19 December 2016

गुलाबी नोट

एक हजाराची नोट मोडण्याचा ताप कमी होता कि काय म्हणून आता दोन हजाराच्या नोटेला सगळीकडे फिरवावं लागतं. ही गुलाबी नोट (कि भैंस?) कुणीही स्विकारयला तयार होत नाही. मागल्या वेळेस शंभराच्या नोटा तुम्ही मला आणा राया! असं गुणगुणत नवऱ्याला प्रेमाने सांगता येत होतं. ह्यावेळेस तेही करता येत नाही. अति उद्वेगाने कधी कधी मनातून जे विचार बाहेर पडतात, त्याला कविता म्हणून प्राप्त परिस्थितीवर विनोद करावे लागतात.

मागल्या दोन्ही वेळेस गुलाबी नोटा मोडण्यासाठी मी आमच्या घराजवळच्या ’ज्योती’ उपहारगृहात जाऊन वडा सांबार खाऊन आले होते. तिथे दोन हजारांची नोट दिली कि सुटे पैस मिळायचे. त्या वडा सांबारची चव एवढी आवडली कि आता असं काही कारण नसलं तरी मी तिकडे वारंवार जाऊ शकते.

दिस आले ’ज्योती’कडे जाऊन
वडा सांबार खाण्याचे
गुलाबी नोटेला मोडून
सुटे पैसे मिळवण्याचे

त्यांनी सुट्टे दिले तर ठीकच
नाहीतर ऑनलाईन ट्रान्स्फर ठरलेलं
कार्ड नाही चाललं तरी
पेटीएम नाही चुकलेलं

वाटलं होतं आधीच विचारून
खात्री करून घ्यावी
पण सुट्टे मिळण्याच्या दिवास्वप्नाला
उगीच कात्री का मारून घ्यावी

तसा वडा सांबारही तिथला
छानच असतो म्हणा,
जीभेचे चोचले पुरवण्यासाठी
सुट्या पैशांचा बहाणा

No comments:

Post a Comment