स्वयंपाकघर केवळ महिलांचे कार्यक्षेत्र नाही

Courtesy: Daawat-e-Ishq (movie)

कालपासून एक व्हिडीओ फेसबुकच्या निरनिराळ्या पेजेसवर शेअर झालेला दिसतोय, ज्यात एक लहान मुलगा पोळी लाटताना दाखवला आहे. ज्या ज्या पेजेसवर हा व्हिडीओ शेअर झालाय तिथे हटकून अश्या आशयाचं शिर्षक दिलं गेलंय कि "सर्व स्त्रियांना किंवा विवाहित स्त्रियांनासुद्धा अश्या पोळ्या लाटता येत नाहीत."

आता खरंच तशी परिस्थिती आहे कि नाही ह्या मुद्द्याकडे आपण नंतर वळू. त्याआधी ज्या पेजवर हा व्हिडीओ शेअर केला गेला गेलाय त्या सर्व पेजेसच्या संचालक समूहाला माझे काही प्रश्न आहेत:

स्वत:चं घर सोडून इतरांच्या घरात डोकावण्याइतका वेळ तुमच्याकडे असेल तर गैरसमज वाढीस लागेल अशी विधानं करत वेळ वाया घालवण्यापेक्षा एखादी चांगली नोकरी किंवा व्यवसाय का करत नाही? किंवा जर आधीच नोकरी/व्यवसाय सुरू असेल तर त्यात नीट लक्ष घाला म्हणजे उत्पादकता वाढेल आणि स्वत:चं नैराश्य पेजच्या माध्यमातून समस्त स्त्रीजातीवर काढण्याची गरज भासणार नाही.

मी असं म्हणणं म्हणजे मी वैयक्तिक पातळीवर उतरल्यासारखं जर वाटत असेल तर स्त्रियांना काय येतं किंवा काय नाही ह्याबद्दल कोणत्याही पुराव्याशिवाय बेजबाबदार विधान करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं.

पेजवर शेअर झालेल्या ह्या व्हिडीओखाली अनेक प्रतिक्रिया वाचायला मिळाल्या. एक-दोन पुरूषांचा व तितक्याच संख्येने स्त्रियांचा अपवाद वगळता फक्त स्त्रियांना त्या व्हिडीओवरून लक्ष्य केलं जाण्यावर कुणी हरकत घेतलेली दिसली नाही. उलट काही स्त्रियाच त्या शिर्षकाचं समर्थन करत असलेल्या दिसल्या. इतकंच नव्हे, तर हरकत घेणाऱ्या काही स्त्रियांवर व्यक्तिगत शेरे मारले गेले. काही प्रतिक्रिया तर अशा आहेत कि त्या लोकांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते.

"स्त्रिया नोकरीसाठी घराबाहेर पडल्या म्हणून पुरूषांना काम करावं लागतं" किंवा "पूर्वी मुलांना आईचा सहवास मिळत असे म्हणून पुरूषांनाही लहानपणापासून स्वयंपाक येत असे पण हल्ली मुलं आईविना पाळणाघरात असतात म्हणुन पुरूषांना मोठेपणी स्वयंपाक येत नाही" किंवा "पुरूष स्वयंपाक करतो म्हणजे त्याने लिंगपरिवर्तन करून घेतलंय" ह्या आशयाच्या ज्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहे ते लोक सोशल नेटवर्किंगसारखं साधन हातात असूनही बुरसटलेल्या विचारांचे व कोत्या मनोवृत्तीने ग्रासलेले आहेत असं म्हणावं लागेल.

स्त्रिया घराला हातभार लागावा म्हणून अर्थार्जनासाठीच घराबाहेर पडल्यात ना? कि सगळा गाव उंडारून घरात आल्यावर खुर्चीवर बसकण मारत जेवणाची ऑर्डर सोडतात पुरूषांना? स्त्रियांनी नोकरी किंवा व्यवसाय करून मिळवलेला पैसा जर पुरूषांना चालत असेल तर घरकामामध्ये जोडीने वाटा उचलणं किंवा स्वयंपाक शिकून घेणं पुरूषांना का जमू नये? मुलांना पाळणाघरात ठेवण्याची हौस कुठल्याच आईला नसते पण मुलाचं उज्ज्वल भविष्य असावं म्हणून काळजावर दगड ठेवून कामाला जाणाऱ्या माऊलीला तुम्ही कमी लेखणार?

आज लाखो स्त्रिया घराबाहेर पडतात नोकरीसाठी पण त्याआधी पहाटे उठून घरातल्या सर्वांसाठी स्वयंपाक आणि इतर गोष्टींची व्यवस्था करतात. कामावरून घरी परतल्यावरही स्वयंपाकघर सुटलेलं नसतंच. अहो, घरी परतल्यावरचं सोडा, घरी गेल्यावर वेळ पुरावा म्हणून स्त्रिया लोकल ट्रेनमध्ये बसून संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी भाज्या निवडताना दिसतील.

समजा, त्या प्रत्येक स्त्रीला पोळ्या लाटता येत नसतील पण तेवढी एक गोष्ट जमत नाही म्हणून घरासाठीचं त्यांच योगदान तुम्ही व्यर्थ समजणार? एका लहान मुलाच्या पोळी लाटण्याशी त्यांच्या कर्तृत्वाची तुलना करणार? त्या लहान मुलाला अशी पोळी लाटायला कुणी शिकवलं असेल, हा प्रश्न कधी विचारलात का तुम्ही?

अनेक पुरूष आहेत ज्यांना घरातील कर्त्या स्त्रीच्या अकाली जाण्यामुळे स्वयंपाकघराचा ताबा घ्यावा लागला आहे तर काही पुरूषांनी स्वखुषीने स्वयंपाक शिकून घेतलाय. मोठमोठ्या हॉटेल्समधून गेल्या कित्येक वर्षांपासून पुरूष मंडळीच शेफ म्हणून कार्यरत आहेत. खानावळींमध्येही पुरूष राबताना दिसतील. रस्त्यावरच्या वडापाव, कांदाभाजी, ऑम्लेट-पाव, चायनीजच्या गाड्यांवर पुरूष काम करत नसतात का? त्या सर्व पुरूषांनी लिंगपरिवर्तन केलंय असं म्हणणार का तुम्ही?

पुरूषाचं लिंगपरिवर्तन म्हणजे थोडक्यात पुरूषाची बाई होणं असंच ना? म्हणजे इथेही स्त्रीलाच कमी लेखणं आलं.

पुरूषाने स्वयंपाक करणे म्हणजे त्याने लिंगपरिवर्तन करून घेणं असं म्हणून तुम्ही केवळ त्या पुरूषांचा अपमान करत नाही तर शतकानुशतके यशस्वीरित्या स्वयंपाकघर सांभाळणाऱ्या स्त्रियांचाही तुम्ही अपमान करता आहात. ह्यात तुमच्या घरच्या माता भगिनीसुद्धा आल्या. जर स्वयंपाकघर सांभाळणं हे कमी योग्यतेचं काम असेल तर आपण घरात आणि घराबाहेरही शिजवलेलं अन्न खाऊच नये ना!

आज अनेक मुलं शिक्षणासाठी, नोकरीसाठी परक्या गावी जाऊन राहातात, तिथे रोज दोन मिनिटांत तयारी होणारी नुडल्स खाण्यापेक्षा किंवा हॉटेलचं खाण्यापेक्षा स्वत:ला स्वयंपाक करता येणं चांगलं नाही का?

घरात चहासाठीसुद्धा आई, बहिण, बायको किंवा मुलीवर अवलंबून असणाऱ्या पुरूषांनी फक्त थोडासा विचार करावा कि तुम्हाला जेवू खाऊ घालणाऱ्या ह्या स्त्रियाच जर दुर्दैवाने आजारी पडल्या तर तुम्ही काय कराल?

त्या लहान मुलाच्या व्हिडोवर त्याच्याकडून बालमजूरी करून घेतली जात असल्याच्याही प्रतिक्रिया वाचल्या आहेत. काही जणांनी हे त्याचं खेळण्याचं वय असल्याचं म्हटलं आहे. साधारण ७-८ महिन्यांपूर्वी असाच एका लहान मुलीचा पोळ्या करतानाचा व्हिडीओ प्रसिद्ध झाला होता. त्यावर निदान मी तरी बालमजूरीचा आरोप करणारी किंवा तिला खेळायला पाठवा असं सुचवणारी प्रतिक्रिया वाचली नाही.

No comments:

Post a Comment