Kanchan Karai's personal blog.

© 2020 मृण्मयी is an intellectual property of Kanchan Karai . Powered by Blogger.

न्याय समान हवा

0 comments
मी जेव्हा म्हणते कि आपल्या देशातील संस्कार, संस्कृती यातला बराचसा भाग स्त्रिया आणि योनिशुचितेवर आधारीत आहे ते अशा कारणांसाठी:
http://www.thehindu.com/news/national/hindu-son-can-divorce-wife-if-she-tries-to-separate-him-from-aged-parents/article9196572.ece

ज्या कारणांसाठी हिंदू पती आपल्या पत्नीला घटस्फोट देऊ शकतो, त्याच कारणांसाठी हिंदू पत्नीने तिच्या पतीपासून घटस्फोट का घेऊ नये? मी असं म्हणत नाही कि विवाहित स्त्रिया आपल्या नवऱ्यांना आईवडिलांपासून वेगळं राहाण्यास भाग पाडतच नाही किंवा असंही म्हणत नाही कि या केसमध्ये दिलेला निकाल चुकीचा आहे पण विवाहित स्त्रीच्या आईवडिलांना तिच्या नवऱ्याने सांभाळलं आहे अशी किती उदाहरणं आपल्या ओळखीत आहेत? त्यासाठीदेखील आता कायद्याचा आसरा घ्यायचा का?

पतीचं घर आपलं मानून राहाणाऱ्या सर्व स्त्रियांचे पती तिच्या आईवडिलांनाही तितकाच मान देतात का? पतीच्या आईवडीलांची काळजी घेणं ही जर पत्नीची जबाबदारी असेल तर पत्नीच्या आईवडिलांची काळजी कोण घेणार? ज्यांच्या घरी एकाहून अधिक अपत्य असतात, त्यांना यातली वेदना कदाचित कळणार नाही पण एकुलत्या एक मुलीला आपल्या आईवडिलांना एकटं सोडताना जीव वरखाली होत नसेल का? अशा किती एकुलत्या एक मुली हक्काने आपल्या सासूसासऱ्यांसोबतच आईवडिलांनाही सांभाळू शकतात. एक लग्नामुळे स्त्रीचं नाव, आयुष्य, जबाबदाऱ्या सगळंच बदलून जात असेल तर तिच्या भावनिक गुंतागुंतीचा विचार पती आणि त्याच्या आईवडिलांनीदेखील करायला नको का? प्रत्यक्ष पतीचे आईवडील आपल्या सुनेला अशा प्रसंगी पाठिंबा देत नाही. त्यांची ती वृद्धावस्था आणि सुनेचे आईवडिल दिवसेंदिवस तरूण होत असतात का? उलट सुनेला भाऊ असेल तर तिच्या आईवडिलांची जबाबदारी सासरच्यांकडून पूर्णत: टाळलीच जाते.

पाश्चिमात्य संस्कृतीचा धिक्कार करणाऱ्यांनी या बाबींकडे डोळे उघडून पाहण्याची गरज आहे. नाहीतर आता विभक्त कुटुंबपद्धतीकडून, अविवाहित कुटुंबपद्धतीकडे जायला वेळ लागणार नाही.

आपल्या देशातील संस्कार, संस्कृती यातला बराचसा भाग जसा स्त्रिया आणि योनिशुचितेवर आधारीत आहे, तसंच समस्त स्त्रियांनीच हे संस्कार आणि संस्कृती नाकारायचं ठरवलं तर विवाहसंस्थेच्या भिंती धडाधडा कोसळतील. लिव्ह इन रिलेशनशीप आणि सिंगल मदर ही संकल्पना तळागाळात रूजेल. बोलताना वाईट वाटतं पण पुरूषाची भुमिका एक शुक्राणू दाता एवढीच असेल, त्यावेळेस तो खऱ्या अर्थाने बिचारा झालेला असेल. स्वत:चं बिचारेपण सिद्ध करण्यासाठी मग फेसबुकवर स्त्रियांवरचे गचाळ विनोद पोस्ट करण्याची त्याला गरज पडणार नाही.

No comments:

Post a comment