19 June 2016

वटसावित्री

वटसावित्रीच्या व्रताच्या कथेतील सावित्रीने वास्तविक खूप चांगली शिकवण दिली आहे पण ते आपण लक्षात घेत नाही. यम जेव्हा सत्यवानाचे प्राण घेऊन निघतो, तेव्हा सावित्री यमाच्या मागोमाग जाते. का, तर पती जिथे जाईल तिथे पत्नीने असावं म्हणून. ती सत्यवानाच्या मृत शरीराजवळ विलाप करत बसत नाही. ज्या शरीरात प्राणच नाही त्याच्याशी कसलं नातं, नाही का?

यम सावित्रीला सत्यवानाचे प्राण परत करतो, ते तिच्या व्रताचरणामुळे, अखंड पावित्र्यामुळे. ही मेख आपण लक्षात घेतली पाहिजे. अखंड पतिव्रता किंवा एक पत्नीव्रत हे शोभेचे किंवा पुराणकालीन कथेतील व्यक्तींना लागू असलेले निव्वळ शब्द नसून त्यात गहन अर्थ दडलेला आहे. सावित्रीने तीन दिवस सलग व्रत करून आपली आत्मिक शक्ती वाढवलेली असते, नाहीतर यम जिथे जाईल तिथे तिला जाणं शक्य आहे का आणि यम तरी तिचं आपल्या पतीच्या प्राणांसाठी असं मागे मागे येणं का सहन करेल बरं?

बऱ्याच जोडप्यांमध्ये एका जोडीदाराने कबुली दिली नाही, तरी त्याचा/तिचा व्याभिचार दुसऱ्या जोडीदाराला अगदी सहज समजून येतो. याचं कारण ते आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक असतात, त्याच्या प्रत्येक आवडी-निवडीला त्यांनी आपल्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान दिलेलं असतं, मोहाचे क्षण टाळून त्यांनी आपल्या जोडीदारालाच निष्ठा वाहिलेल्या असतात म्हणून. अखंड पतिव्रता किंवा एक पत्नीव्रत असणं याहून काही वेगळं नसतं.

दोन शरीरांमधील प्राण जेव्हा एक होतो, तेव्हाच सुखी सहजीवन जगता येतं. प्रतारणा करून स्वत:ला जोडीदाराच्या नजरेत निष्प्राण कलेवर बनण्यापेक्षा किंवा हाच नवरा जन्मोजन्मी मिळावा किंवा सावित्रीसारखीच पत्नी मला मिळावी म्हणून नुसतं व्रत करणं किंवा त्याची चर्चा करण्यापेक्षा आपल्या जोडीदाराला समजून घेणं, त्याची सुखदु:ख आपलीच समजणं, त्याच्याशी एकनिष्ठ राहाणं एवढ्या गोष्टी केल्या कि तो जोडीदार मनापासून आपल्याला जन्मोजन्मी मागून घेईल. वरकरणी केलेल्या कुठल्याही व्रतापेक्षा आपल्या सदाचरणी वागण्याने मनापासून मागितलेली इच्छा नक्कीच पूर्ण व्हायला हवी.

No comments:

Post a Comment