Kanchan Karai's personal blog.

© 2020 मृण्मयी is an intellectual property of Kanchan Karai . Powered by Blogger.

कुत्तू

0 comments
आज पुन्हा मला तो दिसला. माझ्या नव-यानेच ओळख करून दिली होती त्याच्याशी, त्याचा तपकिरी रंग, त्याच रंगाशी साधर्म्य असलेले त्याचे लुकलुकणारे डोळे, झुपकेदार शेपटी आणि विशेष लक्षात रहाणारे त्याचे ते त्रिकोणी आकाराचे कान. कसलीही अपरिचित चाहूल लागली की ते कान खाडकन उभे रहात. मी एका कुत्र्याबद्दल बोलतेय, हे एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल.

आता हा काही पाळलेला कुत्रा नाही. जाता-येता रस्त्यावर दिसणारा भटका कुत्रा. त्याला कुणी नाव दिलं होतं की नाही हे माहित नाही पण मी आपली त्याला ’कुत्तू’ म्हणते. त्याला पहिल्यांदा जेव्हा मी पाहिलं तेव्हा तोच मला घाबरला होता. वास्तविक आमच्या बब्बड शिवाय इतर कुठल्याही पाळीव प्राण्याच्या जवळ जाताना मला त्याच्या हेतूबद्दल शंका असायची. एकदा त्या भयाण अनुभवातून तावून सुलाखून निघाल्याने, दुरून डोंगर साजरे या म्हणीला अनुसरून मी शक्यतो सुरक्षित अंतर ठेवूनच प्राण्यांशी खेळते. असो. तर सांगण्याचा मुद्दा हा की कुत्तू मला घाबरला ह्याचंच मला जास्त कौतुक वाटलं होतं. नंतर मला कळलं की तो मला नाही, माझ्या हातातल्या पर्सला घाबरला होता. पर्सवरचं विचित्र डिझाईन आणि तिच्या आकारामुळे त्यालाच माझ्या हेतूबद्दल शंका निर्माण झाली होती.

नवरा त्याच्याकडे बोट दाखवून त्याचं कौतुक करत होता की, “बघ कसे चमकदार डोळे आहेत, बघ कसा रुबाबदार दिसतो, वगैरे वगैरे...” पण कुत्तू माझ्याकडे पाहून लांब लांबच सरकत होता. ते पाहून आधी बरं वाटलं, की आयुष्यात पहिल्यांदाच एक कुत्रा आपल्याला घाबरला. पण कुत्तुला चुचकारून जवळ बोलावल्यावरही जेव्हा तो जवळ आला नाही तेव्हा एकदम अपमानास्पद वाटायला लागलं. नव-याच्या हसण्याने त्यात रागाचीही भर पडली. “एवढं काय घाबरायचं एखाद्या माणसाला?” असं म्हणून मी नव-याला तिथून काढता पाय घ्यायला लावला.

माझा रोजचा जाण्या-येण्याचा रस्ता तोच होता, त्यामुळे कुत्तूचं दिवसातून एकदा तरी दर्शन व्हायचंच. कधी फळवाल्याच्या खुर्चीच्याखाली त्याने ताणून दिलेली असायची, तर कधी हारवाल्याने शिंपडलेल्या पाण्यात तो खेळत असायचा. मागचा ओळख परेडचा अनुभव लक्षात ठेवून मी स्वत:हून कुत्तूकडे कधीच लक्ष दिलं नाही. पण नंतर बहुधा तो मला ओळखायला लागला. आता तो मागे मागे सरकायचा नाही. पर्सलासुद्धा घाबरायचा नाही. ’ए कुत्तू’ अशी हाक मारली की त्याचे कान खाडकन उभे रहायचे, मग मान तिरकी करून आपल्या लुकलुकत्या डोळ्यांनी तो मला एक लूक द्यायचा आणि मी नजर काढून घेत नाही तोपर्यंत तो माझ्याकडे त्याच गोड नजरेने पहात रहायचा. कुत्तुच्या जवळ जाण्याचा मात्र मला कधी धीर झाला नाही.

सिग्नलला लागून असलेल्या फुटपाथवर बरीच दुकानं आहेत, फळवालेही आहेत. त्यामुळे कुत्तूचं पोट व्यवस्थित भरत असणार याची मला खात्री होती. काही प्राणीप्रेमी लोकही तिथे येतात. कुत्तू आणि त्याच्या दोस्तलोकांना ब्रेड, बिस्किटं असं खाऊ घालतात. आजसुद्धा असाच एक प्राणीप्रेमी तिथे आला होता. कुत्तू आणि त्याचे दोस्त लोक त्याच्या अंगावर उड्या मारत होते. तोही त्यांच्याशी काहीतरी प्रेमाने बोलत होता आणि प्रत्येकाला ब्रेड भरवत होता. त्यांच्याकडे पहाता पहाता माझं लक्ष समोरून येणा-या मुलीकडे गेलं. आपल्या पाळीव कुत्र्याला फिरवायला बाहेर पडली होती ती. करिनाच्या झिरो फिगरचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून असावी ती पण तिचा कुत्रा मात्र चांगला गलेलठ्ठ काळा लॅब्रॅडोर होता. त्या जोडीकडे पाहिल्यावर, ती मुलगी कुत्र्याला फिरवत होती की कुत्रा त्या मुलीला फिरवत होता, हेच कळत नव्हतं.

बहुधा त्या लॅब्रॅडोर कुत्र्याला कुत्तू आणि त्याच्या दोस्तांची चाहूल लागली होती. तो गुर्र गुर्र असा आवाज काढत कुत्तू गॅंगच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. त्याची झिरो फिगरवाली मालकीण ’नोऊ, नोऊ’ करत त्याला मागे खेचत होती. आता कुत्तू गॅंगचंही त्याच्याकडे लक्ष गेलं. मला वाटलं, आता इथे अमीर-गरीब युद्ध होणार की काय? पण तसं काहीच घडलं नाही, कुत्तू आणि त्याच्या दोस्तलोकांनी लॅब्रॅडोरकडे पाहून एक तुच्छ कटाक्ष फेकला आणि पुन्हा आपला मोर्चा ब्रेडवाल्याकडे वळवला. गलेलट्ठ लॅब्रॅडोर गुरगुर करत आपल्या मालकिणीसोबत निघून गेला. मी पुढे जायला निघाले. कुत्तूने एक क्षण थांबून माझ्याकडे वळून पाहिलं. मी नजर काढून घेत नाही, तोपर्यंत मला पहाण्याची सवयच होती त्याला. त्याच्या जवळ जावं असं वाटत होतं मला पण कुणास ठाऊक, मी थांबले नाही.

दुस-या दिवशी त्या रस्त्यावरून जाताना कुत्तु मला दिसला नाही, वाटलं असेल इथेच कुठेतरी खेळत. पण त्याच्यानंतर सलग तीन दिवस कुत्तु काही मला दिसला नाही. आता मात्र मला रहावलं नाही. फळवाल्याकडे चौकशी केल्यावर कळलं की कुत्तुला हॉस्पिटलमधे ऍडमिट केलंय. कुत्तुला अचानक खूप ताप भरला होता. आजूबाजूच्या दुकानवाल्यांनीच पैसे काढून त्याच्या औषधपाण्याचा खर्च केला होता. मला उगाचच उदास वाटायला लागलं. मी स्वत:लाच समजावत होते, “हूं, एवढं काय वाईट वाटून घ्यायचं? रस्त्यावरचा साधा भटका कुत्रा तो!” मग मीच विचार करायचे, “खरंच, फक्त एक भटका कुत्रा म्हणून आपण कुत्तुकडे पहात होतो का? आपण त्याला कधी हातही लावला नाही की काही खायला दिलं नाही, मग आपल्याला त्याच्याबद्दल काही वाटायलाच नको का? आपण नुसती हाक मारली की आपण दिसेनासे होईपर्यंत त्याची नजर आपला पाठलाग करायची, त्यात कोणतीच भावना नव्हती का?” त्याने आपल्यासाठी काहीच केलं नसेल पण ती नजर, त्यातील गोडवा, ज्याने आपल्याला इतका आनंद दिला आणि तीच नजर आज आपल्याला आज दिसत नाही, तर आपल्याला काहीच वाटत नाही?” खूप काहीतरी चुकल्याची जाणीव व्हायला लागली. दुस-या दिवशी त्याच फळवाल्याकडून हॉस्पिटचा पत्ता घेऊन कुत्तुला पहायला जायचं ठरवलं.

सकाळी सकाळी त्या फळवाल्याकडे गेले तर समोरचं दृश्य पाहून काही बोलताच येईना! नुसतंच डोळ्यांतून पाणी वहायला लागलं. कुत्तु परत आला होता! पायाला बॅंडेज होतं. बहुधा पायाला लागल्यामुळेच त्याला ताप आला असावा. आज नेहमीसारखं त्याला हुंदडता येणार नव्हतं. तिथेच नेहमीच्या खुर्चीखाली बसून तो फळवाल्याने दिलेल्या बिस्किटांवर ताव मारत होता. मला पाहिल्यावर त्याने नेहमीसारखीच मान उंचावली. लुकलुकत्या डोळ्य़ांनी तो माझ्याकडे पाहू लागला. झुपकेदार शेपटी हलवून “मी ओळखलं तुला”चे भाव त्याने स्पष्ट केले. मला खूप रडायला येत होतं पण ते सगळं आतच ठेवून मी त्याच्याजवळ गेले. एकदा वाटलं की याला बोलता येत असतं, तर याने विचारलं असतं का मला, ”चार दिवस इथे नव्हतो, तुला माझी आठवण नाही आली?” पण नाही, त्याने नसतं विचारलं. कुत्र्याची इमानी जात त्याची. मी त्याला ओळख दाखवतेय, हेच पुरेसं असावं त्याच्यासाठी. त्याला पहायला नाही गेले त्याबद्दल तक्रार नव्हती त्याच्या डोळ्यात, उलट मी दिसल्याचा आनंद होता. मी काही न बोलता समोरच्या बिस्किटवाल्याकडून एक बिस्किटचा पुडा घेतला आणि कुत्तुच्या समोर उपडा केला. कुत्तु ती बिस्किटं न खाता प्रेमळपणे माझ्या हातालाच चाटत राहिला.

No comments:

Post a Comment