Kanchan Karai's personal blog.

© 2020 मृण्मयी is an intellectual property of Kanchan Karai . Powered by Blogger.

क्रूर निरागसता

0 comments
दारावरची घंटी किंवा कडी वाजवून पळून जाणं हा काही लहान मुलांचा आवडता खेळ असतो. ’कोण आलंय’ ते पाहण्यासाठी आपण दार उघडावं तर बाहेर कुणीच उभं दिसत नाही, तेव्हा आपल्या चेहेऱ्यावरचे हावभाव बघून कडी वाजवून भिंतीआड लपलेल्या लहान मुलाची करमणूक होत असते.

एक-दोनदा, फार तर तीनदा हाच प्रकार वारंवार घडला तर एका लहान मुलाने निरागसपणे अनुभवलेली दुसऱ्याची गोंधळलेली अवस्था म्हणून त्याला निरूपद्रवी खेळ म्हणता येईल. लहान मुलाचा व्रात्यपणा बघून आपल्याला हसूदेखील येतं पण प्रत्येक वेळेस दार आपल्यालाच उघडावं लागत असल्याने आपल्यासाठी तो प्रकार पहिल्या वेळेपासूनच खेळ नसतो. कारण दाराची कडी वाजल्यावर त्याकडे दुर्लक्ष करावं तर खरोखरच आपल्याकडे कुणी पाहुणा आला असेल तर तो बाहेरच्या बाहेर निघून जायचा आणि लक्ष द्यावं तर त्या लहान मुलाला उत्तेजन दिल्यासारखं होतं अशी विचित्र परिस्थिती निर्माण होते. वैतागून आपण दार उघडं ठेवतो आणि येणाऱ्या-जाणाऱ्याला आपल्या घरात डोकावण्याची संधी मिळते.

सुदैवाने किंवा दुर्दैवाने म्हणा, कडी वाजवून पळणारा मुलगा रंगेहात सापडला तर आपण ताकीद देऊन त्या मुलाला सोडूनही देतो पण ताकीद दिल्यानंतरही हाच प्रकार वारंवार घडत राहिला, तर मात्र निरागसतेची पायरी ओलांडून क्रूरतेच्या क्षेत्रात पाय ठेवणारा त्याचा खोडकरपणा आपल्या डोक्यात जाऊ लागतो.

ह्या मुलाच्या आईवडिलांकडे तक्रार करायला जावं तर तक्रारीचं कारण आपल्यालाच इतकं बालीश वाटतं कि आधी तक्रार मांडायला तोंड उघडत नाही. त्यातूनही उपद्रव बंद व्हावा म्हणून ते करायचं ठरवलं तरी आपल्याला होणाऱ्या त्रासाकडे पूर्ण दुर्लक्ष करून शेजारी-पाजारी त्या लहान मुलाच्या खोडकरपणाचं कौतुक जास्त करतात. आईवडिल लहान मुलाला तोंडावर दटावतात पण त्यांचे संबंध आपल्याशी तुटक असले तर आपली पाठ वळल्यावर तोंडावर हात ठेवून खुसखुसायला तेही कमी करत नाहीत.

इथे इतर कुणाचं काही जात नसतं. उलट त्यांना एक मनोरंजनाचं साधन उपलब्ध होऊन जातं. त्रास होत असतो आपल्याला आणि वेदनाही त्यालाच कळतात जो ह्यातून गेलाय.

कधी, कधी आपल्याला होत असलेल्या उपद्रवाचं स्वरूप पाहून आपल्याशी कारण-अकारण शत्रुत्व असलेले लोकदेखील तोच मार्ग अवलंबतात. हा सगळा प्रकारच असा आहे कि इथे कायदेशीर यंत्रणादेखील सुरूवातीला तुम्हाला ह्याकडे दुर्लक्ष करायला सांगते. त्यानंतर उपाय म्हणून जे पर्याय सुचवते ते तुमच्या आवाक्याबाहेरचे असतात.

इतकी कुचंबणा झाल्यावर तो लहान व्रात्य मुलगा रस्त्यात एकटा-दुकटा, नाकासमोर सरळ चालत जाताना जरी दिसला तर त्याच्या किमान एकतरी थोतरीत ठेवून द्यावी असा विचार आपल्या मनात साहजिकपणे येतो पण आपल्या वयानुसार आलेल्या परिक्वतेमुळे आपण तेही न करता फक्त एक जळजळीत कटाक्ष देऊन आपण पुढे जातो.

पण समजा आपल्या दारावरची घंटी किंवा कडी कोण वाजवून जातं हे आपल्याला कधी कळलंच नाही तर?

No comments:

Post a Comment