेच्या क्वालिटीवर चर्चा करायचीच असेल तर अशा लोकांनी करावी.

No comments:

Post a Comment