23 January 2017

एक वो दिन था, एक ये दिन भी है ।

कबुतरांनी सगळ्या नवीन रोपांची नासधूस केल्यानंतर किचन गार्डनिंगची हौस फिटल्यात जमा होती. कितीही हाकला, जाळ्या लावा कबुतरं नासधूस करायची ती करायचीच. पुन्हा रिकाम्या कुंड्यांचा वापर अंडी घालण्यासाठी करण्याचीही त्यांची तयारी सुरू होती. टोमॅटोचा वेल, डेलियाची बारीक रोपं, मेथीचे रोम, लसणाच्या पाती सगळं, सगळं नष्ट झालं. वैतागून मी सर्व लहान-मोठ्या कुंड्यांमधली माती एकत्र केली; त्यात अत्यंत पौष्टीक असं गांडूळखत देखील होतं. ही माती तशीच ठेवून दिलेली होती. त्यात नामदेव उमाजीकडून आणलेलं प्राजक्ताचं रोपटं लावलं पण अवघ्या आठवड्याभरात ते वाळून गेलं. दोष मातीमध्ये नव्हता हे निश्चित कारण त्यात मी आधी लावलेल्या मिरचीच्या झाडाला अफाट मिरच्या आल्या होत्या.

नवीन काही पेरायला मन धजावत नव्हतं. बाजारातून आणलेल्या मोसंबीच्या बिया अगदी सहज म्हणून पेरल्या आणि आठवड्याभरातून चिमुकली हिरवाई हळूच डोकं वर काढून पाहू लागली. कोणतेही कष्ट न घेता उगवलेलं ते रोपटं उपटून टाकायला मन तयार होईना. मग त्याला वाढू दिलं. आता पावणेदोन वर्षांत चांगलं दीड फूट उंच झालंय पण त्याला फळ लागण्याची शक्यता कमी आहे. एकतर मुंबईची हवा आर्द्र आणि खारट, त्यात ते बी पासून उवलेलं रोपटं म्हणजे शक्यता जवळजवळ नाहीच पण तरीसुद्धा त्याला काढून टाकायला जीव होत नाही.

आता त्याच्यावर लिंबाचं कलम करून काही चांगलं घडलं तर ठिकच नाहीतर वाढू दे आपलं. थोडं मोठं झालं कि जमीनीत लावायला देईन आजूबाजूला बागेत कुठेतरी.

No comments:

Post a Comment