Kanchan Karai's personal blog.

© 2020 मृण्मयी is an intellectual property of Kanchan Karai . Powered by Blogger.

सत्पात्री दान

2 comments
मला वस्तूंच्या पुनर्वापर, पुनर्निर्मिती या गोष्टी प्रचंड आवडतात. केवळ खर्चाच्या दृष्टीने नाही, तर पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने देखील! कपड्यांसारख्या गोष्टी जर मी पुनर्वापरासाठी वापरल्या तर मला असं सुचवलं जातं की "यापेक्षा एखाद्या गरजू व्यक्तीला हे शर्ट किंवा हा ड्रेस दिला असतास, तर जास्त चांगलं झालं असतं."

निश्चितपणे! मला गरजू व्यक्तींना मदत करायला आवडतं. पण मी जे कपडे पुनर्वापरात आणते, ते अशा ठिकाणी फाटलेले, खराब झालेले असतात की शिवून, धुवून वगैरे अंगातला कपडा म्हणून घालण्याच्या योग्यतेचे राहिलेले नसतात. मुळात एखादी व्यक्ती गरजू आहे म्हणून त्या व्यक्तीला आपली वापरलेली वस्तू देणं हे मला व्यक्तीश: चूक वाटतं.

अचानक समोर आलेल्या व्यक्तीला आपल्याकडे उपलबध असेल, ते देणं हा भाग निराळा. पण मला गरजू व्यक्तीला मदत करायची आहे म्हणून मी घरातले जुने पुराणे कपडे गोळा करेन आणि ते त्या गरिबाच्या माथी मारेन, हा मला तद्दन दांभिकपणा वाटतो. गरिबांनादेखील स्वाभिमान असतो आणि देता हात आपल्याकडे आहे म्हणून आपण स्वत:ला देव समजण्याचा अपाल्याला काहीच अधिकार नाही. त्या वस्तू विकत घेताना आपण पैसे खर्च केलेले असतात हे मान्य पण स्वत:च्या खिशातून पैसे खर्च करून एखाद्या गरजू व्यक्तीची गरज भागवणं आपल्या मनाचा दिलदारपणा दाखवत नाही का?

दुसरी एक गोष्ट म्हणजे, आपल्याला मदत करायची आहे ना, मग ती सत्पात्री असावी. गरीबांच्या वस्तीवर जाऊन त्यांना वस्तूंचं वाटप करताना फोटो काढायचे, तशा आशयाचं लेखन करून "आज मला समाधानी वाटतंय" वगैरेच्या पोस्ट टाकायच्या हा प्रकार प्रचंड उबग आणणारा आहे. अशा पोस्ट टाकून आपण दानशूर कर्णाचेच वंशज असल्यासारखा आव जरी आणला तरी या दानशूरपणात किती सातत्य राखलं जाईल हा स्वतंत्र पोस्टचा विषय होईल. असो.

लहानपणापासूनच कुणालाही मदत करण्याचा स्वभाव असल्याने हातून अनेकांना मदत झाली, अनेकदा मदत केल्यानंतर वाईट अनुभव देखील मिळाले पण अनुभवातून शहाणं होत मी काही गोष्टी मात्र शिकले:

*पहिली गोष्ट* म्हणजे आपली आर्थिक कुवत पणाला लागेल अशी मदत करू नये.

*दुसरी गोष्ट* म्हणजे गरजू व्यक्ती ही खरंच गरजू आहे का हे पडताळून पाहायचं; डोळ्यांत आसवं आणूज आर्जवं करणारी प्रत्येक व्यक्ती गरजू असेलच असं नाही.

*तिसरी गोष्ट* म्हणजे समोरच्या व्यक्तीचं आर्थिक कुवतीनुसार असलेलं राहाणीमान पाहूनच त्याला मदत करावी. व्यक्तिच्या आर्थिक कुवतीपेक्षा कैक पटीने अधिक मदत आपण केली, की त्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल विनाकारण गैरसमज निर्माण तर होतोच पण त्या व्यक्तिच्या अवतीभोवती असणार्‍या इतर तथाकथित गरजवंतांच्या नजरा त्या व्यक्तिकडे पाहताना बदलतात. त्या व्यक्तीलादेखील मागण्याचीच सवय होऊन जाते.

*चौथी आणि सर्वात महत्वाची गोष्ट* म्हणजे आपण कुणाला, का आणि कशी मदत केली याचा चुकूनदेखील कुठेही उल्लेख करायचा नाही. मला मदत करायची होती, मी मदत केली. विषय संपला.

"सत्पात्री दान" या शब्दांचा अर्थच मुळी गरज असेल त्यालाच व अहं न बाळगता मदत करणं असा होतो ना?

2 comments:

  1. >>मदत करायची होती, मी मदत केली. विषय संपला.
    ये हुई न बात

    ReplyDelete
    Replies
    1. ब्लॉगवर स्वागत आहे अपर्णा. :) आवर्जुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार!

      Delete