24 May 2017

सॅनिटरी नॅपकिन्स आवश्यक/अनावश्यक?


अजब न्याय आहे आपल्या देशात! मासिक पाळी ही अशी नैसर्गिक क्रिया आहे जी फक्त स्त्रियांच्याच वाट्याला आली आहे. गंमत बघा, मासिक पाळी आली नाही तर स्त्रीला मूल होण्याची शक्यता नाही आणि पाळी आली तर त्या चार दिवसात तिचा विटाळ मानण्याची पद्धत आहे. ही रीत लोप पावली असं कृपया म्हणू नका कुणी. गाव-खेड्यांचं जाऊ दे, अजून मोठमोठ्या शहरात, मोठमोठ्या घरांमध्येदेखील "त्या चार दिवसांत" स्त्रीला बाजूला बसावं लागतं. पूर्वीसारखी अंधारी, अडगळीची खोली दिली नसेल बसायला पण तिचं बाजूला बसणं भाग असतं.

म्हणजेच स्वच्छता, सोवळ्या-ओवळ्याच्या दृष्टीने तो चार दिवसांचा काळ विटाळ म्हणून गृहीत धरणं योग्य आहे पण त्या चार दिवसांत स्त्रीची शारीरीक प्रकृती नाजूक झालेली असते, तेव्हा तिला जंतूसंसर्ग होऊ नये किंवा अस्वच्छ वाटू नये म्हणून मासिक धर्म शोषून घेण्यासाठी तिने सॅनिटरी नॅपकिन्स वापरणं अयोग्य कसं ठरतं?

भारतात आहे का पाण्याची सुबत्ता? घराघरातून, नळा-नळातून पाणी येतं? मासिक पाळी ह्याच विषयाशी संबंधीत एक लेख मी जानेवरीमध्ये लिहिला होता (http://blog.kanchankarai.com/2017/01/blog-25012017.html). मला अजून तरी परिस्थिती बदलेली दिसत नाही.

बायका अजून दूर-दूर पायपीट करून पाणी भरतात म्हणून भारतातल्या प्रत्येक घरात अजून नळ आलेले नाहीत. बायका अजूनही चुलीच्या मंद प्रकाशात आणि धगीत स्वयंपाक करू शकतात म्हणून घराघरात वीज आलेली नाही. पुरूष ही कामं करत नाहीत असं नाही पण आधिक्य आजही स्त्रियांचंच आहे. त्यात आता मासिक पाळीसाठी त्यांनी सॅनिटरी नॅपकिन्स वापरण आवश्यक नाही, हे बायकांची सहनशक्ती गृहीत धरून म्हणायचं का?

आजही अनेक खाजगी कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱ्या स्त्रिया तिथे असलेल्या प्रसाधनगृहांचा वापर करू शकत नाहीत. बाहेर पडल्यावर जवळच मॉल सापडला तर सुटका होते त्यांची. नाहीतर होता होईस्तोवर कळ दाबून ठेवतात. पुरुषाला काय, एक भिंत मिळाली कि मोकळं होता येतं (http://blog.kanchankarai.com/2014/10/blog-post.html).

सॅनिटरी नॅपकिन्स आवश्यक नाहीत किंवा टॅक्सेबल असावेत असं म्हणताना आपल्या नजरेसमोर अंदाजे किती बिकट परिस्थितीमध्ये राहणाऱ्या बायका असतात? सॅनिटरी नॅपकिन्स विकत घेणं परवडणार नाही अशासुद्धा स्त्रिया आहेत भारतात. कधी विचार केलाय त्या पाळीसाठी काय वापरतात? नैसर्गिक क्रिया, निसर्गाने घालून दिलेले नियम पाळण्यासाठी बायका आणखी परिक्षा देणार?

स्त्रियांना पाळीसाठी सॅनिटरी नॅपकिन्स वापरायला लागू नयेत अशी परिस्थिती निर्माण करणं बाजूलाच राहिलं; स्त्रियांची आहे तीच परिस्थिती आणखी बिघडवून कुणाला काय मिळणार आहे?

No comments:

Post a Comment