22 March 2017

हिंसा


फेसबुक फ्रेंड प्रसाद शिरगांवकरने डॉक्टरंवर झालेल्या हल्ल्याच्या निमित्ताने त्याच्या मनातील खळबळ बोलून दाखवली आहे. त्यावर मलाही व्यक्त व्हावसं वाटलं म्हणून हा लेखप्रपंच.

माझं व्यक्तीश: असं निरिक्षण आहे कि हिंसा दोन प्रकारांमधून केली जाते:
उपलब्ध परिस्थिती आपल्याला अनुकूल आहे म्हणून किंवा अगतिकतेमधून.

सत्तेचा, सामर्थ्याचा विनाकारण माज आला कि त्या व्यक्तीला हिंसा घडवून आणायला कारण लागत नाही. त्याच वेळी ज्या व्यक्तीवर ती हिंसा घडत असते, त्या व्यक्तीने हात उचलणं ही अगतिकतेमधून केलेली हिंसा असते. स्वसंरक्षणाशिवाय इतर कुठलाच पर्याय शिल्लक न राहिल्यामुळे आलेली अगतिकता.

डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याची संपूर्ण बातमी मी वाचलेली नाही, त्यामुळे त्यावर जास्त बोलू शकणार नाही पण हिंसेच्या कृतीचा केव्हाही निषेधच आहे.तूर्तास एवढं मत मांडू शकेन कि एखाद्या अनुचित कृतीला रोखणारी पर्यायी व्यवस्था कणखर नसली कि त्या कृतीची पुनरावृत्ती होणं अटळ आहे. एकदा हल्ला होणं ही प्रतिक्षिप्त क्रिया असू शकेल पण त्याची पुनरावृत्ती म्हणजे उघड उघड संधीचा फायदा घेणं आहे.

संजय लीला भन्साळीला माज आहे असं मला राहून, राहून वाटू लागलंय. प्रत्येक समूदायाच्या मनामध्ये काही विशिष्ट प्रसंगांसाठी संवेदनशीलता अजूनही जागी आहे. असं असताना रग्गड पैसा कमावण्यासाठी आपण त्यांची दुखती रग कलात्मकतेच्या नावावर छेडायची ह्या शुद्ध नीचपणा आहे. ’जोधा-अकबर’ला राजस्थानात कसा प्रतिसाद मिळाला हे माहित असताना, ’बाजीराव-मस्तानी’च्या विरोधात कसा गदारोळ उठला हे लक्षात असताना, ’पद्मावती’साठी तशाच प्रकारच्या चित्रीकरणाचा आग्रह धरणं ह्याला एकतर मूर्खपणा म्हणता येईल किंवा अट्टहास. महाराष्ट्रात चाललं ते राजस्थानातही चालेल, असं समजून वागणं म्हणजेच भोवतालच्या परिस्थितीचं काहीही भान नसणं आहे.

सोशल मिडीया साईट्सवर काय लिहावं, काय प्रसारीत करावं ह्याचेही काही मानदंड आहेत. आपण सर्वचजण ते पाळतो असंही नाही पण आपल्या संस्कारी मनांनी आपल्याला एक अदृश्य मर्यादा घालून दिलेली असते. त्यात आजच्या काळानुसार थोडा चावटपणा, थोडा भडकपणा सहन करण्याची शक्ती दिलेली असते. ह्या मर्यादेपलिकडचं काही बघितलं तर आपलंही पित्त खवळतं, रक्त उसळतंच. आपण त्याच्या पुढे जाऊन काही कारवाई करत नसतो पण ज्यांना कारवाई कराविशी वाटत असते, त्यांना व्यवस्थेतील त्रुटींचा पुरेपूर अंदाज आलेला असेल तर तिथेही न्याय मिळण्याची शक्यता धूसर आहे हे त्यांना फार पूर्वीच कळलेलं असतं.

दोन मिनिटं असं गृहित धरून चालू कि तत्सम वादांसाठी न्यायालयं असतात पण प्रक्ररण न्यायालय प्रविष्ट होऊन त्याचा निकाल लागेपर्यंत किती कालावधी जाईल आणि आपली बाजू कितीही योग्य असली तरी आजच्या परिस्थितीमध्ये निकाल आपल्या बाजूने लागलेच ह्याची खात्री नसलेल्या परिस्थितीमध्ये ’फैसला ऑन द स्पॉट’ करण्यासाठी हिंसेचा वापर होतो.

लहान मुलांना का मारतात पालक?
एखाद्या गुन्हेगाराला फाशी देणं म्हणजे काय असतं?

नीट परफॉर्मन्स न देणाऱ्या कर्मचाऱ्याला मेमो का दिले जातात? शिव्या का दिल्या जातात? तीही हिंसाच की! त्यात फक्त हातपाय चालवले जात नाहीत पण प्रभावी शब्दांचा वापर करून समोरच्यावर दडपण आणलं जातं.

एखाद्या समस्येवर किंवा प्रश्नावर आपण बिनतोड उत्तर देऊ शकणार नाही ह्याची जेव्हा खात्री पटते, तेव्हा हिंसेचा मार्ग अवलंबिला जातो. हिंसेच्या मार्गाने न्याय मिळेल न मिळेल पण आपल्याला जे सांगायचंय हे प्रभावी पद्धतीने सांगता येतं.

हे असं म्हणणं म्हणजे माझं हिंसेला समर्थन आहे, असं मात्र मुळीच नाही. हिंसेला माझा विरोधच असेल. मग ती शाब्दिक असो वा शारिरीक.

आपली बाजू योग्य असेल तर हिंसा योग्यच वाटते. उदा. पाकिटमाराची धुलाई, मुलीने रोड रोमिओ धडा शिकवणे पण हेच जर आपली बाजू योग्य असतानाही आपल्यावर हिंसेचा प्रयोग होत असेल तर तो अन्याय वाटू लागतो.

टाळी एका हाताने वाजत नसते. जाणूनबुजून केलेल्या कृत्यामुळे असो किंवा गैरसमजातून निर्माण झालेल्या विचारधारेमुळे असो, हिंसा करण्यासाठी काहितरी कारण असल्याशिवाय हिंसा घडत नाही. जर हे थांबवायचं असेल तर एकच उपाय आहे:

हिंसेची पातळी गाठण्याइतपत असंतोष निर्माण होत असेल तर व्यवस्थेतील त्रुटी दूर होणं सर्वाधिक आवश्यक आहे. कायद्याची, पर्यायाने परिणामांची भिती मनातून नष्ट झाल्यामुळेच हिंसा घडते. हिंसा करणाऱ्यावर अन्याय झालेला असो वा हिंसा सहन करणाऱ्यावर, दोघांनाही कायद्याची जाणीव असणं आणि तो कायदासुद्धा दोघांनाही न्याय मिळवून देण्यासाठी तितकाच समर्थ असणं आवश्यक आहे.

2 comments:

  1. ताई, अभ्यासपुर्ण आणि तर्कनिष्ठ विश्लेषण..

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद. हिंसेचं कारण शोधलं तर कदाचित उपाय देखील सापडू शकेल, असं वाटतं.

      Delete

Advertisement


Books I read

Amerikechi C.I.A.
पर्व [Parva]
LOPAMUDRA
Asurved
Sathe Faycus
Nazi Bhasmasuracha Udyast
Mahanayak - A fictionalized biography of Netaji Subhas Chandra Bose
Hullabaloo in the Guava Orchard
The Magic Drum And Other Favourite Stories
Yash Tumachya Hatat
Baba Batesharnath
Panipat
Swami
Shriman Yogi
Mandir Shilpe
Mantra Shrimanticha
Avaghe Dharu Supanth
Women & The Weight Loss Tamasha
Majhi Janmathep
Amrutvel


Kanchan Karai's favorite books »