Kanchan Karai's personal blog.

© 2020 मृण्मयी is an intellectual property of Kanchan Karai . Powered by Blogger.

माझं अमूल्य मत

0 comments
रात्री १० च्या दरम्यान दिवसभर शिणलेला देह कधी एकदा बिछान्यावर टाकतो असं झालेलं असताना लोक Whatsapp वर २० मिनिटं पुरून उरेल एवढा लांबलचक लेख "भारत, मोदी, राजकारण, जनता" असल्या विषयांवर शेअर करतात आणि बहुमूल्य, अमूल्य वगैरे मत मागतात.

राजकारण हा आपला प्रांत नाही, हे सांगूनही लेख वाचण्याची विनंती वारंवार केली जाते.

का वाचावा मी तो लेख? मला माझ्या रोजच्या कामांमधून वेळ मिळत नाही आणि फुकटची डोळेदुखी मी का करून घ्यावी? तीही रात्री १० वाजता?

मला कळत नाही, ह्या लोकांना घरात काही कामं नसतात का? सतत राजकारणावरच काय बोलायचं?

नेहमी बड्डे, अ‍ॅनिव्हर्सरी पार्ट्यांचे फोटो टाकतात तसे आपण घरात झाडू कसा मारला, लादी कशी पुसली त्याचे फोटो हे लोक का टाकत नाहीत?

ते नाही तर निदान, टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी जाहिरातीत दाखवतात तेवढं हार्पिक वापरण्याची गरज नसते, ह्यावर ठासून का बोलत नाहीत?

स्लायडिंगच्या खिडक्यांमध्ये साचलेली धूळ व्हॅक्यूम क्लिनरने निघत नाही, त्यासाठी ओला कपडाच फिरवावा लागतो हे सप्रमाण सिद्ध का करत नाहीत?

उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यामध्ये घरात जास्त धूळ येते हे का मान्य करत नाहीत?

राजकारण कळत नाही म्हटल्यावर 😮 असा चेहेरा करतात.

म्हणजे काय?

आता मला राजकारण कळत असतं तर राजकारणातच गेले असते ना! फेसबुकवर कशाला लिहित बसले असते?

बायकोने पानं वाढली तर स्वत: पाण्याचे ग्लास भरण्याची अक्कल नसलेलं रिडिक्युलस पब्लिक! ह्यांची जेवणं झाली कि फेसबुकवर बघतात, कोण दिसलं नाही बरेच दिवस ऑनलाईन? कि चला, त्यांना Whatsapp वर जाऊन पिडून येऊ.

आज डिमॉनेटायझेशनवर बोलतील. कालपर्यंत आपण टॅक्स वाचवण्यासाठी किती टांगा मारल्या ते सांगणार नाहीत. भाजीवाल्याकडे घासाघीस करताना त्यांना शेतकरी आठवत नाहीत.

पेट्रोलचे दर वाढले कि ह्यांना फळफळून रडू येतं. मग नका घेऊ गाड्या. वेळ वाचवायला गाड्या घेतात म्हणावं तर रोजच ट्रॅफिक जाम असतो. मग काय तीर मारतात गाड्या घेऊन? एक टॅक्सीवाला ठरवून ठेवला तर हाच खर्च एक चर्तुर्थांशवर येतो.

लोक तर रस्त्यावर असे खाताना दिसतात कि ह्यांना घरी कोण जेऊ घालतं कि नाही? असा प्रश्न पडतो. म्हणजे बाहेर खादाडी परवडण्याइतके पैसे मिळवत असतात. पुन्हा घरी जाऊन जेवणाच्या भरलेल्या ताटाचे फोटोही पोस्ट करतात. म्हणजे सिलिंडरच्या भाववाढीचा परिणामही नाही.

मग कश्यासाठी इथे रडत असतात? उगीच नकारात्मक वातावरण तयार करायचं?

सिग्नलला थांबणं आणि वयोवृद्धांना रस्ता पार करून देणं झालं कि नागरिक म्हणून कर्तव्यांची इतिश्री होते का?

समजा, दिलंच मी माझं मत राजकारणावर, तर काय फतरे फरक पडतो त्याने? माझं मत एवढं महत्त्वाचं नि उपयुक्त असतं तर मोदींनीच मला बोलावून घेतलं नसतं का खास विमान पाठवून? 🤣

No comments:

Post a comment