27 December 2018

Blog20181227615

तिकिटांच्या रांगेत माझ्या पुढेच उभा होता तो. खांद्यावर एक जड पिशवी आणि तिच्या दुप्पट वजन असलेली एक पिशवी पायांजवळ ठेवून त्याने तिकीट घेतलं आणि निघून गेला. नंतर माझं लक्ष गेलं नाही पण पुदुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी जिने चढत असताना तो पुन्हा दिसला. तेव्हा लक्षात आलं कि तो एका पायाने अधू होता. त्याला मदत करावीशी इच्छा होती पण ज्या जिद्दीने तो खांद्यावरची पिशवी सांभाळता, सांभाळता प्रत्येक दोन पायऱ्यांवर थांबून हातातली जड पिशवी पुढे नेत होता ते पाहून त्याच्या कष्टाचं श्रेय वाटून घेणं पटलं नाही.

त्याच्या बाजूने मी पुढे जाणार इतक्यात तो थांबला. कमरेवर हात ठेवून त्याने श्वास घेतला. मग शांतपणे पँटच्या मागच्या खिशातून बटवा काढला आणि त्यातून सुट्टे पैसे काढून त्याने जिन्यावर बसलेल्या एका बाबांना दिले. तेही पायाने अधू होते.

कुणाचा संघर्ष काय असतो, त्यातल्या वेदना काय असतात हे समजून घेण्यासाठी फार काही माहीत असावं लागत नाही. आपल्यासारखाच माणूस असतो दुसराही, एवढं कळलं तरी पुरे असतं.

19 November 2018

जागतिक पुरूष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

पुरूषांनाही दु:ख असतात आणि बरेचसे पुरूष ते बोलून दाखवत नाहीत. हे खरं आहे. बायकांचे अश्रू उघड दिसतात; पुरुषांचे दिसत नाहीत.

बऱ्याच पुरुषांना साधा चहा करता येत नसतो पण त्याच पुरूषांना, त्याच पुरूषी अहंकारामुळे चारचौघात धड व्यक्तही होता येत नसतं. वRेली नदी आतून अव्याहत वहात असते, तसेच तेही वरकरणी निर्विकार दिसत आतल्या आत स्वत:शीच व्यक्त होत राहतात.