08 October 2018

खंडू उडतच नाही

व्हिडीओ जुना आहे ह्याची कृपया नोंद घेणे.

एका जागी खूप वेळ बसून राहाणं हा तर किंगफिशर पक्ष्याचा स्वभावच आहे पण खंडू जेव्हा माझ्याकडे आला, तेव्हा कावळ्यांशी झालेल्या झटापटीमुळे त्याच्या पायाला थोडा मार बसला होता. तो किंचीत भेदरलेलाही होता, त्यामुळे मोकळं सोडलं कि कोपऱ्यात जाऊन बसायचा. किंचीत लंगडायचा सुद्धा! पक्षी जन्माला आल्यानंतर पिलांच्या शरीरावर जो पिसांचा थर असतो, त्यातली बरीचशी पिसं खंडूच्या अंगावर अजून शाबूत होती. म्हणजेच त्याचा जन्म होऊन फार, फार तर १० दिवस लोटलेले असावेत. म्हणून तो घरी आला तेव्हा पहिल्या दिवशी त्याला एका जाळीच्या बॅगमध्ये ठेवून भरवलं होतं आणि त्याच रात्री त्याच्यासाठी काही दिवसांपुरता एक पिंजरा आणला होता. उद्देश इतकाच होता कि त्याला घरात मोकळं पाहून कावळे किंवा इतर पक्ष्यांनी घरात येऊ नये.

खंडू जेमतेम आठवडाभर त्या पिंजऱ्यात राहिला असेल. त्यानंतर माझी स्टडी रूम आणि मग माझं आख्खं घरच त्याच्या मालकीचं झालं होतं. त्याला आपल्या आनंदासाठी डांबून ठेवायचं नाही, हे तर फार पूर्वीच ठरवलं होतं. पण खंडू स्वत:देखील बाहेर उडून जाण्यासाठी प्रयत्न करत नव्हता. कावळ्यांची भिती बहुधा अजूनही वाटत असावी. कावळ्यांचा आवाज आला कि निरखून पहायचा पण बाहेर जायचा नाही.


एकदा धीर करून खंडूला बाहेर बाल्कनीत ठेवलं होतं. वाटलं कि त्याला इच्छा होईल उडून जाण्याची. ह्याच्या आधी एकदा त्याला सोडण्याचा प्रयत्न करून झाला होता पण तो उलट झेपावून माझ्याकडे परत आला होता. ह्यावेळेस त्याला दिसेल अशी पण त्याच्यापासून लांब उभी राहून मी पहात होते. जीवाची प्रचंड घालमेल होत होती पण केव्हा ना केव्हा तरी तो उडून जाणार ही वस्तूस्थिती मी स्विकारली होती. जवळजवळ २० मिनिटं खंडू तिथे बसून राहिला. संध्याकाळाचे ६ वाजले तसा माझा धीरही हळूहळू सुटायला लागला. एवढ्या पावसाळ्या संध्याकाळी आपलं पाखरू बाहेर सोडायचं आणि रात्रभरात त्याला भिती वाटली म्हणजे? म्हणून मग पुन्हा त्याला घरात आणलं. पण माझ्या ह्या अवस्थेची त्याला काही कल्पनाही नव्हती. त्याला घरात आणल्यावर तो गेला नेहमीप्रमाणे त्याच्या पंख्यावर!

हा व्हिडीओ लहान म्हणता, म्हणता ३ मिनिटांचा झाला आहे पण शेवटपर्यंत नक्की पहा.

No comments:

Post a Comment