02 October 2016

राग, चीड, द्वेष, नैराश्य, मत्सर वगैरे

राग आणि चीड ह्या दोन शब्दांमधून व्यक्त होणारे भाव निरनिराळे आहेत बरं का? परिस्थितीबद्दल निर्माण होते ती चीड आणि व्यक्तीचा केला जातो किंवा व्यक्तीवर काढला जातो तो राग. दोन्हीमध्ये प्रचंड तफावत आहे. चीड ही तात्कालिक व तात्पुरती असते, पेटलेल्या कापरासारखी. चटकन पेटणे आणि चटकने विझणे ही चीड ह्या भावनेची वैशिष्ट्ये आहेत. अन्यायामुळे निर्माण होते ती चीड. ती भावना त्या व्यक्तिपेक्षाही जास्त त्या निर्माण झालेल्या परिस्थितीबद्द्ल असते पण याचा अर्थ अन्याय करणाऱ्या व्यक्तीवर आपण सतत रागावलेले असूच असं नाही. मात्र चीड निर्माण करणाऱ्या घटनेचे आपण वारंवार साक्षिदार बनलो कि तिचं परिवर्तन रागात होऊ शकतं आणि राग ही चीरकाल टिकणारी भावना आहे.

आपल्याकडे एक म्हण आहे, वड्याचं तेल वांग्यावर. तो हाच प्रकार आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल मनात राग असला आणि आपल्या संतापाच्या क्षणी नेमकी तीच व्यक्ती समोर आली तर त्या व्यक्तीचा आपल्यावर उद्भवलेल्या परिस्थितीशी काही संबंध नसतानाही आपण सगळा संताप त्या व्यक्तीवर काढून मोकळे होतो. राग हा असा असतो, राखेखाली दडलेल्या ठिणगीसारखा. फुंकर मारली तर सहज दिसेल पण दुर्लक्ष केलं तर आपल्या नकळत हळूहळू, धीम्या गतीने जे, जे शक्य असेल ते सर्व भस्मसात करेल.

चीड आली कि मोर्चे निघतात, आंदोलनं होतात आणि राग आला कि मनोरूग्ण, सिरियल किलर्स तयार होतात, असं मला वाटतं.

आता हे सांगण्याचं कारण म्हणजे, मला काही दिवसांपूर्वी इनबॉक्समध्ये जुन्या पोस्टच्या संदर्भात विचारणा करणारा मेसेज आला होता, "तुम्हीच म्हणाला होतात ना, कि मी कुणावर रागावत नाही. मग इतक्या रागारागाने पोस्ट का टाकल्या होत्या?" हा कुठल्या पोस्ट्सचा संदर्भ आहे, ते नेहमीच्या वाचकांना सांगावं लागणार नाही. त्या संदेशामधल्या दोन गोष्टींचं मला अनुक्रमे आश्चर्य आणि कौतुक वाटलं.

आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटलं कि असेही लोक जगात अस्तित्वात आहेत, ज्यांना वाटतं कि त्यांनी विचारलेल्या कुठल्याही प्रश्नाला इतरांनी उत्तर द्यायला बांधील असलं पाहिजे. आपण उत्तर नाही दिलं कि आपल्याला दुर्लक्षिलं गेलं आहे, हे लक्षात आलं कि ते पुन्हा आपल्या नवीन पोस्टवर येऊन, "कसा राग येत नाही हिला, तेच बघतो"च्या आवेशात मुद्दाम विखारी प्रतिक्रिया देऊन जाणात पण मुळात आपण काय वाचलं, त्याचा अर्थ काय आहे, हे समजून घेण्याची... कुवत... हा शब्द नको वापरूया... पण तयारीच नसलेले लोक अशा प्रतिक्रिया देण्यात अग्रेसर असतात. ती दुर्लक्षिण्याची कृती तुमचं तुम्हाला कळावं, हे न बोलता सांगण्यासाठी असते. असो.

मला कौतुक कशाचं वाटलं कि आपण इथे लिहिलेल्या लहान-सहान गोष्टींची दखल घेतली जाते, त्या लक्षात ठेवून लक्षात आणून दिल्या जातात. मला त्या मित्रमहाशयांना आणि त्यांना सांगण्याच्या निमित्ताने सर्वांनाच हे सांगायचं आहे कि जे काही व्यक्त झालं ती परिस्थितीबद्दल निर्माण झालेली चीड होती. आज क्ष व्यक्ती आहे, उद्या कदाचित ज्ञ व्यक्ती असू शकेल. व्यक्ती भिन्न पण परिस्थिती तीच. त्यामुळे तशी परिस्थिती निर्माण होण्यासाठी कोणते घटक कारणीभूत ठरले ह्यावर विचार करायला मला जास्त आवडेल. ह्या प्रक्रियेत स्वत:च्या व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असे घटक आपले आपल्यालाच सहज सापडून जातात. एकदा आत्मरिक्षण, स्व-अवलोकन जमलं कि पुढचं काम सोप्पं होऊन जातं.

हां, एखादी व्यक्तीच मुळात उपद्रवी स्वभावाची असेल तर आपण दोनच गोष्टी करू शकतो. एकतर त्या व्यक्तीच्या पातळीवर उतरून सूडाची संधी शोधण्यात वेळ वाया घालवू शकतो किंवा दुसरं म्हणजे एखादी अप्रिय गोष्ट, वस्तू, पदार्थ समोर दिसल्यावर ज्या प्रकारे नजर दुसरीकडे वळवतो, त्याप्रमाणे सूडाच्या संधी शोधण्याऐवजी आपल्या महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करू शकतो. कशाला प्राधान्य द्यायचं ते आपलं आपण ठरवायचं. कारण समजा त्या व्यक्तीचा सूड आपण उगवला तरी मनात राग खदखदत असेल तर तो व्यक्तीबद्दलचा राग नसून वृत्तीचा आलेला राग आहे. मग त्यावर सूड हा उपाय कसा असू शकेल? आपला व्यक्तिगत सूडाचा प्रवास पूर्ण झाला पण ती वृत्ती समूळ नष्ट करण्यासाठी आपण काही केलेलंच नाही.

इतरांना उपद्रव देण्याची भावना प्रत्येक मनुष्याच्या मनात सूक्ष्म रूपाने का होईना पण अस्तित्वात असतेच. मनुष्यस्वभावाचा तो एक भाग असावा. तीच भावना चीड आलेल्या किंवा राग आलेल्या प्रसंगी जास्त बलवान होऊ पाहते. मात्र मूळच्या सूक्ष्म पण सैतानी वृत्तीला पोषक खतपाणी घालून ती जोपासण्यापेक्षा, तिची वाढ कशी होणार नाही, किंबहूना ती समूळ नष्ट कशी करता येईल, याकडे आपण लक्ष केंद्रित करायला हवं असं मला वाटतं.

द्वेष, नैराशय आणि जळफळ या गोष्टी राग येण्यास कारणीभूत असलेल्या गोष्टी आहेत. अपेक्षित असलेला मान, सन्मान आपल्याला अपेक्षित व्यक्तीकडून मिळत नाही तेव्हा द्वेष व नैराश्य आणि अपेक्षित असलेलं सौख्य आपल्याआधी दुसऱ्या कुणाला तरी लाभलं यातून जळफळ निर्माण होते.

इथेही पुन्हा आत्मपरिक्षण आलंच. स्वत:च्या केवळ मानसिक, बौद्धीक आणि शारिरीकच नव्हे, तर आर्थिक कुवतीचंही आपण परिक्षण करायला हवं. सर्वांनाच सगळं मिळू लागलं किंवा सर्वांनाच सगळं जमू लागलं तर जग कसं चालेल? ही खूप फसवी समजूत वाटते ना? मग स्वत:च्या कुवतीचा सर्व अंगांनी पूर्ण विचार करा आणि आपल्याला नेमकं काय हवं आहे आणि ते कसं साध्य करता येईल, ह्याचा विचार करा. एखादी व्यक्ती सतत यशाच्या शिखरावर असेल तर त्यांनी ते यश टिकवून ठेवण्यासाठीही मेहनत घेतलेली असते. तशी मेहनत ते रोज घेत असतात. रोज नवीन काहीतरी शिकत असतात. स्वत:च्या अपयशातून धडे घेऊन लोक यशस्वी होतात. मग आपण काहीच न करता स्वत:वर अयशस्वी असण्याचा शिक्का आपण स्वत:च मारून घेण्याची काही गरज नाही.

आपलं जीवन आपणच चाकोरीबद्ध करून घेतलेलं असतं. चाकोरी तोडा म्हणजे नोकरी, धंदा जे काही असेल ते सोडून द्या असा अर्थ होत नाही. आपल्या रोजच्याच जीवनात घडणाऱ्या घटनांकडे सकारात्मक नजरेने पहायला शिका. अपेक्षा आपल्याच असतात आणि त्या पूर्ण नाही झाल्या तर निराशही आपणच होतो, मग अपेक्षांचं ओझं आपणच थोडं कमी करायला हवं.

नसेल भाव देत मला ऑफिसमधला तो ’क्ष’ इसम, नको देऊ देत. आपलं आपण काम करत रहावं. नसेल घरात माझ्या कामाची कुणी माझी स्तुति करत, न करेनात का! समजा, त्यांच्याकडून तुम्हाला आठ पैकी दहा मार्क मिळाले किंवा दहापैकी दहा मार्क मिळाले तर तुमच्या कामाचा ताण कमी होतो का? वेळ कमी लागणार असतो का? काही वेळा आपण अपेक्षांच्या कसोटीवर खरं उतरण्यासाठी स्वत:ला इतकं बदलून टाकतो कि आपलीच परिस्थिती केविलवाणी होऊन बसते. त्यापेक्षा आपलं जे काम आहे ते चोख करत राहावं. एखादी गोष्ट जर खरंच जमणार नसेल, तर ठामपणे नाही म्हणायला शिकावं. त्या ’नाही’मागचं कारण तुम्हाला माहित असेल तर तेही स्पष्टपणे सांगावं पण समोरच्या व्यक्तीला आपण आवडलो पाहिजे म्हणून आपलीच परिस्थिती बिकट करून घेऊ नये. आपणच स्वत:ला अशा परिस्थितीच्या तोंडी दिलं कि आपला विदुषक व्हायला वेळ लागत नाही.

जन्माला येताना कुणी मला अमूक व्हायचंय, मी अमूकच बनेन असं ठरवून जन्माला आलेला नसतो. आपल्या कुटुंबातील व्यक्तींचे विचार, आपली आवड-निवड, आपली आर्थिक व बौद्धिक कुवत यावर आधारीत हे निर्णय घेतलेले असतात. ते प्रत्येक वेळेस योग्यच असतील, तुम्हाला मान्यच असतील असं नाही पण आता ह्या प्राप्त परिस्थितीत आपण काय करू शकतो त्याचा विचार करावा. आपल्या छंदांना थोडा वेळ द्यावा. वेळ नाही, ही सबब जगातील प्रत्येक व्यक्ती सांगू शकेल. अगदी रांगणाऱ्या बाळांकडेही हल्ली वेळ नसतो. वेळ आपणच काढायच असतो. वेळ मिळाला कि संधीही आपोआप मिळतेच. एकदा हे गणित सुटलं कि मग आपला इतकी वर्षं मागे पडलेला छंदसुद्धा आपल्याला कसा आनंद देऊन जातो बघा. शेवटी आयुष्य हे वाळवंट म्हणून स्विकारलं तर आपली हिरवळही आपणच शोधायची आहे. न जाणो, एकदा ही हिरवळ सापडली कि तिथून आपल्या आयुष्यात पुढे केवळ हिरवाईच असेल. पण आधी ती हिरवळ शोधूया तर खरी.

वरील लेख हे लेखिकेचे व्यक्तिगत मत आहे.


No comments:

Post a Comment

Advertisement


Books I read

Amerikechi C.I.A.
पर्व [Parva]
LOPAMUDRA
Asurved
Sathe Faycus
Nazi Bhasmasuracha Udyast
Mahanayak - A fictionalized biography of Netaji Subhas Chandra Bose
Hullabaloo in the Guava Orchard
The Magic Drum And Other Favourite Stories
Yash Tumachya Hatat
Baba Batesharnath
Panipat
Swami
Shriman Yogi
Mandir Shilpe
Mantra Shrimanticha
Avaghe Dharu Supanth
Women & The Weight Loss Tamasha
Majhi Janmathep
Amrutvel


Kanchan Karai's favorite books »