फेसबुक मित्रयादीबद्दल नम्र सूचना


सर्व मित्रमैत्रीणींना नम्र विनंती आहे कि फेसबुकवर आजपर्यंत स्विकारलेल्या व स्विकारावयाच्या आगामी फ्रेन्ड रिक्वेस्ट्स कृपया पुन्हा तपासून पहाव्यात. फेक अकाउंट अ‍ॅड करण्याची चूक माझ्या हातून झालीच नाही, असं नाही मात्र लक्षात येताक्षणीच अशा "मित्रांना" दूर लोटले होते.

आपल्यापैकी अनेक जण मित्रयादीची संख्या ५००० पर्यंत जावी यासाठी येईल त्या विनंतीचा स्विकार करत असतात. ह्यात आपल्याला काही गैर वाटत नसेल परंतू आपण एकदा फेक खात्याच्या विनंतीचा स्विकार केला कि फेसबुकच्या अलिखित नियमानुसार त्या फेक खातेधारकाला आपल्या यादीतील लोकांची संभाव्य मित्र म्हणून "People you may know" अशा नावाखाली माहिती दिली जाते. यामुळे तुम्ही मित्रयादी अदृश्य ठेवल्याचा काहीही फायदा होत नाही. उलट तुमच्या मित्रयादीतील जास्तीत जास्त लोक अशा फेक खातेधारकांना मित्र म्हणून अ‍ॅड करून घेतात.

अनेक जण विचार प्रकटनाचे प्रभावी माध्यम म्हणून फेसबुकचा वापर करतात पण अद्याप फेसबुकच्या कार्यपद्धतीशी पूर्णत: परिचित नाहीत. आपले लेख कॉपी पेस्ट केलं जाणं हा मुद्दा इथे अतिशय गौण आहे. आपण आपल्या मित्रयादीमधील लोकांसोबत अनेक गोष्टी शेअर करतो, त्याचा गैरफायदा ही फेक खातेधारक मंडळी घेऊ शकतात. तुमच्या वाढदिवसाच्या तारखेवरून तुमचा PAN शोधण्यापासून ते तुमचा पाउटिंग लिप्सवाला सेल्फी "देसी गर्ल्स"सारख्या साईटवर डकवेपर्यंत काहीही घडू शकतं.

पायाखालून जमीन सरकण्याआधी सावध व्हा आणि खासकरून स्त्रियांच्या नावाने आलेल्या फ्रेन्ड रिक्वेस्ट्स तपासून घ्या. उद्या तुमच्यामुळे अप्रत्यक्षपणे ह्या फेक खातेवाल्यांचा त्रास होऊ लागला तर मित्रयादीची वजाबाकी अटळ आहे. हे काही आनंदाने किंवा आढ्यतेने लिहिलं जात नाहीए. अनुभवातून तावून सुलाखून निघाल्यानंतरचे बोल आहेत. पटलं तर स्विकारा. नाही पटलं तरी हरकत नाही पण पुढे जे होईल त्याला माझाही इलाज असणार नाही.

1 comment: