थोडी दीवानी, थोडी सयानी, बाजीराव मस्तानी

ऐतिहासिक घटनांवर आधारित असलेले काही चित्रपट आपल्या माहितीत भर टाकून जातात. कधी कधी नको ती भरदेखील टाकतात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर बाजीराव मस्तानी हा चित्रपट. या चित्रपटाचा गाभा जरी बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांची प्रेमकहाणी असली तरी त्यात अनेक सत्यांना त्यात फाटा दिला गेलेला आहे. सिनेमॅटिक लिबर्टी वगैरे असावी कदाचित पण प्रियांका चोप्राने काशीबाईंची भूमिका वठवली म्हणून तिला लंगडताना दाखवायचं नाही हे काही पटलं नाही.

"पिंग" गाणं पाहिल्यावर लक्षात आलं कि चित्रपटातील काशीबाई लंगडत असत्या तर त्यांनी पिंगा गाण्यावर उड्या कशा मारल्या असत्या. काशीबाई आणी मस्तानी दोघींनी नेसलेल्या साड्या अजिबात आवडलेल्या नाहीत. पेशविणबाई हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात नृत्य करत असतील असं एकवेळ जरी मान्य केलं तरी त्यात किती भारदस्तपणा असेल! एखादी घरंदाज स्त्री आपला आब राखून जसं संयमित हातवारे करून नृत्य करेल, तसेच हातवारे मला पिंगा गाण्यात अपेक्षित होते पण भन्साळींनी आधी पिंग्यावर दिंड्या मोडल्या नि मग मस्तानी आणि काशीबाईंना दुडक्या उड्या मारायला लावल्या.


तीच गोष्ट मल्हारी गाण्याची. जिंकून कोण आले? पेशवे! नृत्याची शैली मात्र अफगाणी. आणि बाजीराव पेशवे झाले म्हणून काय ते असे लाथा झाडत नाचतील का? मस्तानी नजरकैदेत होती म्हणजे मुघल-ए-आझम मधल्या अनारकली सारखी साखळदंडांनी तिला वेढून ठेवलं नव्हतं हो भन्साळी. तिला तशी वागणूक दिली असती, तर तिच्या मुलाला तेव्हाच संपवलं नसतं का गेलं? आता भन्साळींना हे सगळं कुणी सांगायचं?

एक गोष्ट मात्र नक्की कि या चित्रपटामुळे ज्यांना मस्तानी म्हणजे "बाजीरावाची नाची" एवढंच माहित होतं, त्यांना तिची थोडीफार आणि अनपेक्षित असलेली माहिती नक्कीच मिळाली असेल. संजय लीला भन्साळींनी मस्तानीसारख्या गैरसमजात वेढल्या गेलेल्या ऐतिहासिक चरित्राची खरी बाजू उजेडात आणली हे बाकी आवडलं. "दिवानी-मस्तानी" गाणंसुद्धा छान आहे. त्यात दीपिकाने जे नृत्य केलं आहे, तसं नृत्य मला पिंगा गाण्यात अपेक्षित होतं. या जमेच्या बाजूंसाठी भन्साळींबद्दल मनात असलेला राग थोडा कमी झाला आहे.

No comments:

Post a Comment