Kanchan Karai's personal blog.

© 2020 मृण्मयी is an intellectual property of Kanchan Karai . Powered by Blogger.

प्राण्यांची भाषा आपल्याला समजती तर?

0 comments

वीर! काळा लॅब्रॅडोर कुत्रा. आईच्या बिल्डिंगमध्ये पहिल्या माळ्यावर रहायचा. रोज आईकडे जाताना-येताना बहुतेक वेळेस त्याच्याशी संध्याकाळी गाठ पडायची. नेहमी स्वत:हून फार जवळ यायचा नाही पण शेपूट हलवून ओळख दाखवायचा.


एकदा संध्याकाळी घरी जायला खूप उशीर झाला होता पण वीर खाली लॉबीत बसलेला दिसला म्हणून दोन-तीन मिनिटं त्याच्याशी खेळत बसले. समोरून एक रिक्षा पास होताना दिसली म्हणून मी हात करून, ओरडून थांबवली. बाहेर रिक्षा वेळेवर मिळण्याची शक्यता नव्हती. इथेच मिळतेय तर कशाला सोडा, एवढा साधा सोपा हिशोब होता. मी खाली ठेवलेली पर्स उचलली पण तेवढ्यात वीरला काय झालं कोणास ठाऊक! चांगला आरामात बसला होता तो ताड्‌कन उभा राहिला आणि माझ्याकडे पाहून जोरजोरात भुंकू लागला.


मी अविश्वासाने त्याच्याकडे पाहात होते. वीर मला किमान दीड महिन्यापासून ओळखत होता. आताही २-३ मिनिटं मीच त्याच्याशी खेळत होते, तेव्हा नॉर्मल होता तो. मग अचानक काय झालं त्याला? मी एकदाच त्याला हाक मारली पण तो रस्त्यात मध्येच उभा राहिला आणि पुढे येऊन त्याने माझ्या हाताचा पंजा आपल्या तोंडात घट्ट धरला आणि एखाद्याला मागे ढकलावं तसा सोडून दिला. वीरचे मालक इतका वेळ त्याला आवरण्याचा प्रयत्न करत होते पण वीरच्या त्या कृतीनंतर ते त्याला खेचत घेऊन जाऊ लागले आणि त्यांनी मला जाण्याची खूण केली.


मी रिक्षात बसल्यावर ह्या सगळ्या घटनाक्रमाचा विचार करत होते. वीर भुंकत होता पण त्याने माझा हात त्याच्या तोंडात असूनही मला इजा केली नव्हती. इतकंच काय, त्याच्या एकाही दाताचा व्रण माझ्या हातावर उमटला नव्हता. उलट त्याने मला ढकलून दिलं होतं. म्हणजेच मला चावणे हा त्याचा उद्देश नव्हता. तो भुंकून मला काहीतरी सांगत होता आणि त्याच्या बोलीचा अनुभव नसल्यामुळे मला ते कळलं नव्हतं. काय सांगत होता तो?


मग लक्षात आलं. मी रिक्षा थांबवणं हे ते कारण होतं. वीरला १०-१५ दिवसांपूर्वी एका रिक्षाने उडवलं होतं. त्याच्या पायाला छोटीशी दुखापत झाली होती. त्याच्या जखमेवर औषधोपचार झाले होते पण त्याच्या जवळ गेलं कुंई कुंई आवाज काढून ‘मला लागलं’ असं सांगायचा तो. ही घटना ताजी असताना मी एक रिक्षा थांबवली होती. आपल्या ओळखीच्या व्यक्तीला अश्याच एका रिक्षामुळे दुखापत होऊ नये म्हणून मला अडवत होता तो. त्याच्या भाषेत मनापासून विरोध करत होता.


वीर त्यानंतरही भेटत राहिला पण त्याने कधीही तसा आक्रमकपणा दाखवला नाही आणि मी देखील त्याच्यासमोर कधी ती "दुष्ट" रिक्षा थांबवली नाही.

No comments:

Post a Comment