01 August 2016

कॅरोल इज हॅपी अ‍ॅन्ड हेल्दी!


लहानपणी खूप मस्तीखोर आणि चंचल असलेली कॅरोल आता लग्नानंतर एकदम पोक्त बाईसारखी वागायला लागली होती. तिच्या आईवडिलांनीच मुलगा पसंत केला होता - अल्बर्ट डि’कॉस्टा. हा माणूस एका मिलमध्ये काम करायचा. त्याचं कुटुंब फारसं मोठं नव्हतं. आई, एक मोठी विवाहित बहीण आणि तो बास. त्यात आता लग्नानंतर कॅरोलची भर पडणार होती. कॅरोलने पूर्वीपासूनच मोठ्या महत्वाकांक्षा बाळगल्या नव्हत्या, त्यामुळे अल्बर्टचं स्थळ नापसंत करण्यासारखं काहीच घडलं नाही.

नव्याची नवलाई संपली आणि कॅरोलच्या सासूने म्हणजे अल्बर्टच्या आईने एक दिवस कॅरोल आणि अल्बर्टला वेगळं व्हायला सांगितलं. कारण? अल्बर्टचं दारू पिणं. अल्बर्टच्या वागण्या बोलण्यातून तिला अल्बर्टच्या बापाची झलक दिसायला लागली. आयुष्याची २५ वर्षं तिने त्याचं दारूचं व्यसन आणि मारहाण सहन केली होती. आता पुन्हा तेच घडू पाहण्याची चिन्हं दिसत होती. तोच त्रास पुन्हा एकदा सहन करण्याची ताकद त्या वृद्ध स्त्रीमध्ये नव्हती. कॅरोलने सासूची बाजू समजून घेतली पण ती जिद्दीने अल्बर्ट सोबत बाहेर पडली. भाड्याच्या घरात का होईना पण आनंदाने राहू लागली. अल्बर्टच्या पिण्यात मात्र काही खंड पडला नव्हता. त्याला एक दोन वेळेस कमी पिण्याबद्दल तिने सुचवलं पण त्याने दुर्लक्ष केलं होतं. तो वेळेवर कामाला जातो, बाहेरख्यालीपणा करत नाही, एवढं कॅरोलला पुरेसं होतं.

पहिली मुलगी जन्माला आल्यानंतर मात्र अल्बर्टच्या पिण्याचा वेग आणखीनच वाढला पण मुलीच्या आगमनाच्या नादात कॅरोलचं तिकडे दुर्लक्ष झालं. मुलगी डेझी जेमतेम २ वर्षांची होती तेव्हा कॅरोलला पुन्हा दिवस गेले. दुसऱ्या मुलाच्या, जॉनच्या जन्मानंतर अल्बर्टच्या नोकरीवर तक्रारी सुरू झाल्या. कामाचे खाडे, कमी पगार आणि दारूचं व्यसन यातच अल्बर्टचं आयुष्य फिरत होतं. डेझी आणि जॉनला त्याने कधी प्रेमाने जवळ घेतल्याचंही कॅरोलला आठवत नव्हतं. संसाराला हातभार लावण्यासाठी कॅरोलने घरी शिकवण्या घ्यायला सुरूवात केली. अल्बर्टला त्या कशातच स्वारस्य नव्हतं. तो सतत नशेतच बुडालेला असायचा. मिलमधल्या बदलात्या शिफ्ट्स हे कारण पुरेसं होतंच, त्यात डेझी आणि जॉनच्या पाठोपाठ पीटरचं आगमन झालं आणि कॅरोलचं संध्याकाळच्या शिकवण्यांचं सत्र आता सकाळीही सुरू झालं. डेझी तेव्हा आठवीत गेली होती, जॉन सहावीत होता आणि पीटर तिसरीत गेला होता. त्यांच्या शिक्षणाचा खर्च वाढता होता, घरखर्च मोठे होते, जोडीला अल्बर्टचं व्यसन होतं पण कॅरोल आशावादी होती. चांगले दिवस येतील, याची तिला खात्री होती.

डेझी दहावीत गेली तेव्हाची गोष्ट, अल्बर्ट कुठूनतरी दारू पिऊन संध्याकाळी घरी परतला होता. घरातल्या दारूच्या आंबूळ वासाने कॅरोलचं डोकं उठलं होतं पण बोलायची सोय नव्हती कारण आता अल्बर्टला त्याच्या व्यसनावरून छेडलं तर तो वस्तूंची फेकाफेक करायचा. कॅरोलचे एक दोन विद्यार्थीदेखील त्यामुळे शिकवणी सोडून निघून गेले होते. तिने चुपचाप अल्बर्टला स्वयंपाकघरात झोपायला जागा करून दिली आणि बाहेरच्या खोलीत शिकवणी सुरू केली. अर्ध्या तासानंतर अल्बर्टच्या तोंडून निघणाऱ्या विचित्र आवाजांमुळे तिचं चित्त वेधलं गेलं. आत जाऊन पाहाते तो अल्बर्टच्या तोंडातून फेस येत होता. त्याला तसाच रिक्षात घालून दवाखान्यात घेऊन गेली, तिथे कळलं कि अल्बर्टच्या उजव्या बाजूला लकवा मारला आहे. त्याला उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं. पण कॅरोलच्या डोळ्यात एक टिपूस नव्हतं. समोरच्या बाकड्यावर बसलेल्या आपल्या तीन गोजिरवाण्या मुलांकडे पाहून तिने अश्रू रोखले होते.

सकाळी डॉक्टरांनी बातमी दिली कि अल्बर्ट आता नीट चालू फिरू शकणार नाही. अल्बर्टची नोकरी गेली हे उघडच होतं. कंपनीने त्याला सहानुभूती म्हणून निराळी नोकरी देऊ केली होती पण ते करण्यात अल्बर्टला स्वारस्य नव्हतं. शिवाय कंपनीकडून मिळालेले फंडाचे पैसे हीच त्याला आयुष्याची इतिकर्तव्यता वाटू लागली होती. त्या पैशांमध्ये कॅरोल किंवा त्याचा संसार हे काहीही वाटेकरी नव्हते. फक्त तो आणि त्याची दारू. कॅरोलला अल्बर्टबद्दल सहानुभूती होती पण लग्नानंतर सहा महिन्यात सासूने जी भविष्यवाणी केली होती, ती खरी ठरतेय असं कॅरोललादेखील वाटू लागलं होतं. संसाराच्या गाड्याचा पूर्ण भार तिच्या एकटीवर पडला होता. त्या हॉस्पिटलच्या घटनेनंतर तिने फक्त एकदा अल्बर्टकडे पैशांची मागणी केली होती, ती देखील डेझीच्या प्रोजेक्टसाठी तिच्याकडचे पैसे थोडे कमी पडत होते म्हणून पण अल्बर्टने रागाने तिला जवळच पडलेली रिकामी बाटली फेकून मारली. तो नेम कॅरोलने चुकवला पण अल्बर्टबद्दल तिला वाटत असलेली सहानुभूती मात्र संपली. तिने त्याच रात्री एक निर्णय घेतला.

सकाळी अल्बर्ट नेहमीप्रमाणे बाहेर पडल्यावर तिने तिन्ही मुलांना जवळ बोलावून सांगितलं, "पप्पांना मी पुनर्वसन केंद्रात दाखल करणार आहे. तिथे त्यांच्यावर योग्य उपचारही होतील आणि आपल्याला मन:स्ताप होणार नाही. पप्पांची नोकरी नाही आणि आपले खर्च खूप मोठे आहेत म्हणून मला आता जास्त पैसे कमावण्याची गरज आहे. त्यासाठी मला दुसरं मोठं काम शोधावं लागणार आहे. ते इथे नाही, परदेशात मिळेल, दुबईला. स्टेलाच्या मम्मीने मला सगळी माहिती दिली आहे, दुबईला काम करण्याची. मी तिथे राहून काम केलं तर इथल्यापेक्षा कितीतरी जास्त पैसे मिळतील, ज्यात तुमच्या शिक्षणाचा खर्च भागेल, घरखर्च भागेल, थोडीफार बचत करता येईल पण त्यासाठी तुमची एकटं राहाण्याची तयारी असली पाहिजे. पंधरा, तेरा आणि दहा वर्षांची मुलं ती. पप्पा तर लांब जाणारच पण मम्मीसुद्धा आपल्याला सोडून जाणार या कल्पनेने बिचारी केविलवाणी झाली. कॅरोलने त्यांना पोटाशी धरून त्यांची समजूत काढली. ना, ना खटपटी करून, ओळखींचा वापर करून तिने तिन्ही मुलांची व्यवस्था हॉस्टेलमध्ये केली आणि ती दुबईला रवाना झाली. सगळं देवाच्या भरवशावर होतं, फसवणूक होईल ही भिती होती पण मुलांच्या भवितव्याचा विचार करून कॅरोलने हा निर्णय घेतला होता.

दुबईमध्ये कॅरोल घरकाम करायची पण तिथे तुलनेत पगार खरोखरच जास्त होता. तिचा मालक शेख आणि त्याची बायको चांगले होते. त्यांनी कॅरोलला कधी भलत्या भानगडींमध्ये गुंतवून फसवलं नाही पण जेव्हा ती मलेरियाच्या तापाने फणफणून खूप आजारी पडली, तेव्हा मात्र तिला भारतात पाठवून दिलं. तिकडे औषधोपचारांचा खर्च खूप झाला असता म्हणे. कॅरोल आजारपणात परतली तेव्हा अक्षरश: अर्धमेल्या अवस्थेत होती पण मुलांचा अभ्यास थांबेल ह्या भितीने तिने आपल्या एकाही मुलाला आपल्या आजारापणाबद्दल सांगितलं नाही. मैत्रीणींच्या मदतीने कॅरोलने महिन्याभरतात आपले औषधोपचार पूर्ण केले. कॅरोलला परत जाण्याची इच्छा नव्हती पण दुसरा पर्यायही नव्हता त्यावेळेस. मग परत दुबईला गेली. नवीन घरात कामाला सुरूवात केली आणि पुन्हा कधीही इतकं गंभीर आजारी न पडण्याची खबरदारी घेतली.

कॅरोलने म्हटल्याप्रमाणे जिद्दीने मुलांचं शिक्षण पूर्ण केलं. थोडीफार बचत केली. भारतात स्वत:चं घर घेतलं. तिचा नवरा पुनर्वसन केंद्रातून अनेकदा पळून जाऊन पुन्हा स्वत:च परत गेला होता पण कॅरोल त्याच्याकडे लक्ष देत बसली असती तर दुबाईतलं काम सुटलं असतं. पुनर्वसन केंद्रात दरवर्षी पैसे भरून त्याला तिथेच ठेवणं, एवढंच ती करू शकत होती. केव्हातरी तो वारला पण त्याच्या जाण्याची ना कुणाला खंत होती ना खेद. त्याच्या आईलाही काही विशेष वाटलं नाही. कॅरोलने एक चांगलं स्थळ पाहून डेझीचं लग्न उरकलं. जॉनला चांगली नोकरी लागली, त्याने प्रेमविवाह केला. स्वत:चा ब्लॉकही घेतला होता. धाकटा पीटर उच्च शिक्षणासाठी परदेशी गेला.

फक्त ख्रिसमस आणि विशेष प्रसंगांनाच आपल्या मुलांना भारतात भेटायला येणाऱ्या कॅरोलने तब्बल १५ वर्षांनंतर भारतात कायमस्वरूपी परतण्याचा निर्णय घेतला, तेव्हा डेझी तिच्या संसारात रमललेली होती, जॉनला सुटी मिळत नव्हती आणि पीटरने परदेशातच सेटल होण्याचा निर्णय घेतला होता. पन्नाशी उलटून गेलेली कॅरोल कष्टाच्या पैशांनी विकत घेतलेल्या त्या टू बी एच के फ्लॅटला भकासपणे न्याहाळत होती. क्षणभर तिच्या डोळ्यांत पाणी तरळलं. हृदयात येणार कळ तिने सहन केली. दुबईत राहून कॅरोलने फक्त पैसे कमावले नव्हते, तर अनुभवही कमावला होता. खंबीर तर ती पूर्वीपासूनच होती. रिकाम्या भिंतींवरून नजर हटवत तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि एकेका मैत्रीणींचे नंबर्स डायल करायला सुरूवात केली.

शक्य होतं तेवढ्या सर्व जुन्या मैत्रीणी तिच्या फ्लॅटवर आल्या. मस्त पार्टी केली. दुसऱ्या दिवसापासून कॅरोलने आपल्या वाढत्या वयानुसार आवश्यक ते सर्व बदल घरात करून घेतले. हॉलमधल्या भिंतींवर छान पेंटींग्ज लावली. बाल्कनीत एक, दोन शोभेची रोपटी वगैरे. उदरनिर्वाहासाठी कुणासमोर हात पसरावे लागणार नाहीत, इतकी बचत कॅरोलने केली होती. आता मैत्रीणी अधून मधून गप्पा मारायला येतात, जुन्या छंदांकडे लक्ष द्यायला कॅरोलकडे भरपूर वेळ आहे, अगदीच कंटाळा आला तर केबलवर एखादी सिरीयल, सिनेमा पाहता येतो, रोज इमारतीसमोरच्या हिरवळीवर फेरफटका मारताना समवयस्क लोक भेटतात, तिथे बाकड्यावर बसून त्यांची सुखदु:ख समजून घेता येतात. कम्युनिटी सोशल वर्कमध्ये भाग घेऊन दुसऱ्यांना मदत करता येते. कॅरोलच्या मुलांना वाटतं कि इतकी वर्षं लांब राहिल्यामुळे मम्मीला आपल्याबद्दल काही मायाच उरलेली नाही पण कॅरोल त्यावर स्पष्टीकरण देण्याची तसदी घेत नाही. मुलांनी स्वत:हून फोन केला तर बोलते पण त्यांना "घरी या" म्हणत त्यांच्या गळ्यात पडत नाही आणि त्यांनी बोलावल्याशिवाय त्यांच्या घरी जातही नाही. आपल्या नातवंडांना उराशी कवटाळावं असं तिलाही वाटतं पण "स्पेस" देणं म्हणजे काय, हे ती दुबईत राहून शिकली होती.

मध्यंतरी कॅरोलने आपल्या ६५व्या वाढदिवसाची पार्टी दिली होती. त्यात तिच्या मित्रमैत्रिणींचा नाच, गाणी, दंगा, मस्ती भरपूर झाली. ज्यांनी तो सोहळा बाहेरून पाहिला त्यांनी कॅरोलबद्द्दल मनाला येतील तसे अंदाज काढले. तिच्या मुलांनाही ते काही आवडलं नाही. काही जणांनी "हिला म्हातारचळ लागलाय, आता हिने वृद्धश्रमात राहिलं पाहिजे" असंही म्हटलं. कॅरोलच्या एका मैत्रीणीच्या कानावर हे गेलं. ती म्हणाली, "जे असं बोलतात, ते लवकर बरे होवोत बट डोन्ट वरी अबाऊट कॅरोल. शी इज हॅपी अन्ड हेल्दी!"

सत्यघटनेवर आधारित

No comments:

Post a Comment