26 February 2018

सोशल देशप्रेम

प्रिया वरियरचा व्हिडिओ, श्रीदेवीचं निधन ह्या बातम्यांना जास्त प्रसिद्धी मिळाली कि "सैनिकांच्या हौतात्म्याला प्रसिद्धी मिळत नाही" असा सोशल मिडियावर गळा काढणारे लोक स्वत:च्या घरातली शुभकार्य आटोपताना, सिनेमा-नाटकाला जाताना किंवा स्वत:च्या कुटुंबातील व्यक्ती आकस्मिक वारली तरीसुद्धा असाच गळा काढतील का?

सोशल मिडीयावर सैनिकांच्या हौतात्म्याबद्दल पोटतिडकीने बोलणारे किती लोक प्रत्यक्ष त्या सैनिकांच्या घरी गेले आहेत? त्यांच्या कुटुंबाची विचारपूस केली आहे? ते नाही तर निदान आपल्या कमाईतला लहानसा हिस्सा त्यांनी हुतात्मा सैनिकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी बाजूला काढून ठेवला आहे का?

आणि सैनिकांच्या बातम्यांना जर मिडीयाने प्रसिद्धी दिलीच नसेल तर ह्यांना ह्या बातम्या कळतात तरी कुठून? 🤔

आपल्याला पटत नसलेल्या गोष्टीला अतिप्रसिद्धी मिळाली कि सैनिकांचं हौतात्म्य बरं आठवतं? सैनिक कुणाच्या प्रसिद्धीचे लालची नाहीत. चित्रपट, तारे तारकांचे फोटो हे त्यांच्यादेखील विरंगुळ्याचं साधन असतं. तेव्हा कृपा करून आपलं सोशल देशप्रेम दाखवण्याकरीता सैनिकांचं हौतात्म्य वारंवार मध्ये आणून त्यांचा अपमान करू नका.


20 February 2018

भयपट... तुम्ही दचकणार कि घाबरणार?

दि. १७ एप्रिल २०११

भूत, भूतबाधा, मांत्रिक यासारखे विषय हाताळणार्‍या चित्रपटांमधे दोन प्रकार असतात. या दोन प्रकारांमधे एक सूक्ष्मसा फरक असतो. काही चित्रपट प्रेक्षकांना नुसतेच दचकवण्यासाठी बनवलेले असतात. ज्यात असत्यावर सत्याचा विजय असा शेवट असतो किंवा दानव श्रेष्ठ आहे असा चित्रपटाचा शेवट प्रेक्षकांना बधिर करायला लावणारा असतो. अशाच चित्रपटांची निर्मिती बहुसंख्यवेळा होते, ज्यात भूत प्रेक्षकांच्या मनोरंजनाकरता तयार केलं गेलेलं असतं. चित्रपट संपल्यानंतरही प्रेक्षकाला भिती वाटत रहाते पण ती भुताच्या रूपामुळे वाटणारी भिती असते. रामसे बंधूंचे भूतपट बहुतेकांनी पाहिले असतील. यात प्रेक्षकाला दचकवण्यासाठी जे जे प्रकार करणं शक्य होतं, ते सर्व प्रकार दिग्दर्शकाने केलेले दिसतील. हे चित्रपट सुमार कथानक असूनही सर्वांना आवडले. मात्र त्यातील काही विशिष्ट चित्रपटच नाव आणि कथानकानिशी प्रेक्षकांच्या लक्षात राहिले आहेत. याचं पहिलं कारण म्हणजे एकतर ’भूत’ या कल्पनेसोबत चित्रपट "कसेही करून चालावेत" म्हणून आवश्यक तो मालमसाला यात भरभरून असायचा, दुसरं म्हणजे भूताचा आणि प्रेक्षकाचा काही परस्परसंबंध असू शकतो ही कल्पनाच या चित्रपटांमधे नसायची. तिसरं म्हणजे सरतेशेवटी भूत हे नष्टच होतं हे प्रेक्षकांनी गृहीत धरलेलं असायचं. मुळात "घाबरायला आवडतं" म्हणून प्रेक्षक जे चित्रपट पहात असतो, ते खरे त्याला नुसतं दचकवत असतात. ईमेलमधे आलेला एखादा छान व्हिडीओ पहाताना मधेच एक हिडीस आकृती आरडा-आओरडा किंकाळ्यांसकट स्क्रीनवर येते तेव्हा खरं तर आपण प्रचंड दचकलेलो असतो. पण तोच prank व्हिडीओ पुन्हा पहाताना आपण घाबरतो का?