05 December 2016

मित्रहो,

फेसबुकची मित्रयादी कमी करणे म्हणजे काही विशेष असतं मला वाटत नाही म्हणून वारंवार मी जाहीर करत नाही पण उद्या मित्रयादीतील काही जण कमी झालेले दिसतील. ’ओन्ली फ्रेन्ड्स’ सेटिंग्जवर पोस्ट केल्यामुळे त्यांना हे स्टेटस उद्या यादितून काढल्यावर दिसणार नाही म्हणून आज पोस्ट करतेय.

माझे पब्लिक स्टेटस, नोट्स, लेख कॉपी होतात आणि मलाच माझ्या लेखनासाठी कॉपिराईटच्या नोटीस येतात, त्यामुळेच हल्ली माझं लेखन कस्टम सेटींग्जवर असतं, हे मित्रयादीतील बहुतांश सर्वांना माहित आहे. आपलं लेखन कॉपी केल्याचा त्रास नसतो पण आपलं लेखन दुसऱ्याच्या नावावर खपवलं जाताना बघण्याचा मन:स्ताप अनेक फेसबुक सदस्य सहन करत आहेत. मीही त्यातील एक. यावर कळस म्हणून मला माझ्याच लेखनासाठी प्रताधिकार भंगाची नोटिस फेसबुककडून यावी हे हास्यास्पद आहे, ह्यात रागापेक्षा मला फेसबुकच्या कमजोर कम्युनिटी स्टॅण्डर्ड पॉलिसीची कीव येते. असो.

ज्यांना ह्या परिस्थितीतून विकृत आनंद घ्यावासा वाटतो, त्यांनी तो घ्यावा; ज्यांची ’आपल्याला काय करायचंय’ अशी भूमिका आहे, त्यांची ती तशीच असावी पण मित्रांनो, ज्यांना माझा त्रास वाढवण्यात धन्यता वाटते, अशा बाजारबुणग्यांचे ’भाडोत्री निरोप्या’ होणं हे तुमच्या प्रतिष्ठेला भूषवणारं पद असेल तर मात्र तुम्हाला माझ्या यादीतून निरोप दिलेलाच बरा.

’ओन्ली फ्रेन्ड्स’ सेटिंग्जवर पोस्ट लिहिल्या कि त्या हातोहात कॉपी होताना दिसत आहेत, ह्याचाच अर्थ मित्रयादीमध्ये तुम्हाला अ‍ॅड करताना माझी निवड चुकली. आता ती दुरूस्त करायला हवी.

कदाचित तुम्ही हे हेतूपुरस्सर केलं नसेल, कदाचित तुम्ही ते केलंच नसेल पण कसं असतं कि जोपर्यंत हे प्रसंग आपल्यावर येत नाहीत, तोपर्यंत आपल्याला त्याची झळ लागत नाही. जेव्हा ही झळ लागते, तेव्हा भल्याभल्यांचा तोल जाताना मी पाहिलं आहे.

तर, हे जे काही लिहिलंय ते यादीतून वगळल्या जाणाऱ्यांसाठीच लिहिलेलं आहे. यादीतील बरेच जण निष्कारण वगळले जाणार आहेत याची मला पूर्ण कल्पना आहे पण माझा नाईलाज आहे. जे मित्र काही चूक नसतानाही वगळले जाणार आहेत, त्यांची आधीच क्षमा मागत आहे. आपण समजून घ्याल अशी अपेक्षा आहे आणि शत्रूत्व ठेवायचं असेल तरीही ठेवू शकता. कॉपी-पेस्ट विरूद्ध बंड करायला उठलेली अनेक मनं दुसऱ्या दिवशी थंड होऊन पाठित खंजिर खुपसताना मी काही वर्षांपूर्वीच पाहिली आहेत. त्यामुळे शत्रूत्वाची मला सवय झाली आहे.

Whatsapp वर रात्री दोन-अडीचला येणारे गचाळ संदेश, फोन, स्पॅम ईमेल्स आणि मिस्ड कॉल्स याव्यतिरिक्त व्हर्च्युअली शत्रूत्व ठेवणारे काही करू शकत नाहीत कारण समोर येऊन भिडायला जे धाडस लागतं ते भाडोत्री निरोप्यांमध्ये नसतं, याची मला पूर्ण खात्री आहे.

वाईट एवढ्याचंच वाटतं कि दुसऱ्याच्या त्रासामधून आनंद मिळवणं हीच जर तुमच्या जीवनाची इतिकर्तव्यता असेल, तर तुम्ही आयुष्यात किती एकटे पडले असाल हे तुमचं तुम्हालाच अजून कळलेलं नाही.

2 comments:

  1. अगदी १००% सहमत

    ReplyDelete
    Replies
    1. सोशल नेटवर्किंगवर असे अनुभव येणार हे माहित असूनही कधी कधी मन दुखावतं.

      Delete