05 April 2017

धर्मनिरपेक्षता अशी असते का?


हिंदूंच्या "धर्मनिरपेक्षतेचं" कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. हे मी हिंदू संस्कृतीबद्दल आस्था आहे म्हणून बोलत नाही. माझ्या दृष्टीने ज्या देशात धर्मापेक्षा देशहिताची काळजी जास्त वाहिली जाते, तोच खरा आदर्श देश असेल पण धर्मविविधता, संस्कृती संगम झालेल्या भारत देशामध्ये इतर धर्मांच्या तुलनेत हिंदू धर्मियांच्या भावना आपल्याच धर्माबद्दल बोथट झालेल्या आढळतात. कुणीही यावं, हिंदू धर्माला काहीही बोलावं आणि हिंदूंनी नंदी बैलासारख्या माना डोलावाव्यात असं झालं आहे.

एकवेळ असं करणं हे देखील आपल्या मृदू स्वभावाचं प्रतीक म्हणून मान्य केलं जावं पण एखादी दुसऱ्या धर्माची व्यक्ती हिंदू धर्माच्या चाली-रितींबद्दल गैरसमज पसरवणारे संदेश पाठवते, तेव्हा त्या व्यक्तीला थांबवण्याचे प्रयत्न करण्याऐवजी त्या संदेशाला चोख उत्तर देणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीलाच तसं करण्यापासून रोखणं हा प्रकार अगम्य आहे.

धर्मनिरपेक्षता अशी असते का?

WhatsAppच्या एका ग्रुपवर काही हिंदू महिलांनी रामनवमी निमित्त शुभेच्छा संदेशांची देवाण-घेवाण केली. त्यात इतर कुठल्याही धर्माविरूद्ध काही लिहिलेलं नव्हतं पण तो संदेश आल्यानंतर दुसऱ्या दिवशी ग्रुपमधील एका मुस्लीम महिलेला ’अल्लाह’चं स्मरण झालं. देवाचं स्मरण होणं ही निश्चितच चांगली गोष्ट आहे पण इतर धर्मियांनी पाठवलेले संदेश पाहून आपल्या धर्माच्या देवाची आठवण येणं हे स्मरण नव्हे.

ही तीच मुस्लिम महिला आहे जिने काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी महाराजांची हत्या, ब्राह्मण आणि गुढीपाडव्याचा संबंध जोडून एक गैरसमज पसरवणारा संदेश त्याच ग्रुपमध्ये शेअर केला होता. त्या संदेशातील एकूण एका वाक्याचं पुराव्यानिशी खंडन केल्यावर त्या महिलेने किमान इतकी समज राखायला हवी होती कि इतरत्र सापडलेले संदेश खात्रीलायक माहिती म्हणून कुठेही शेअर करू नयेत.

मला त्या मुस्लिम महिलेपेक्षाही वैषम्य वाटतं ते त्या ग्रुपमधील हिंदू महिलांचं. तो संदेश आल्यानंतरही त्यातील एकाही हिंदू स्त्रीला त्या मुस्लिम महिलेला खडसावून असं सांगावंसं वाटलं नाही कि "आमच्या धर्माबद्दल बोलू नका". आपल्याला इतिहास माहित नसेल पण जो धर्म आपल्याला जन्माने मिळाला म्हणून आपण अभिमानाने मिरवतो, ज्या धर्मातील चालीरितींचं पालन करून आपण संस्कृतीबद्दल आदर बाळगतो, त्याच धर्माविरूद्ध व संस्कृतीविरूद्ध अन्य धर्माची एक व्यक्ती काहीबाही बोलते आणि आपण तिला "थांब" देखील म्हणून शकत नाही?

ह्यावर कळस म्हणजे काही हिंदू महिलांनी मी पुरावे सादर करेपर्यंत आपापल्या घरी "ह्या वर्षीपासून गुढीपाडवा साजरा करायचा नाही" असं कळवूनदेखील टाकलं होतं.

काय हा वेडेपणा!

वर्षानुवर्षे आपल्यावर जे संस्कार झाले ते कालपरवा तयार केलेल्या एका WhatsApp ग्रुपमधील एका अन्य धर्मातील व्यक्तीच्या शेंडा-बुडखा नसलेल्या संदेशावरून भिरकावून द्यायचे?

हा प्रकार घडून गेल्यावर काल रामनवमीच्या संदेशांनंतर त्या मुस्लिम महिलेला पुन्हा नवीन वाद सुरू करण्याची इच्छा झाली. ’अल्लाह’शी संबंधित संदेश शेअर केल्यानंतर त्यावर काही प्रतिक्रिया आलेली नाही असं पाहून त्यांचं मानसिक धैर्य चांगलंच बळावलं.

’अन्न वाया घालवू नका’ हा संदेश निश्चितच चांगला आहे. अन्न अनेक प्रकारे वाया जातं. अन्य धर्मातील लोक कधीच अन्न वाया घालवत नाहीत असं म्हणणं हास्यास्पद ठरेल. मग संदेशाच्या प्रसारासाठी हिंदू देवतांवर केल्या जाणाऱ्या दुधाच्या अभिषेकाचंच चित्र का जोडलं जातं?

अभिषेकातून दुधाची नासाडी होते, तेच दूध गरिबांना देता आलं असतं ही वस्तूस्थिती मलादेखील मान्य आहे. कदाचित बहुतांश हिंदूंना ते पटतदेखील असेल पण अशा संदेशांना समर्थन देण्यापूर्वी तो संदेश कोणत्या धर्माची व्यक्ती, कुठल्या परिस्थितीमध्ये शेअर करते हे देखील जाणून घेणंदेखील महत्त्वाचं आहे.

एका मुस्लिम महिलेला हाच संदेश देताना स्वत:च्या धर्मातील त्रुटी का दिसत नाहीत?

ईदला निष्पाप जनावरांची हत्या करणं हे क्रूरतेच्या पठडीत बसतं, असा संदेश ती महिला का बरं देऊ शकली नाही?

सामाजिक भान, पर्यावरण समतोल, स्त्री-शोषण, स्त्री भ्रूण हत्या यासारखे संदेश देताना फक्त हिंदू धर्मातील चालीरितींनाच लक्ष्य का बनवलं जातं?

हिंदू धर्मीय म्हणून नाही, एक भारतीय म्हणून मला अशा गैरसमज पसरवणाऱ्या संदेशांचा तिटकारा आहे. धर्म कुठलाही असो, जर आपण त्या धर्माचं पालन करत नसू तर त्यातील चालीरितींवर टिका करण्याचा आपल्याला अधिकारच नाही.

एकदा हात जोडून केलेली विनंती त्या महिलेला समजली नसावी असं वाटलं म्हणून ग्रुपच्या अ‍ॅडमिनना फोन केला. यावर त्या अ‍ॅडमिन बाईंनी मला असं सांगितलं कि "त्या स्वत: ग्रुपमध्ये असे संदेश पोस्ट न करण्याबद्दल वॉर्निंग देतील पण त्या मुस्लिम बाई फार चांगल्या आहेत".

चांगल्या म्हणजे कशा? असं त्यांना विचारावंसं वाटत होतं पण त्या दिशेने संभाषणाचा प्रवास वळवण्याची ती वेळ नव्हती. शेवटी पुन्हा असा कुठल्याही धर्माची भावना दुखावणारा संदेश पोस्ट केला गेला तर मी स्वत: त्या व्यक्तीची पोलिस तक्रार करेन अशी ताकीद देऊन मी फोन ठेवला.

आपल्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीला कुणी काही बोललं तर आपण संतापाने पेटून उठतो, मग तो धर्म ज्याच्या जोरावर आपली संपूर्ण जीवनशैलीच अवलंबून आहे, त्याबद्दल कुणी उलट-सुलट बोलू लागलं तर विरोध करणं हे आपलं कर्तव्य नाही का? आपल्याला विरोध करायचा नसेल तर जी व्यक्ती पुढाकार घेऊन विरोध करत असेल त्या व्यक्तीला मागे खेचणं ही कुठली धर्मनिरपेक्षता आहे?

एकदा राजकारण आणि धर्म ह्यावर काही बोलायचं नाही म्हटलं तरी अशा गोष्टी अस्वस्थ करून जातातच.

1 comment:

  1. >>एकदा राजकारण आणि धर्म ह्यावर काही बोलायचं नाही म्हटलं तरी अशा गोष्टी अस्वस्थ करून जातातच.
    so true.

    ReplyDelete