Kanchan Karai's personal blog.

© 2020 मृण्मयी is an intellectual property of Kanchan Karai . Powered by Blogger.

शिव्या देणं कोणाला आवडतं का?

0 comments

दोन मित्र अनेक वर्षांनी भेटले तर एकमेकांना आई-बहिणीवरची शिवी देऊन कडकडून भेटतात (म्हणे). तिथे आपल्या मैत्रीचा कणखरपणा दाखवण्यासाठी मित्राच्या आई-बहिणीचं अवमूल्यन ते का करत असतील, हे त्यांनाच ठाऊक. पण शिव्या देणं ही शाब्दिक हिंसा आहे असं मला वाटतं आणि क्वचित ती दाखवावीच लागते. जेव्हा सामोपचाराचे, शांततेचे उपाय संपतात तेव्हा शस्त्र हाती घ्यावंच लागतं हे आपण आपल्याच महाकाव्यांमधून शिकलेले आहोत. शिवी न देता समोर जाऊन श्रीमुखात भडकावण्याचा पर्याय उपलब्ध असता तर मी तो नक्कीच आनंदाने वापरला असता.


एखाद्या भोळसट व्यक्तीला गोड बोलून, भ्रमात ठेवून कळपाने त्याची चेष्टा करून विकृत आनंद घेणारे लोक / आकस असलेल्या व्यक्तीबद्दल उघड बोलण्याची हिम्मत नसल्याने आपली खरी ओळख लपवून मळमळ बाहेर काढणारे लोक / जी व्यक्ती आपल्याला मित्र मानते ती व्यक्ती आपल्या खिजगणतीतही नसल्याने तिचा रस्त्यावरचा कचरा असल्याप्रमाणे उल्लेख करणारे लोक / ट्रोलिंग, रोस्टींग, मीम्सच्या नावाखाली आपली थिल्लर वृत्ती दाखवून तसलेच समविचारी गोळा करून विकृतीला कलाकृती म्हणून विकणारे लोक सोशल मिडीयावर नाहीत असं तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे.


वेळ जात नाही ह्या कारणास्तव करमणूक म्हणून वाद घालण्यासाठी, मुद्दाम डिवचण्यासाठी, आवडत नाही म्हणून हाकलण्यासाठी रोज कितीतरी लोक एखादी व्यक्ती आयुष्यातून उठेल इतपत मानसिक त्रास दुसऱ्याला देत असतात.


त्यांनी एकदाही शिवी किंवा त्या जागी फुली सुद्धा वापरली नाही म्हणून त्यांचं वागणं समर्थनीय होत नाही. आपणही त्यांच्या जत्रेत सामील व्हावं आणि त्यांचंच बावटं नाचवत स्वत:साठी नवीन गिऱ्हाईकं शोधावी असली हुजरेगिरी करण्यापेक्षा अश्या लोकांना फटकावणं मला जास्त आवडेल. ते कॅमेरा आणि कॉम्प्युटर स्क्रीन मागे बसून शूरपणा दाखवतात, मग त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं तर बिघडतं कुठे?


शिवीच कशी लागते ह्यांना जिव्हारी? आपले कुजकट शब्द, ट्रोलिंग ह्याचा दुसऱ्याला त्रास होत असेल ह्याचा विचार हे लोक का करत नाहीत?प्रत्येक वेळेस व्हिक्टिम थेरपी घेणार, सर्व्हाईव्ह होणार पण अब्यूजर मात्र नाक वर करून खुलेआम फिरणार. आणि आपण सुद्धा समाजाचा घटक म्हणून व्हिक्टिमलाच सल्ले देतो. पण एक व्हिक्टिम गेला तर अब्यूजर दुसरं गिऱ्हाईक शोधतो. मग त्रासाचं मूळ असलेल्या अब्यूजरला अक्कल का शिकवायची नाही? ही कीड अशीच का वाढू द्यायची?


विनोद निर्मीतीसाठी नेहमी दुसऱ्याची चेष्टा, टिंगल टवाळीच का करावीशी वाटते ह्या लोकांना? स्वत:च्या घराबद्दल, कुटुंबाबद्दल बोलताना दिसणारी ’सुंदर माझं घर’ शैली दुसऱ्याबदल बोलताना कुठे जाते?


ह्या लोकांची एवढी लायकीच नाही कि त्यांना चांगल्या शब्दांत सांगावं. तसं सांगितलं तर आपण त्यांना वचकून राहतो असा गैरसमज ते पाळतात. स्वत:च्या जातीतले आणखी चार प्राणी आपल्यावर सोडतात.


अमूक विषयातलं आपल्याला इतरांपेक्षा जास्त कळतं (mind it त्या अमूक विषयातलंच फक्त जास्त कळतं) म्हणून आपण लोकप्रिय आहोत हा माज ह्या लोकांच्या एवढा डोक्यात गेला आहे कि सारासार विवेक गमावून आपण बोलू ते लोकांनी केलं पाहिजे ह्या अट्टहासातून अमूक करू नका, तमूक फॉलो करा, मला डिस्टर्ब करू नका, ह्याला विरोध करा वगैरे हुकूमनामे ते अधूनमधून आपल्या वॉलवर फडकवतात. त्यांचा हुकूम न पाळणारे जादा शाहणे, सायको असतात तर त्यांचा हुकूम पाळणारे हे त्यांचे गुलाम, मेंढरं नसतात का?


अनेक लोकांना हे बोलावंसं वाटत असतं, राग व्यक्त करावासा वाटत असतो पण आपण ट्रोल केले जाऊ ह्या भीतीखातर ते बोलत नाहीत. शिव्या दिल्याचा इतका राग येत असेल तर माणसाने शिवीची मजल गाठावी इतका त्याचा अंत पाहू नका.


आई-बहिणीवरून शिव्या द्यायच्या नाहीत. ठिक. बाप-भावावरच्या शिव्या आहेत का? गद्धेगाळावर सुद्धा शापवचन कोरताना आईचाच उल्लेख केला जातो. का? आईचं अस्तित्व, तिची प्रतिमा आपल्यासाठी पवित्र आहे म्हणून. जर आपल्या आईबहिणीवरून दिलेल्या शिवीचा इतका त्रास होत असेल तर ज्यांची आपण खिल्ली उडवतो ते सुद्धा कोणाचे तरी आई-बहिण, बाप-भाऊ असतील एवढी साधी समज ह्या YZ लोकांना का असत नाही?

No comments:

Post a comment