Kanchan Karai's personal blog.

© 2020 मृण्मयी is an intellectual property of Kanchan Karai . Powered by Blogger.

भयंकर सुंदर मराठी भाषा

0 comments
पुस्तक: भयंकर सुंदर मराठी भाषा 
भाषा: मराठी 
लेखक: दत्तात्रेय दिनकर पुंडे 
प्रकाशक: मॅजेस्टिक प्रकाशन
उपलब्ध: आहे. प्रकाशकांशी संपर्क साधावा. 
Google search केल्यास अधिक माहिती मिळू शकेल.
शब्देविण संवादू ही आध्यात्मिक पातळीवर साधलेली प्रगती पण व्यवहारी जगात संदेशांच्या आदान-प्रदानासाठी भाषा ही हवीच. मग ती खुणांची भाषा असेल, चित्रांची भाषा असेल पण भाषेशिवाय व्यवहारी जगात संवाद साधणं अशक्य! 
आता कल्पना करू की आपल्याला अशी खुणांची आणि चित्रांचीच भाषा तेवढी माहित आहे आणि त्याच भाषेतील चुकीच्या खुणा किंवा चुकीची चित्रं आपला संदेश पोहोचवण्यासाठी निवडली तर? अर्थाचा अनर्थ होईल, संवादाला निराळं वळण लागेल. इथेच भाषेतील व्याकरण आणि शुद्धलेखन महत्त्वाचं ठरतं. 
दुर्दैवाने मातृभाषा वगळता इतर भाषेच्या व्याकरण आणि शुद्धलेखनाच्या अभ्यासावर जास्त भर दिला जातो. जगातील कोणतीच भाषा ह्याला अपवाद नाही. परभाषा आपल्याला नीट आलीच पाहिजे ह्याकडे जितक्या कटाक्षाने लक्ष पुरवलं जातं तितकाच आपली मातृभाषा आपल्याला शंभर टक्के व्यवस्थित कळते हा गैरसमजही ठाम असतो. ह्या गैरसमजातूनच मातृभाषेतून बोलताना अनेक चुकीच्या शब्दांचा पायंडा पाडला जातो. मूळ आशयाहून पूर्णत: भिन्न अर्थ असलेले शब्द तो आशय व्यक्त करण्यासाठी वापरले जातात. 
 ‘मराठी भाषा वळवावी तशी वळते’ ह्या उक्तीला डोळ्यांसमोर ठेऊन केलेल्या वाक्यरचनेमधून कधी अर्थहीन, कधी गंभीर तर कधी विनोदनिर्मिती करणारी वाक्ये तयार होतात. मराठी भाषेतील अश्याच गंमतीजमती ‘भयंकर सुंदर मराठी भाषा’ ह्या पुस्तकातील लेखमालेतून खुसखुशीत शैलीत सांगितल्या आहेत लेखक द.दि. पुंडे ह्यांनी. ह्यात लेखक प्र.के. अत्र्यांच्या हजरजबाबीपणाची झलक सापडेल, पौराणिक कथेचा सरधोपट पण मुद्देसुद बाज दिसेल आणि मराठी भाषेतील वाक्याचं सरधोपट इंग्लिश भाषांतर केलं तर काय होतं तेही वाचता येईल. 

अनेक मजेशीर प्रसंग आणि उदाहरणांनी हे पुस्तक समृद्ध आहे. मराठी भाषेतील वैशिष्ट्य आणि महाराष्ट्रीय संस्कृतीचंही ‘भयंकर सुंदर’ दर्शन ह्या पुस्तकातून घडतंच पण मराठी भाषा वाचवाची ओरड करणाऱ्यांनी मराठी भाषा नेमकी कशी वाचवली पाहिजे ह्यावरदेखील हे पुस्तक भाष्य करतं.

No comments:

Post a Comment