Kanchan Karai's personal blog.

© 2020 मृण्मयी is an intellectual property of Kanchan Karai . Powered by Blogger.

कबूतर

0 comments

कबुतर हा एक अत्यंत मूर्ख पक्षी असून त्याला दिशा-बिशा काही कळत नाहीत असं माझं ठाम मत झालेलं आहे. पूर्वीच्या काळी कसा काय हा पक्षी पत्र पोहोचवायचा असा मला प्रश्न पडतो. घरात आलेल्या माशीला सुद्धा उघडलेली खिडकी कळते पण अर्धवट उघड्या जाळीतून घरात आलेल्या कबुतरला बाहेर जाण्यासाठी दरवाजा पूर्ण उघडून ठेवला तरी ते येडं त्या जाळीवरच फडपडत राहातं.

कबुतरामध्ये हट्टीपणा ठासून भरलेला आहे. माणूस आपल्याला हाकलायला येतोय हे स्पष्ट दिसत असूनही तो माणूस जोवर प्रत्यक्ष हाकलण्याचे हातवारे करत नाही तोपर्यंत लाल डोळे त्याच्यावर रोखत आपण बूड हलवायचं नसतं. माणसाने हाकललं तर त्याची पाठ वळताच आपण पुन्हा त्याच जागी जाऊन बसायचं असतं. जमल्यास त्या माणसाच्या मागोमाग आपणही घरात शिरून घरटं तयार करायला जागा शोधायची असते. आपण घरट्यासाठी गोळा केलेल्या काड्या माणसाने फेकून दिल्या तर आपण त्याच काड्या शोधून पुन्हा त्याच जागी रचून ठेवायच्या असतात, अशा आडमुठ्या पवित्र्याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणारं केंद्र कुठे ना कुठेतरी नक्की अस्तित्वात असलं पाहिजे.

हे सर्व प्रशिक्षण कमी पडतं कि काय म्हणून अंगाला काटे बोचत नाहीत तोवर कुठलंही रोपटं हे झाडाची फांदी असल्यासारखं आपण बूड टेकावं, माणसाने एखादी बालदी, टब बाहेर आणून ठेवल्याला जेमतेम काही सेकंद उलटलेले असताना, आपण त्यावर बसून आतल्या जिन्नसाची नासधूस करावी, आपल्याला अटकाव करण्यासाठी जाळी लावलेली असल्यास तिच्यावर धडका देत ती जाळी फाडून, चोचीने तारा गदागदा हलवत ती जाळी तोडून आपण आत शिरावं असे उद्योग करण्यात ह्या पक्ष्याचा चांगला वेळ जात असावा.

’आजच बसलंय हे कबूतर’ असं म्हणून आपण त्या कबूतराला हाकलून द्यावं आणि दुसऱ्या दिवशी त्या जागी जाऊन पहावं तर दोन अंडी आपल्याला खिजवत असलेली दिसतात. आपल्याला आलेलं पाहून श्रीयुत आणि श्रीमती कबुतर काही अंतरावर लांब जाऊन बसतात आणि डोळ्यांत भाव असे कि हा माणूस म्हणजे चंगेजखानच!

ते भाव पाहून मला Kill Bill सिनेमातील एका प्रसंगाची आठवण होते. प्रशिक्षित मारेकरी असलेली नायिका आपण गरोदर असल्याची बातमी तिला मारायला आलेल्या दुसऱ्या एका स्त्री मारेकरीला सांगते आणि समेटाची मागणी करते. मग ती दुसरी स्त्री मारेकरी नायिकेवर हल्ला न करता उलट तिचं अभिनंदन करून निघून जाते.

ह्या कबुतरांची पिल्लं लवकर मोठी होतात पण लवकर जात नाहीत. कधीतरी आपलं लक्ष नसताना पुटूक्कन पळून जातात आणि आपल्याला हायसं वाटतंय न वाटतंय तोच कबुतरांच्या नव्या जोडीचं बिऱ्हाड त्या जागी लागण्याची लक्षणं दिसू लागतात.
कबूतर भाग २

No comments:

Post a Comment