26 July 2016

संरक्षण

तो डॉक्टरांच्या केबीनबाहेर अस्वस्थपणे येरझरा घालत होता. तिला नुकताच सातवा संपून आठवा लागला होता. सगळं सुरळीत सुरू होतं आणि अचानक आज सकाळी त्याला ऑफिसमध्ये फोन आला कि तिला अ‍ॅडमिट केलं आहे. का, कशासाठी या प्रश्नांची काही उत्तरं न देता फोन कट झाला होता. तो तसाच हॉस्पिटलमध्ये आला तेव्हा त्याला कळलं कि तिला खूप चक्कर येत होती म्हणून ती जी डॉक्टरांकडे गेली, ती तिथेच बेशुद्ध पडली.

लग्नानंतर तब्बल सहा वर्ष वाट पाहिली होती त्या दोघांनी. नातवंडं पाहाण्याची इच्छा जितकी त्याच्या आईवडिलांना होती, त्याहीपेक्षा जास्त हौस ह्या दोघांना आई-बाबा होण्याची होती. मागल्या सहा वर्षांत डॉक्टर, वैद्य, अगदी देवाधर्माचंही सगळं करून झालं पण त्यांच्या पदरी निराशाच पडली होती. आता सहा वर्षांनी ही गोड बातमी कळल्यावर तिला डोहाळे इतके कडक लागले होते कि त्याची अक्षरश: तारांबळ उडायची. आधीच दोघे रहायला परदेशात. तिथे सोबतीला ना त्याचे आईवडील, ना तिचे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जमेल तसं निभावून नेत होता. तिला तर खूपच त्रास व्हायचा पण आपल्या बाळाचा चेहरा पाहण्याच्या तुलनेत हा त्रास तिला काहीच वाटत नव्हता.

तिच्या सगळ्या टेस्ट झाल्या होत्या. जुळ्या मुली होणार आहेत, हे जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा दोघांचाही आनंद द्विगुणीत झाला. सहा वर्षं वाट पाहिल्याचं दान परमेश्वराने भरभरून ओंजळीत टाकल्यासारखं वाटलं दोघांना. भारतात दोघांच्याही आईवडिलांना ही बातमी कळल्यावर त्यांनी तिच्या आणि होणाऱ्या बाळांच्या आरोग्यासाठी जमतील तेवढे उपास-तापास, देवधर्म केला. सगळं छान चाललं होतं. कडक डोहाळे देखील तिला सुखावून जात होते आणि अचानक एक दिवस डोकं नेहमीपेक्षा जास्तच गरगरायला लागलं. थोडा वेळ सहन केलं, मग तिला राहावेना. तशीच डॉक्टरांकडे गेली आणि त्यांच्याशी बोलता, बोलता ती कधी खाली कोसळली हे तिचं तिलाही कळलं नाही.

"तुझ्या बायकोला मानेमध्ये ट्यूमर आहे." डॉक्टरांच्या या शब्दांनी जणू पायाखालची जमीनच कुणीतरी काढून घेतल्यासारखं वाटलं त्याला. तो सुन्न होऊन डॉक्टरांकडे पाहात होता.

डॉक्टरांनी त्याला भानावर आणलं, "निखिल, ऐकतो आहेस ना? तुझ्या बायकोच्या मानेमध्ये ट्यूमर आहे. आम्ही तो काढण्याचा पूर्ण प्रयत्न करू पण यश मिळेलच याची खात्री देता येत नाही."

"ती... ती प्रेग्नंट आहे" त्याच्या तोंडून कसेबसे शब्द बाहेर पडले.

"हो, आम्ही त्याही टेस्ट करणार आहोत." डॉक्टर पुढे त्याला आणखी माहिती देत राहिले पण त्याला त्यातलं काही कळत नव्हतं. नर्सने येऊन अमके, तमके फॉर्म्स भरायला सांगितले, ते तो यांत्रिकपणे करत होता. फॉर्म्सवर सह्या करून झाल्या आणि डॉक्टरांनी आणखी एक बातमी ऐकवली.

"आय अम सॉरी, निखिल. तुझ्या बायकोला आम्ही वाचवू शकलो नाही. पण तुझ्या जुळ्या मुलींना आम्ही आधीच शस्त्रक्रिया करून बाहेर काढलं आहे." डॉक्टर पुन्हा आत गेले.

ही बातमी चांगली म्हणावी कि वाईट हे त्याचं त्यालाही कळत नव्हतं. त्याने नुसती मान हलवून प्रतिसाद दिला. स्वत:च्याही नकळत त्याने भारतात आईवडिलांना फोन लावून ही बातमी दिली. आई-वडिल तिकडून धीर देत राहिले. "सगळी ईश्वराची इच्छा बाबा... निदान मुलींकडे पाहून तरी तुला खंबीर राहिलंच पाहिजे..."

आईवडिलांशी बोलून दहाच मिनिटं झाली असतील, डॉक्टरांनी पुन्हा येऊन एक बातमी ऐकवली.

"धिस इज सो अनफॉर्च्युनेट, निखिल. खरंच खूप दुर्दैवी बातमी आहे ही. तुझ्या जुळ्या मुली... दुर्दैवाने त्या दोघींच्याही मानेमध्ये तसाच ट्यूमर वाढतो आहे. जास्तीत जास्त ८ वर्षांच्या होईपर्यंतच जगू शकतील त्या. त्यांना जगवणं म्हणजे..."

"हे सगळं एवढ्या टेस्ट्समधून कसं कळलं नाही डॉक्टर?" असं ओरडून ओरडून विचारावंसं त्याला वाटत होतं पण त्याच्या तेवढे त्राणच उरले नव्हते. ते करून जर बायको आणि मुली परत आल्या असत्या तर तेही त्याने केलं असतं. त्याच्याकडे पाहून डॉक्टरांच्याही डोळ्यात पाणी आलं. वादळात घरटं मोडून पडलेल्या चिमण्यासारखा केविलवाणा दिसत होता तो. सोबतीला ना चिमणी होती, ना पिल्लं.

डोळ्यांतलं पाणी डोळ्यातच थिजवून त्याने सगळ्या फॉरमॅलिटीज, उपचार, सोपस्कार उरकले. बायकोच्या बॉडीसाठी त्याला नंतर बोलावलं जाणार होतं. कालपर्यंत सळसळतं चैतन्य असलेली त्याची पत्नी आज फक्त एक बॉडी होती. हॉस्पिटलच्या आवारातच लहान येशूला कडेवर घेऊन उभ्या असलेल्या मदर मेरीच्या पुतळ्यासमोर एक कारंजं होतं. त्याने खसक्‌न गळ्यातला ताईत ओढून काढला आणि त्या कारंजात फेकून दिला.

सर्वस्व लुटलं गेल्यावर कसलं संरक्षण आणि कुणापासून?

ही सत्यघटना आहे.

2 comments: