Kanchan Karai's personal blog.

© 2020 मृण्मयी is an intellectual property of Kanchan Karai . Powered by Blogger.

साहित्यचोरी आणि चहाच्या पेल्यातलं वादळ

0 comments
साहित्यचोरी, वाङ्मयचौर्य ह्या गोष्टींवर होत असलेली चर्चा पाहून गहिवरून आलं. एवढ्या वर्षांनंतरही नुसती चर्चाच करण्यात लोकांना रस आहे, हे पाहून विषाद वाटला. जेव्हा १०-१२ वर्षांपूर्वी ही परिस्थिती प्रथम दृष्टीस पडली होती, त्यावेळेस "आपलं" लेखन चोरीला जात नसल्यामुळे/आपण आधीच प्रसिद्ध असल्यामुळे/आपली पुस्तकं छापली जात असल्यामुळे/आपण प्रतिभासंपन्न असल्यामुळे/आपल्याकडे वाया घालवायला वेळ नसल्यामुळे "साहित्यिकांना" फरक पडत नव्हता.

चित्रसौजन्य: विकिपिडीया

साहित्यचौर्याला विरोध करणाऱ्यातही दांभिकपणा ठासून भरलेला असल्यामुळे काय लिहिलंय ह्यापेक्षा कुणी लिहिलंय ह्याला अतिमहत्व दिल्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे. वेळीच सगळे संघटित झाले असते तर आतापर्यंत एक नवीन कायदा संमत करून त्याची अंमलबजावणीसुद्धा करता आली असती. इतक्या वर्षात वाङ्मचौर्याचे प्रसंग आपल्या वाट्यालाही येऊ शकतात ह्याची कल्पनाच न केल्याने साहित्यिकांना धक्का बसणं साहजिकच आहे.

आता तुम्ही तक्रारीचा सूर काढलात कि ते साहित्यचोर लक्ष देत नाहीत. तुमचे चाहते जेव्हा संघटित होऊन तुमच्या बाजूने बोलतात तेव्हा उगीच समजूत काढायची म्हणून "सॉरी" म्हणतात पण तुमचं साहित्य चोरीला जाणं पूर्णत: कधीच थांबत नाही. कारण साहित्यचौर्य हे व्यक्तिसापेक्ष नसतं. ती एक विकृती आहे. एकाला जमलंय म्हटल्यावर, दुसराही प्रयत्न करून पाहातो आणि त्यात तुमची भूमिका जर बोटचेप्या धोरणाची असेल तर हे साहित्यचोरांच्या पथ्यावर पडतं. साहित्यचोरांचं एक जाळंच तयार होतं.

साहित्यचोरी ही गंभीर समस्या असूनदेखील स्वत: त्याविरूद्ध काहीही करायला एक लेखक तयार होत नाही, हे दुर्दैव आहे! "Plagiarism is the greatest form of flattery" असं म्हणून चाहत्यांचा गराडा आणि प्रसिद्धिच्या वलयापलिकडून आपल्याकडे रोखून पाहात असलेलं हे सत्य साहित्यिकांनी वेळेवर जाणूण घेतलं नाही तर उद्या तुमची ओळख पूर्णत: पुसून टाकण्याइतकं सामर्थ्य साहित्यचौर्यात आहे ही वास्तविकता पचवण्याची तयारी ठेवावी लागेल.

कुणाला राग येवो, कुणी मला अनफ्रेंड करोत अथवा ब्लॉक करोत. हे सत्य आहे कि सोशल मिडीयावर थेट लेखन करताना तिथले नियम, अटी जाणून न घेता लेखन करणं म्हणजे आपण स्वत:च आपल्या लेखनावर दुसऱ्याला हक्क सांगायला संधी उपलब्ध करून देण्यासारखं आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. आजदेखील डिजिटल कॉपिराईट कायद्यामधील धोरणं जाणून घेऊन ह्या साहित्यचोरांविरूद्ध मोहिम उघडता येऊ शकते. कायदेशीररित्या ह्या चोरांना शिक्षा होऊ शकते पण रडारड करून चहाच्या पेल्यातली वादळं निर्माण करायची असतील तर साहित्यचोरांना ह्याची फार पूर्वीच सवय झालेली आहे.

© - कांचन कराई

No comments:

Post a comment