18 August 2017

Sarahah च्या निमित्ताने

काही वर्षांपूर्वी मी एका KPO मध्ये कामाला होते. एक दिवस टिम लिडरला काय सुरूसुरी आली, त्याने जाहीर केलं कि "आज काम संपल्यावर आपण एक रोस्ट सेशन घेणार आहोत". म्हणजे काय कि एका व्यक्तीला समोर उभं करायचं आणि त्याच्यावर टिका करायची. समोरच्या व्यक्तीने काहीही वाद न घालता ते ऐकून घ्यायचं.

झालं! प्रत्येकाला काही ना काही सांगितलं गेलं. जे लोक टिम लिडरच्या मर्जीतले नव्हते, त्यांच्याबद्दल लक्षात येत नसलेल्या अनेक गोष्टी टिम लिडरच्या लक्षात आल्या. जे लोक टिम लिडरच्या कृपाछत्राखाली होते, त्यांच्यावरही शेरेबाजी झाली.

कुणीतरी विचारलं कि "फक्त वाईट का सांगायचं? चांगलं का नाही?" तर म्हणे, "चांगल्या गोष्टी सांगितल्याने काही फरक पडत नाही पण वाईट गोष्टी सांगितल्याने ती व्यक्ती पुढल्या वेळेस तसं वागताना दहा वेळा विचार करते".

आता T.L.च तो, त्याच्या मर्जीबाहेर आपण काय जाणार? संधी मिळाल्यामुळे प्रत्येकानेच दुसऱ्याबद्दल हवं ते सांगून आपला आत्मा सुखावून घेतला. शेवटच्या मुलाला बाण मारून झाले आणि सर्वांनी निघण्याची तयारी केली. तेवढ्यात कुणाला तरी लक्षात आलं कि अरे, सर्वांचं रोस्टिंग झालं पण T.L. चं काय?

बस! तेवढं लक्षात येण्याची खोटी होती. सगळ्यांनी ड्रॉपची गाडी सुद्धा सोडली आणि बाह्या सरसावून बसले.

तो दिवस आमचा T.L. आयुष्यात कधी विसरू शकेल असं वाटत नाही.

त्यानंतर एका निराळ्या B.P.O. मध्ये व्हॉईस ट्रेनरने ट्रेनिंग ऐवजी स्वत:ची इतकी लाल करायला सुरूवात केली होती कि ट्रेनिंगमधूनच नोकरी सोडावी कि काय असं वाटू लागलं होतं. आपल्या आवाजाची आणि डबिंग इंडस्ट्रीत, तेही इंग्रजी डबिंगमध्ये मास्टरी मिळवल्याची इतकी आढ्यता कि त्याच क्षेत्रातील अत्यंत दिग्गज आणि नामवंत कलाकारांची नावं मी संगितल्यावर एक तुच्छ प्रतिक्रिया त्याने मला दिली. तो प्रकारच डोक्यात गेला.

शेवटच्या दिवशी फिडबॅक फॉर्ममध्ये मी न राहावून ’हा माणूस आत्मकेंद्रित आहे’ असं लिहिलं. निनावी फिडबॅक असला तरी अक्षरावरून कुणी लिहिलंय ते त्याला कळणार होतंच. त्या दिवसानंतर गडी लाईनीवर आला. येता-जाता हाय, हॅलो करून बोलायला लागला.

आज हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे Sarahah ह्या अ‍ॅपची हल्ली खूप चर्चा सुरू आहे. दोन महिन्यांपूर्वीच हे अ‍ॅप आलंय पण अल्पावधीत त्याने प्रचंड लोकप्रियता मिळवलीय. अनेकांना उत्सुकता आहे कि हे अ‍ॅप म्हणजे काय? तर हे अ‍ॅप म्हणजेच वर सांगितलेले दोन प्रकार.

आपण ह्या अ‍ॅपवर जाऊन आपलं खातं तयार करायचं कि आपल्याला एक लिंक दिली जाते. ती लिंक आपण आपल्या मित्र-मैत्रीणी किंवा आपले ज्या-ज्या कुणाशी संबंध आहेत, त्यांना द्यायची आणि सांगायचं कि माझ्याबद्दल आपली प्रतिक्रिया द्या. प्रतिक्रिया देणाऱ्या व्यक्तीचं नाव गुप्त राहातं त्यामुळे आपण त्या व्यक्तीबद्दल मनात आकस धरू शकत नाही पण प्रतिक्रिया देणाऱ्याने आपल्याला वागणूकीत सुधारणा करण्यासाठी काही सल्ले दिले असतील तर त्याचा आपल्याला उपयोग होतो.

"ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे" ह्या उक्तीनुसार कुणी आपल्याबद्दल काय बोलतंय ह्याची तमा न बाळगणाऱ्यांना ह्या अ‍ॅपची गरजच नाही. मात्र स्वत:मधील गुणदोषांची खातरजमा करून आपल्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडवून आणणाची अपेक्षा बाळगणाऱ्यांना ह्या अ‍ॅपचा चांगला उपयोग होऊ शकतो. कधी कधी असं होतं ना कि एखाद्या व्यक्तीबद्दल पूर्वग्रहदूषित मत असल्याने त्याने काहीही सांगितलं तरी ते चुकीचंच वाटतं. अश्या परिस्थितीमध्ये स्वत:च्या कानउघडणीसाठी ह्या अ‍ॅपचा खूप उपयोग होईल.

हे अ‍ॅप फेसबुक किंवा ट्विटरसारखं नाही. तुम्हाला सरळ,सरळ एक इनबॉक्स दिलेला आहे आणि ज्या कुणाला तुमच्या प्रोफाईलची लिंक मिळाली आहे, ती कुणीही व्यक्ती तिथे जाऊन प्रतिक्रिया देऊ शकते. तुमची इतर माहिती तिथे विचारलेलीच नाही.

प्रत्येक तंत्रज्ञानाला चांगली-वाईट बाजू असते. तंत्रज्ञान मुळात वाईट नाही. ते हाताळणाऱ्या व्यक्तीची बुद्धी किती परिपक्व आहे ह्यावर त्या तंत्रज्ञानाचा वापर अवलंबून आहे. त्यामुळे तुम्ही ह्या अ‍ॅपवरची तुमची लिंक इतरांना दिल्यावर फक्त सुधारणेसाठीच प्रतिक्रिया येतील अशी अपेक्षा ठेवू नका. तुमच्याबद्दल आकस धरून बसलेली मंडळी तुम्हाला मन:स्ताप देण्यासाठी कमेंट पर्यायाचा पुरेपूर वापर करू शकतात. ज्यांना उघडपणे तुमच्याविरूद्ध बोलताना तोंडातून शब्द फुटत नसेल किंवा जे लोक सोशल नेटवर्किंगवर वरकरणी तुमची हांजी हांजी करत असतील पण मनात तुमच्याबद्दल किल्मिष बाळगून असतील, त्या लोकांसाठी ही सुसंधी आहे.

तेव्हा विचार करून हे अ‍ॅप वापरा. तुमचे मित्रमैत्रीणी तुम्हाल तोंडावर तुमच्या चुका सांगू शकत असतील तर शत्रू तुमच्याबद्दल काय बोलतात ह्याची पर्वा तुम्ही का कराल?

आणि ज्यांना असे भक्कम मित्रमैत्रीणी असतील, त्यांना ह्या अ‍ॅपची गरज का असेल? स्वानुभवाने सांगतेय.

No comments:

Post a Comment