Kanchan Karai's personal blog.

© 2020 मृण्मयी is an intellectual property of Kanchan Karai . Powered by Blogger.

बायकांवरचे विनोद

2 comments
आज एक नवीन प्रकार पाहिला. एक बाईच बायकांवर जोक्स करतायंत. टिपिकल पुरूषी जोक... बायको हा प्राणी, बायकोची बडबड, बायको माहेर गेली हे सुदैव वगैरे वगैरे. असले विनोद करून आपण स्त्री म्हणून स्वत:चाच दर्जा कमी करून घेत आहोत, हे त्या बाईंना कळत नसेल का? की पुरूषांच्या नजरेत आपण एक आधुनिक स्त्री आहोत हे दिसण्याची ही केविलवाणी धडपड आहे?

साधारण दोन वर्षांपूर्वी असल्या जोक्सचं फेसबुकवर पिक आलं होतं. अजूनही असे विनोद वाचायला मिळतात पण प्रमाण फारच कमी झालं आहे. पण त्यावेळेस ते विनोद वाचून अक्षरश: उबग यायचा. मित्रयादीमधील बरेचसे पुरूष स्त्री जातीवर विनोद करायचे. मग त्याला इतर पुरूषांचा हास्यास्पद प्रतिसाद, समदु:खी आहोत वगैरेचं रडगाणं. काही बायकादेखील खिदळत प्रतिसाद द्यायच्या.

पुन्हा गंमत अशी की असाच विनोद एखाद्या स्त्रीने पुरूषावर केला की हे लोक तिला विचारायचे, "काय, हा व्यक्तिगत अनुभव का?" म्हणजे पुरूषाने बायकोवर जरी विनोद केला तरी तो समस्त स्त्री जातीला लागू होतो आणि स्त्रीने पुरूषांवार विनोद केला तर तो मात्र तिचा व्यक्तिगत अनुभव असतो.

इतक्या मुर्ख प्रतिक्रिया वाचल्या होत्या की शेवटी अस्वस्थ होऊन स्वत:च्या वॉलवर स्टेट्स लिहून सांगावं लागलं की जर हे विनोद थांबले नाहीत तर मला अशा लोकांना मित्रयादीमधून काढावं लागेल.

का केले जातात असे विनोद? व्यक्तिपरत्वे स्वभाव बदलतो, मग समस्त स्त्रीजातीलाच हीन ठरवणारे कुत्सित विनोद करण्यात कुठला आनंद मिळतो लोकांना?

गंमत म्हणून, स्वत:च्या बायकोवर किंवा नवर्‍यावर एखादा विनोद करणं ठिक आहे पण सतत स्त्रीयांवर विनोद करून आपली स्त्री जातीविषयीची मानसिकता काय आहे, घरातल्या स्त्रीयांना आपण कसे वागवतो, हे आपण उघड उघड लोकांना दाखवत नाही का?

वयाने वाढलेले पुरूष जेव्हा असे विनोद पोस्ट करतात, तेव्हा आजच्या तरूण पिढीचा सोशल नेटवर्किंगवर सर्वात जास्त वावर असतो, हे ते कसं विसरतात. ही मुलं मोठ्या माणसांच्या पोस्ट्स पाहूनच आपली विचारधारा निश्चित करत असतात. त्यांना कुठली विचारधारा देतो आपण? स्त्रीच्या बौद्धीक कुवतीला हीन ठरवण्याची? समस्त स्त्रीला जातीला क्षुद्र लेखण्याची?

माझ्या निरीक्षणानुसार जितक्या प्रमाणात स्त्रियांवर विनोद केले जातात, त्याच्या एक दशांशही विनोद पुरूषांवर केले जात नाहीत. कुणीतरी असा युक्तिवाद केला होता की जोक्स केले जावे असं पुरूष वागतच नाहीत पण मग पुरूषांच्या मनात स्त्रीच्या शक्तीविषयी न्यूनगंड असतो म्हणून त्यांचं मानसिक खच्चीकरण करण्याकरता ते स्त्रियांवर विनोद करतात, असा युक्तिवाद चुकीचा कसा ठरू शकेल?

श्रीमती वंदना खरे यांनी डॉ. राजेंद्र बर्वे यांनी लिहिलेल्या एका नितांतसुंदर लेखाची लिंक माझ्यासोबत शेअर केली. ती लिंक इथे देत आहे. हा लेख अवश्य वाचा - चावटपणाचे मानसशास्त्र

2 comments:

  1. शतप्रतिशत सहमत! ह्या फालतू विनोदांच्या बजबजाटाने watsapp वरचे काही groups सोडले. खरं म्हणजे हा विनोद नव्हेच! एक मेंढी जाते, त्यामागे दुसर्या जातात तसे, एकजण टिंगल करतो आणि बाकी अनुकरण करतात.
    असो, Good article..!👍

    ReplyDelete