Kanchan Karai's personal blog.

© 2020 मृण्मयी is an intellectual property of Kanchan Karai . Powered by Blogger.

मध्यरात्री सुरू असलेल्या चित्रीकरणाचा उपद्रव

0 comments

एकदा तुम्ही गळेपडूपणा सहन केलात की त्याचं रूपांतर मुस्कटदाबीमध्ये व्हायला वेळ लागत नाही.

दि. ३१ मे २०१७

स्थळ: दादर पारसी कॉलनी

वेळ - रात्री ११:५३
शेजारील इमारतीमध्ये होणारं चित्रपटाच्या दृश्यांचं चित्रीकरण फक्त त्या इमारतीपुरतंच मर्यादित न राहता आता त्याने रस्ता व्यापला आहे. सकाळी १० च्या सुमारास सुरू झालेल्या ह्या चित्रीकरणामध्ये एक मिरवणुकीचा प्रसंग असल्याने एक सजवलेली टेम्पोगाडी आणि तिच्यासोबत हातात ध्वज घेऊन नाचणारी मुले रस्स्यावर फिरताहेत. त्यांच्या आवाजने संपूर्ण परिसर दणाणून गेला आहे. खिडक्यांच्या काचा लावूनही मिरवणूकीचा आवाज घरात येतोच आहे. आसपासच्या परिसरातून शूटिंग पहायला आलेले बघेही आहेत. अवतीभोवती राहणाऱ्या व रात्रीच झोपणाऱ्या रहिवाशांनी घरातले दिवे बंद केले तरी खिडक्यांवरील पडद्यांचे अडथळे भेदून त्यांच्या घरात उजेड शिरेल इतका तीव्र प्रकाश असलेले मोठमोठे फ्लड लाईट्स उंचावर लावण्यात आलेले आहेत. ह्या चित्रीकरणामुळे डॉ. आंबेडकर मार्गावरून (हायवे) खोदादाद सर्कलच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता हे निराळं सांगायची गरज नाही.

माटुंगा पोलिस ठाण्यात सदर उपद्रवाची माहिती दिल्यानंतरही उपद्रव संपला नाही, उलट व्याप्ती वाढलीच.

वेळ - रात्री १२:५७
उपद्रव संपला नसल्याने व स्थानिक पोलिसांकडून अपेक्षित मदत न मिळाल्याने मी मुंबई पोलीस व मुंबई पोलीस कमिशनर ह्यांना सदर प्रकाराची माहिती देण्यासाठी ट्विट केले. मोजून चारच मिनिटांत त्यांनी प्रतिसाद दिला. आता तरी उपद्रव थांबायला हरकत नव्हती पण तसे घडले नाही.

वेळ - रात्री १:५५ (आता तारीखही बदलली - १ जून २०१७)
पोलिसांकडून प्रतिसाद न मिळाल्याने शेवटी बाल्कनीत उभं राहून चित्रीकरणासाठी आलेल्या लोकांना 'चित्रीकरण थांबवा' असे सांगावे लागले पण त्यावर "हमारे पास परमिशन है" असे उत्तर उद्दामपणे आम्हाला देण्यात आले. नाईलाजाने त्यांना कळेल अशा भाषेत 'आम्ही खाली येऊन तुमचा आणि तुमच्या अमूल्य वस्तूंचा सत्कार करू शकतो' हे सांगावे लागले.

तत्क्षणी मोठमोठाले दिवे बंद झाले. बघ्यांची गर्दी ओसरली. सामानाची झाकपाक झाली. श्रीमंत गाडयांनी काढता पाय घेतला आणि चित्रीकरण केवळ डॉ. आंबेडकर मार्गापुरतं मर्यादीत झालं. रात्री पावणेतीनच्या सुमाराला संपूर्ण चित्रीकरण आवरतं घेतलं गेलं.

चित्रीकरणासाठी आलेल्या लोकांनी कमिशनर साहेबांचीदेखील परवानगी असल्याचा दावा केल्याने पुन्हा माटुंगा पोलिस ठाण्यात फोन केला असता तेथे कर्तव्यसेवेत उपस्थित असलेले पोलिस उप-निरीक्षक सपकाळ ह्यांनी त्या माहितीला दुजोरा दिला.

दिवसा ह्या परिसरात चित्रिकरण केलं जाणं हे सवयीचं झालं आहे. वाहतुकीला अडथळे, ध्वनिप्रदूषण हे इथल्या शांततेचा भंग करतात पण ते सहन करून येथील रहिवासी चित्रीकरणाच्या उपद्रवाकडे दुर्लक्ष करतात. मात्र त्यांचं दुर्लक्ष करणं ही त्यांनी दिलेली मूक परवानगी नव्हे.

एखाद्या निवासी परिसरात चित्रपटाची दृश्ये चित्रित करण्यासाठी वेळेचे काही नियम नाहीत का?

चित्रीकरण रात्री १० नंतरच करायचे असेल तर त्या परिसरातील रहिवाशांना दोन दिवस आगाऊ सूचना देणं हे चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, महानगरपालिका आणि पोलिस कमिशनर ह्यांचं कर्तव्य नाही का?

निरनिराळ्या कारणांनी समाजात असंतोष इतका वाढलेला आहे कि संधी मिळताच स्त्रीचा विनयभंग करणे, चोरी करणे, चालत्या लोकलमधील प्रवाशांना दगड फेकून मारणे, घाण टाकणे, संप-आंदोलने करणे अशा मिळेल त्या मार्गाचा अवलंब करून परिस्थितीने गांजलेला मनुष्य आपले नैराश्य बाहेर काढत असतो व सुटकेचा मार्ग शोधत असतो. त्या नैराश्याला संपवणे ही दीर्घकालीन प्रक्रिया असली तरी व्यक्त होण्यासाठी समाजाला घातक असे मार्ग किमान स्वत:हून उपलब्ध करून देऊ नयेत, ह्याचं भान आपण ठेवू शकत नाही का?

आपल्या वाहनांच्या व घराच्या सुरक्षिततेसाठी रहिवाशांनी इमारतींमध्ये CCTV कॅमेरे बसवून आपल्या इमारतीपुरतं संरक्षण चोख ठेवलेलं आहे. पण इमारतीबाहेर रात्रभर उभ्या असलेल्या गाड्यांची संख्याही कमी नाही. एरव्ही एक-दोन गाड्यांच्या काचा फोडल्या जाणं, म्युझिक प्लेयर, गाड्यांची प्रतीक चिन्हं चोरीला जाणं हे प्रकार नवीन नाहीत. पुरातन किगेलियाच्या (sausage tree) वृक्षांवर चढून फळं काढण्याच्या उद्देशाने इमारतीच्या वरच्या मजल्यांवरील घरात डोकावणाऱ्या लोकांना तर आम्हाला दिवसादेखील हाकलावं लागतंच पण संध्याकाळी सात वाजता एकट्या-दुकट्या स्त्रीने दादर पारसी कॉलनी विभागातून चालत जाणं किती असुरक्षित आहे हे स्वत: पोलिस सांगू शकतील. मग चित्रीकरणासाठी लावलेल्या मोठ्या दिव्यांच्या उजेडात इतर बघ्यांचं लक्ष चित्रीकरणाकडे एकवटलेलं असताना, चुकीच्या उद्देशाने त्या ठिकाणी आलेल्या लोकांना आपणच परिस्थिती अनुकूल करून देत नाही का?

इनव्हिक्ट्स इमारतीच्या बांधकामामुळे उडणारी सिमेंट, वाळू मिश्रित धूळ, ध्वनी प्रदूषण गेली ५ वर्षे आम्ही सहन करत आहोतच पण महानगरपालिकेची अतिमहत्त्वाची कामं रात्रभर सुरू असतात. ते सार्वजनिक काम असतं म्हणून आम्ही हरकत घेऊ शकत नाही. मात्र चित्रीकरणामुळे अचानक माथी मारलं जाणारं ध्वनीप्रदूषण, झोपेचा व्यत्यय आम्ही का सहन करावा? पारसी कॉलनीत रात्री झोपणारे लोक राहात नाहीत असं वाटतं का? कि शक्यतो उसळून बोलणं हा पारसी कॉलनीतल्या लोकांचा स्वभाव नसावा असं गृहीत धरून रात्रभर चित्रीकरणाला परवानगी दिली जाते?


पोलिस ठाण्याचे अधिकारी आमच्या विभागात अनुचित घटना घडू नयेत म्हणून गस्त घालत असतात असं ऐकून आहे. तीन-चार वर्षांपूर्वी एक बेवारशी गाडी बिघडलेल्या हॉर्नचा कर्कश्श आवाज करत दोन दिवस कॉलनीतील एका इमारतीच्या खाली उभी होती. रहिवाशांनी सोशिकपणे ते सहन केलं पण रात्री गस्त घालणाऱ्या पोलिसांना ती गाडी कशी दिसली नाही, ह्याचं मला आश्चर्य वाटतं. त्या गाडीचा नंबरही महाराष्ट्रातील नव्हता. दोन दिवसांनी मी स्वत: त्या गाडीच्या विंडशिल्डवर हॉर्न बंद करण्याविषयी एक विनंतीचा कागद लावून आहे होते पण बहूधा गाडीचा मालक ती गाडी सोडून गेला असावा. सरतेशेवटी त्या रात्री पोलिसांना फोन करून ती गाडी "टो" करण्याची विनंती करावी लागली.

मी स्वत: गेले वर्षं-दीड वर्ष प्रकृती अस्वास्थ्याने त्रस्त आहे. माझे पतीदेखील गेले १०-१२ दिवस आजारी आहेत. ही आमची व्यक्तीगत अडचण आहे पण आमाची दुखणी सौम्य वाटावीत इतके गंभीर आजारी लोक ह्या विभागात राहातात. तसे ते सर्वच ठिकाणी असू शकतील. उकाड्याने त्रस्त झालेल्या ह्या लोकांना आजारपण व औषधांमुळे वातानुकूलीत वातावरण सहन होत नाही, ज्येष्ठवयीन व्यक्तींना निद्रानाशामुळे आधीच अस्वस्थता आलेली असते, लहान मुले व दुसऱ्या दिवशी नोकरीवर जाणारे लोक ह्यांनाही आपापल्या परिने ह्या निरनिराळ्या प्रदूषणांचा त्रास होत असतोच. करमणूकीसाठी तयार केल्या जाणाऱ्या चित्रपटासाठी आम्ही असुविधा का सहन करावी?

ज्या, ज्या अधिकाऱ्यांनी ह्या रात्रीच्या चित्रीकरणाला परवानगी दिली त्यांना मला नम्रपणे विचारावंसं वाटतं कि चित्रीकरण करण्यासाठी विविध परवानग्या आगाऊ घ्याव्या लागत असतील, तर चित्रीकरण करत असलेल्या विभागातील रहिवाशांना आगाऊ सूचना देण्यात काय अडचण येते? एक पत्रक सोसायटीच्या सूचना फलकावर लावलं तरी कळतं.

जर अशीच परिस्थिती आपल्या घरासमोर उद्भवली असती तर आपण काय केलं असतं?

No comments:

Post a comment