Kanchan Karai's personal blog.

© 2020 मृण्मयी is an intellectual property of Kanchan Karai . Powered by Blogger.

तोच तो भन्साळी, तेच ते घूमर आणि तेच ते पद्मावत

0 comments
खरं तर ह्या सगळ्या प्रकाराला ’विन-विन सिच्युएशन’ म्हणायला हवं. म्हणजे भन्साळीने आधी ’घूमर’ प्रदर्शित केलं, तेही गाण्यात बरीच काट-छाट करून, मग त्याच्यावर करणी सेनेने आक्षेप घेतला, खूप धुरळा उठला पण फायदा झाला तो भन्साळीला कारण सिनेमा प्रदर्शित होण्याची तारीख लांबण्याची लक्षणं दिसू लागली आणि YouTube वरच्या घूमरचे हिट्स दुपटीने वाढले. ’पद्मावत’ प्रदर्शित झाल्यावर तो मजबूत चालणार ह्याची खात्री निर्माण झाली.

वरकरणी पाहता पद्मावत चित्रपटातील ’घूमर’ हे पारंपारिक व आजच्या बॉलिवूड नृत्यांच्या तुलनेत अतिशय संयत असं नृत्य वाटतं पण राजपूतांनी भन्साळीचा बॉलिवूड बाणा अगदी व्यवस्थित ओळखला. "भन्साळी, तुला वाटतो तसे आम्ही मूर्ख नाही" हे त्यांनी दाखवून दिलं. मग त्यांचं मन राखण्यासाठी चित्रपटात नावासहित आवश्यक ते बदल झाले अणि आता बहुधा सगळं गोड-गोड होऊन चित्रपट प्रदर्शित होतोय.

काय आहे कि हल्लीच्या बॉलीवूड नृत्यांमध्ये मग आयटम सॉंग असो कि घरगुती समारंभ प्रसंग पण स्त्रीने पारंपारिक घागरा चोली किंवा साडी नेसली असेल तरी ती बेंबीच्या चार अंगुळे खाली नेसण्याची पद्धत रूढ झालेली आहे. त्याला सिनेमातील नृत्य सादरीकरणाच्या दृष्टीने महत्त्व असतं कारण कमरेच्या हाडावर जिन्स, घागऱ्यासारखा कपडा स्थिरावला कि अगदी सामान्य हालचाली करतानासुद्धा स्त्रीची कंबर अतिशय आकर्षक दिसते, दृष्टी तिथेच खिळून राहाते. केवळ भन्साळीच नाही, जवळपास सर्वच बॉलिवूड दिग्दर्शक ह्या पद्धतीचा अवलंब करतात. मला वाटतं हल्लीच्या कित्येक तरूण मुलीदेखील ह्याच प्रकारे साडी नेसत असतील.

’घूमर’ नृत्यात दीपिकाचा घागऱ्यावर कमरेभोवतालच्या भागात काळी किनार आहे ज्यावर आडवी गोलाकार आणि उभी लांबलचक सोनेरी बुट्टी काढलेली आहे. काळ्या पार्श्वभूमीवर दीपिकाची गोरी कंबर दृष्टिस पडून त्यातील लयबद्ध हालचाल दिसावी हा त्यामागचा हेतू. पण हा "सद्हेीतू" कुठे उघडकिला येतो? जिथे दीपिकाच्या आधी दोन स्त्रिया हातात दिवटी घेऊन मागे सरकताना दिसतात. त्यांची व दीपिकाच्या मागे-पुढे नृत्य करणाऱ्या इतर कलाकारांची चोलीदेखील कमरेचा भाग पूर्णत: झाकणारी आहे. दीपिकाची गोरी कंबर ती हात जोडते त्या क्षणापासूनच दृष्टीस पडते. माझं म्हणणं खोटं वाटत असेल तर घूमर नृत्यात कुठे बदल झाले हे दाखवणारे ’Before and After' व्हिडीओज YouTube वर उपलब्ध आहेत, ते बघा. आता हा भेदभाव एका फटक्यात राजपूतांनी ओळखला असेल तर ते चूक कसे?


पद्मावतीसारख्या व्यक्तीरेखेवर, मग भले ती व्यक्तिरेखा (विशिष्ट समूदायाव्यतिरिक्त इतरांच्या दृष्टीने) काल्पनिक का असेना, सिनेमा दिग्दर्शित करताना व्यक्तिरेखेच्या पार्श्वभूमीचा, चरित्राचा आपण पूर्ण अभ्यास केला असेल तर आपल्याला कॉम्प्युटर ग्राफिक्सचा आधार घेऊन सिनेमात/गाण्यात बदल करण्याची गरज भासत नाही. पद्मावत CG आधीच्या जमान्यात प्रकाशित होणार असता, तर काय झालं असतं ह्याची कल्पना करवत नाही.

आता काही जण म्हणतील कि काही एक वर्षांपूर्वी ’भारत एक खोज’ मालिकेच्या एका भागात पद्मावतची कथा मांडण्यात आली होती, ज्यात सीमा केळकर, ओम पुरी सारखे कलाकार होते, त्यात घूमर नृत्यही होतं आणि विशेष म्हणजे त्या भागाच्या एडिटिंग टीममध्ये खुद्द संजय भन्साळीच होता. म्हणजे वोही पद्मावती, वोही घूमर, वोही भन्साळी तो अब विरोध क्यों? तर कारण असं आहे कि त्या घूमरमध्ये पद्मावती नाचली नव्हती. ते घूमर नृत्यदेखील निराळ्या कारणांसाठी दाखवलं गेलं आहे.

व्यक्तीश: मला घूमर गाणं अतिशय आवडलंय. एखाद्या राजस्त्रीने एकही परपुरूष समोर नसताना, तिच्या पतिसाठी उत्सवात एखादं नृत्य सादर करावं अगदी तसंच नृत्य आहे ते. पण शेवटी ते सगळं पडद्यावर घडणारं नाट्य आपण मनोरंजन म्हणून प्रेक्षक ह्या नात्याने पहाणार आहोत, तेव्हा त्या नाट्यामध्ये परंपरा जपून ठेवणाऱ्या समुदायाला काही वावगं जाणवलं असेल तर ते अजिबात चूक नाही. खरंतर, प्रत्येक समुदायातील प्राचीन कथांवर चित्रपट तयार होत असताना अश्या प्रकारची जागरूकता दाखवली गेली पाहिजे, हे माझं व्यक्तिगत मत आहे.

मला कौतुक वाटतं ते राजपुतांचं कि वावगं असो वा नसो, आपल्या समुदायातील एका प्राचीन कथेवर चित्रपट तयार होतोय म्हटल्यावर ते आधीच सावध झाले. त्यांची भूमिका, त्यांचा पवित्रा कितपत चूक आणि बरोबर हे मी पडताळणार नाही पण आपल्या समुदायाच्या मान-मर्यादेचा भंग होण्यापूर्वीच आपण सावधगिरीचा इशारा द्यायचा असतो हे त्यांनी सोदाहरण दाखवून दिलं. भन्साळीच्या ’बाजीराव-मस्तानी’च्या वेळेस आपण ही जागरूकता दाखवली असती, तर कदाचित ’पिंगा’ नावाचं एरोबिक्स आणि ’मल्हारी’ नावाचं अफगाणी नृत्य आपल्याला पहावं लागलं नसतं.

घूमर नृत्यात "देराणी, जेठाणी खेले, बाईसां घूमरडी खेले..." शब्दांवर दीपिकाची लचकणारी कंबर आणि तिच्या चेहेऱ्यावर असलेलं गूढ हास्य हे कॉम्बिनेशनच सुरेखच होतं पण भन्साळीने पद्मावतीसारखी दिसेल अशी दीपिका दाखवली म्हणुन आपल्याला ते आवडलं होतं. आता राजपूतांनी दीपिकामध्ये पद्मावती पाहिली म्हणून तिच्या गोऱ्या कांतीवर लाल अंगिया चढवणं त्यांना आवश्यक वाटलं असेल तर आपण त्याचाही आदर करायला हवा.

No comments:

Post a comment