Kanchan Karai's personal blog.

© 2020 मृण्मयी is an intellectual property of Kanchan Karai . Powered by Blogger.

मनाचा ब्रेक

0 comments
आज ’लोकसत्ता’मध्ये एक बातमी वाचली आणि सहा वर्षांपूर्वी व्यक्त केलेल्या मनोगताची आठवण झाली. परिस्थितीमध्ये काहीच बदल झालेला नाही, हे पाहून अस्वस्थ वाटतंय.

मुलं जरा मोठी झाली नाही की त्यांना गाडीचे वेध लागतात. मग गाडी चालवण्यासाठीची त्याची वयोमर्यादा पूर्ण झालेली नसली तरी काही आईबापांच्या दृष्टीने त्या गोष्टीला कवडीमोल किंमत असते. ’आपलं पोरगं ना, मग त्याला ड्रायव्हिंग येणारच’ असला फाजिल गैरसमज बाळगून बाळाच्या हातात गाडीच्या किल्ल्या सोपवल्या जातात. सोबतीला पालक स्वत:ही त्याला शिकवण्यासाठी गाडीत बसतात. हेतू हा की एकदा का लायसन्स मिळण्याएवढं वय झालं की मग ड्रायव्हिंगच्या शिकवण्या घेत बसण्यापेक्षा आधीच ’हात साफ’ केलेला बरा. पण या हात साफ करण्याच्या हट्टापायी पोरगं कुणाचं तरी आयुष्यच साफ करून टाकतं...

नुसतं पालकांना तरी का दोष द्यायचा? कधी कधी पालक योग्य वय होईपर्यंत मुलाला गाडी न देण्यावर ठाम असतात पण मुलाचे वयाने मोठे असलेले मित्रच त्याला गाडी चालवण्याकरता प्रवृत्त करतात. पोरगं धूम स्टाईलने बाईक चालवतं पण रात्रीच्या वेळेस रस्त्यात असलेला मोठा दगड त्याला दिसत नाही. गाडी दगडावरून उडून बाजूच्या फूटपाथला जाऊन आदळते आणि...

कधी कधी तर योग्य वयोमर्यादा पूर्ण केलेल्या व्यक्तीसुद्धा गाडी चालवताना स्वत:वर नियंत्रण ठेवू शकत नाही. इथे तर आपण ना मित्रांना दोष देऊ शकतो, ना त्या व्यक्तीच्या आईवडिलांना. सगळं समजत असूनही केवळ भन्नाट वागण्यासाठी गाडी बेसुमार वेगात चालवली जाते आणि वेग नियंत्रित करता आला नाही तर....

अगदी कुशल ड्रायव्हरसुद्धा रस्ता मोकळा मिळाला की गाडी भरधाव चालवतात आणि गाडीला वेग देण्याच्या उत्तेजनेमधे नकळत एखादी चूक करतात जी त्यांच्या आणि दुस-यांच्याही आयुष्याचा अंत व्हायला कारणीभूत ठरते.

या चुकांमुळे झालेल्या कित्येक घटनांची मी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष साक्षीदार बनले आहे. आपल्याच जवळच्या लोकांच्या आयुष्यात जेव्हा वर काही दिलेल्या प्रसंगांमुळे जेव्हा वाईट घटना घडते, तेव्हा मात्र नुसतं हळहळण्यापलिकडे काही करता येत नाही. लांबच्या पल्ल्याच्या प्रवासाला निघालं की एखाद्या ट्रकच्या मागे किंवा रस्त्याच्या कडेला वळणावर एक बोर्ड दिसतो - "मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक". मग हा ब्रेक आपण वापरायला नको का?

आपल्या छोट्याशा चुकीची किंमत आपल्यासकट आपल्याशी संबंध नसलेल्या कित्येकांना भोगावी लागते. पैशाने शारिरीक जखमांवर उपचार होतात पण त्या दुर्घटनेमुळे बसलेला मानसिक धक्का, वेदना, अश्रू, मनस्ताप यांची किंमत खरंच पैशात करता येते का?

मोगरा फुलला येथून पुन:प्रकाशित

No comments:

Post a comment