04 May 2017

मूल्य लपवावं का?


फेसबुकवर व्यवसायाच्या जाहिराती करणाऱ्या लोकांमधली एक गोष्ट मला कायम खटकत आली आहे, ती म्हणजे आपल्या उत्पादनाची किंमत जाहीर न करणे.

फेसबुकच्या खरेदी-विक्रीच्या ग्रुप्समध्ये वस्तूची किंमत त्या-त्या देशाच्या चलनात लिहून देण्याची सोय आहे. उत्पादनाचा तपशील लिहिण्याचीही सुविधा दिलेली आहे पण अनेक विक्रेते रू. १/- असं उत्पादनाचं मूल्य लिहून पुढे अमूक नंबरवर व्हॉट्सअ‍ॅप करण्यासाठी आवाहन करतात.

ह्यामागचं कारण मला अद्याप उमगलेलं नाही. प्रतिस्पर्धी विक्रेत्यापासून आपली किंमत लपवून ठेवावी म्हणावं तर खुद्द प्रतिस्पर्धीच आपल्याला फोन करून तपशील जाणून घेऊ शकतो.

ग्राहकाने दोन विक्रेत्यांकडच्या एकाच उत्पादनाच्या किंमतीची तुलना करावी असं म्हटलं तर ते ग्राहक नेहमीच करत असो. किंमत माहित नसो किंवा असो.

केवळ फेसबुकवरच हे होतं असं नाही. प्रत्यक्षात मी अनेक व्यक्तींना विविध क्लासेस किंवा खरेदी, विक्रीसाठी फोन करत असते. हे लोक व्हॉट्सअ‍ॅपवर आपल्या उत्पादनाच्या फोटोंचा अक्षरश: पाऊस पाडतात पण किंमत विचारली कि निघून जातात.

ह्याचा अर्थच कळलेला नाही.

वस्तू विकायची आहे कि नाही?

मला क्रोशाच्या क्लासेसची विचारणा करणारे अनेक फोन येतात. त्यात सगळेच शिकण्यासाठी फोन करतात असं मी मुळीच मानत नाही. आता तर प्रतिस्पर्धी कोण आणि संभाव्य विद्यार्थी कोण, हे देखील सवयीने कळू लागलंय पण तरीदेखील क्लासची फी लपवावीशी वाटली नाही.

ज्याला क्लासला यायचं असेल तो येणारच आणि ज्याला वस्तू विकत घ्यायची नसेल तो कितीही स्वस्त दर असला तरी विकत घेणार नाहीच. मग घुमेपणाने उगाच आपल्या व्यवसायाची गुणवत्ता कमी करण्यात काय अर्थ आहे?

No comments:

Post a Comment