29 December 2016

टॅक्सीतला अनाहूत प्रवासी

टळटळीत दुपार झालेली. टॅक्सी तुफान वेगात चाललेली असूनही आत बसून उकडत होतं. तशातच सिग्नलला टॅक्सी थांबली. एक तर बाहेर भगभगतं उन, टॅक्सीचे पत्रे तापलेले, त्यात हा पाच मिनिटांचा सिग्नल. टॅक्सी थांबून पुरते दहा सेकंदही झाले नाहीत तोच जीव नकोसा करणारा उकाडा जाणवू लागला. श्शऽऽ असं करत कितीही रुमालाने चेहेर्‍यावर हवा घेण्या प्रयत्न केला तरी प्रचंड उकाड्यापुढे तो इवलासा रूमाल कमीच पडत होता.

तेवढ्यात बाजूला थांबलेल्या दुसर्‍या टॅक्सीकडे सहजच नजर गेली आणि एक विनोदी दृश्य दिसलं. टॅक्सीत मागच्या सीटवर बसलेला माणूस अर्धवट उठून हातात चप्पल घेऊन टॅक्सीच्या दरवाजाला ’मारू? मारू?’ अशी खूण करत होता. आधी वाटलं हा वेडा-बिडा आहे की काय? पण ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसलेला माणूसही तशाच खाणाखुणा करत होता. त्या टॅक्सीचा ड्रायव्हरही मधेच मागे मान वळवून काहीतरी सूचना करत होता. नेमकं काय झालं हे कळत नव्हतं पण टॅक्सीच्या आत काहीतरी होतं हे नक्की. कधी खाली वाक, कधी मागे बघ, मधेच झडप घातल्यासारखी अॅवक्शन कर, असे सर्व प्रकार त्या दोन माणसांनी टॅक्सीतल्या टॅक्सीतच केले. ड्रायव्हरचं सूचना देणं सुरूच होतं. मधेच तो ओरडला, "जल्दी करो, सिग्नल अभी छुटेगा." त्या दोन माणसांनी सर्कशीचे तेच तेच प्रकार आणखी वेगात करायला सुरूवात केली.

"झुरळ असणार", ट्रेनमधे अचानक दिसणार्‍या झुरळांचा अनुभव जमेस धरून मी मनाशी म्हटलं.

आता आजूबाजूला थांबलेल्या जवळपास सर्व वाहनांमधून लोकं डोकं बाहेर काढून हा काय प्रकार चालला आहे, ते पाहू लागली होती. तेवढ्यात टॅक्सीच्या ड्रायव्हरने जोरात ओरडून त्या माणसांना सांगितलं, "अरे, काच अजून खाली घे म्हणजे जाईल तो." टॅक्सीतल्या त्या गडबडीत बहुधा ती दोन माणसं काच पूर्ण खाली करायला विसरली होती. मागच्या सीटवरच्या त्या माणसाने काच खाली केली आणि एक गुबगुबीत उंदीरमामा टुणकन उडी मारून बाहेर पडले. युद्ध जिंकल्यावर तलवार म्यान करावी तशा थाटात त्या टॅक्सीतल्या माणसाने "हुश्श" म्हणत आपली चप्पल खाली टाकलीआणि तिकडे सिग्नल हिरवा झाला.

त्या पाच मिनिटांच्या सिग्नलमधे जर हा प्रकार घडला नसता, तर उष्म्याने जीव हैराण झाला असता आणि उन्हाची चीडही आली असती. पण उंदीरमामांच्या अनाहूत टॅक्सी प्रवेशाने ती पाच मिनिटे पटकन पसार झाली.

'मोगरा फुलला’ येथून पुन:प्रकाशित

No comments:

Post a Comment