Kanchan Karai's personal blog.

© 2020 मृण्मयी is an intellectual property of Kanchan Karai . Powered by Blogger.

सिनेमा एक निमित्त

2 comments
सैराट चित्रपट प्रदर्शित होण्याआधी आणि नंतर बऱ्याच उलट-सुलट प्रतिक्रिया सोशल नेटवर्किंगवर वाचायला मिळाल्या. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली कि सैराट पाहून भारावलेल्या लोकांपेक्षा सैराट न पाहता धास्तावलेले लोक जास्त आहेत असं दिसतंय. ही धास्ती नेमकी कशाची, का ते थेट न सांगता चित्रपटाचे प्रोमोज आणि गाणी पाहून चित्रपटाच्या दर्जावर परिक्षणरूपी चर्चा केली जात आहे.

काही ठिकाणी आजची पिढी बिघडेल अशी भिती उघड उघड व्यक्तदेखील केलेली आहे. सैराटच्याच जोडीला बालक-पालक, शाळा, फॅन्ड्री, टाईमपास ह्या चित्रपटांची उदाहरणं देऊन असे चित्रपट हे निव्वळ गल्ला भरण्यासाठी व तरूण पिढीला बिघडवण्यासाठीच तयार केले जातात अशी बोंबदेखील मारलेली आहे.

खरंच चित्रपट पाहून तरूण पिढी बिघडते का? चित्रपटाचा आपल्या जीवनशैलीवर, संस्कृतीवर खोल ठसा उमटतो हे आपल्याला मान्य आहे पण तो ठसा फक्त तरूण पिढीला बिघडवण्यासाठीच उमटतो का? जी तरूण पिढी सैराट, बालक-पालक, शाळा, फॅन्ड्री किंवा टाईमपास सारखे चित्रपट पाहून बिघडू शकते, तीच पिढी कट्यार..., लोकमान्य, डॉ. प्रकाश आमटे, झेंडासारखे चित्रपट पाहून वैयक्तिक व सामाजिक प्रगतीसाठी प्रयत्न करू शकत नाही का?

चित्रपटाच्या माध्यमातून जातीव्यवस्थेवर, मानसिकतेवर भाष्य करणारा एक चित्रपट काढला तर तो गल्लाभरू ठरतो. मग असा कुठला चित्रपट आहे जो गल्ला भरण्यासाठी बनवला जात नाही? चित्रपटाचा गल्ला आणि लोकप्रियता या गोष्टी व्यस्तप्रमाणात असलेल्या आजपर्यंत कधी पाहण्यात आल्या आहेत का?

मला कुठल्याही भाषेबद्दल आकस नाही पण मराठी चित्रपटांमधून हिंदी संवाद, गाण्यांमधून हिंदी ओळींची भर घातली जात असताना, मराठी चित्रपटांवर हिंदी चित्रपटसृष्टीचा वाढत असलेला प्रभाव आपण मान्य करतो. हिंदी चित्रपटांमधून दाखवलं जाणारं सवंग शरीरप्रदर्शन, अश्लिल संवाद आपण मान्य करतो. फार मागे नको जाऊ या पण जया भादुरी, रणधीर कपूरच्या जवानी-दिवानी सिनेमापासून जरी पाहिलं तरी नायक-नायिका हे महाविद्यालयीन आयुष्यात प्रेम करतात, पळून जातात, घरच्यांचा विरोध मोडून काढत लग्न करतात वगैरे सर्व दाखवलेलं आहे. आपण ते छान चित्रपट म्हणून मान्य केलेलं आहे पण तेच फिल्मी सत्य मराठी चित्रपटांमधून वास्तव स्वरूपात पहायला मिळालं तर आपल्याला तरूण पिढी बिघडण्याची भिती वाटू लागते?

महागड्या परदेशी लोकेशन्स ऐवजी महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातही निसर्ग सौंदर्य दडलेलं आहे, हे दाखवणारी दृश्यं, मनातलं बोलण्यासाठी जड शब्दांचा वापर करून चालत नाही तर आपली बोलीच तिथे उपयोगी पडते, हे दाखवणारे संवाद, सावळ्या रंगातही किती सौंदर्य एकवटलेलं असतं हे दर्शवणारी नायिका, तारेवर वाळत घातलेला शर्ट घालणारा नायक, आईबापाच्या पंखाखालून बाहेर आल्यावर नायक व विशेषकरून नायिकेला बसलेले परिस्थितीचे चटके हे सगळं तपशीलवार दाखवणारा चित्रपटाचा उत्तरार्ध, प्रेम म्हणजे खेळ नाही हे केवळ तरूणांनाच नाही तर मोठ्यांनाही समजावून सांगणारा एक चित्रपट पाहून जर तरूण पिढी बिघणार असेल तर आतापर्यंत सर्व समाजाचं अध:पतन झालेलं असतं. कारण त्या आधी दादा कोंडकेंचे दुहेरी संवाद असलेले चित्रपट आलेले आहेत, शरीरप्रदर्शन व सवंगपणाचं चित्रण असलेले दिग्गज कलाकारांनी भूमिका केलेले चित्रपट आलेले आहेत. तेव्हा तरूण पिढी बिघडली नाही. ती बिघडली केव्हा, तर सैराट, फॅन्ड्री, बालक-पालक, शाळा आणि टाईमपास पाहिला तेव्हा.

डोळे मिटून वास्तव नाकारलं तरी ते वास्तवच राहातं. कदाचित काहीजण आपल्या मुलांना हे तथाकथित "सवंग" चित्रपट पाहू देणार नाहीत पण त्यामुळे मनात उगवणारा प्रेमाचा अंकूर कसा खुडता येईल? निसर्ग आपलं काम चोख बजावल्याशिवाय राहिल का?

2 comments:

  1. Nice thoughts.................. Mi sahmat aahe http://hempatil.blogspot.in

    ReplyDelete