Kanchan Karai's personal blog.

© 2020 मृण्मयी is an intellectual property of Kanchan Karai . Powered by Blogger.

भारतीय जीवनशैली आणि वरातीचं कुतूहल

0 comments
भारतीय जीवनशैली और बारात का कुतूहल - हिंदी अनुवाद

लहानपणी घरासमोरच्या रस्त्यावरून अनेक मिरवणूका जाताना बघितल्या. अयप्प्पाची मिरवणूक, साईबाबांची मिरवणूक, गणेशचतुर्थी आणि अनंतचतुर्दशीची मिरवणूक... एक ना दोन! पण तरीही मला लग्नाच्या वरातीचं कायम कुतूहल वाटत आलं होतं. लग्नाचा थाटमाट केला मग वरात तर हवीच! आपापल्या ऐपतीनुसार लोक डि.जे. वरात, बेंजो वरात, नाहीतर नुसतेच ढोल ताशे लावून लग्नाची वरात काढायचे. मला कायम प्रश्न पडायचा कि लग्न हे आयुष्यातलं सर्वोच्च यश असतं का; नाहीतर अश्या प्रकारे वाजत गाजत वरात आणण्याचं प्रयोज काय असावं?तसं पहायला गेलं तर भारतीय संस्कृतीचा विचार करता किमान गेल्या दशकापर्यंत तरी लग्न होणं आणि ते टिकवणं ह्यात बहुतांशी स्त्रियांचा हात जास्त होता असं मला वाटतं. कारण मुलीचं लवकरात लवकर लग्न होणं ही आईवडिलांची इच्छा असे, पुरूष थोराड, बिजवर, कुरूप असला तरी तो पुरूष असतो. त्यामुळे स्त्रीला त्याचं नाव लावून सामाजिक सुरक्षितता मिळते अशी मान्यता होती. तर विवाहितेला ही चिंता असे कि घटस्फोट झाला तर माहेरी कुणी सांभाळणार नाही, समाजात छी थू होईल. त्यामुळे लग्न होणं आणि ते टिकवलं जाणं ही पुरूषापेक्षा स्त्रीची गरज अधीक होती किंवा अधिक करवून दिली गेली होती असं म्हणायला हरकत नाही. मग लग्नाच्या वरात काढून आपण हे सर्वोच्च यश संपादन केलं असं स्त्रियांना सिद्ध करायचं होतं का? तर मला वाटतं, लग्नाच्या वरातीमध्ये प्रत्यक्ष वधूपेक्षाही वराला आणि इतर नातेवाईकांना जास्त रस असे. मग लग्नाची वरात काढून पुरूषाला तरी काय सिद्ध करायचं होतं?

वास्तविक भारतीयांच्या सर्वोच्च यशामध्ये लग्न ह्या गोष्टीचा क्रमांक लागत असलाच तर तो खूप खाली लागतो असं मला वाटतं. कारण शिक्षणात यश संपादन करणं, चांगल्या पगाराची किंवा पदाची नोकरी मिळणं, डोक्यावर कोणत्याही कर्जाचा बोजा नसताना हक्काचं, स्वत:च्या मालकीचं घर असणं ह्या गोष्टींचा सर्वोच्च यशाच्या यादीमध्ये खूप वरचा क्रमांक लागतो हे सामान्य निरीक्षणामधूनही कळतं. मग ह्या गोष्टींमध्ये यश संपादन केलं तर मर्यादित लोकांमध्ये पार्टी दिली जाते पण लग्न केलं तर मात्र शक्य असेल त्याला आमंत्रण देऊन, वरात काढून तो प्रसंग साजरा करण्यासारखं विशेष काय आहे? प्रत्येक पुरूषाला एक स्त्री आणि प्रत्येक मादीला एक नर मिळणारच असतो की!

अनेक वर्ष हा प्रश्न माझा मेंदू पोखरत राहिला. त्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं ते वि.का.राजवाडे यांच्या भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास ह्या पुस्तकामध्ये. विवाहसंस्थेशी निगडित असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मला त्या पुस्तकात मिळाली. आश्चर्य वाटलं नाही. उलट आपण योग्य दिशेने विचार करत होतो ह्याचं समाधान वाटलं. आजच्या काळात जे निंद्य समजलं जाईल ते प्राचीन काळात मान्य होतं पण जसजसा समाज/प्रजा विस्तारत गेली तसतसे नियम काटेकोर होत गेले पण तरीदेखील प्राचीन काळी पाळली गेलेली औपचारिकता मानवाला पूर्णत: पुसून टाकता आलेली नाही. त्यामुळेच लाज्याहोम, सप्तपदी हे उपचार विवाह संपन्न होताना पाळले जातात आणि न्यायालयीन दाव्यांमध्ये विवाहाचं नोंदणीकरण झालेलं नसेल तर ह्याच उपचारांची प्रत्यक्ष विवाहाच्या वेळी काढलेली छायाचित्रं विवाह झाला होता हे सिद्ध करायला उपयोगी पडतात हे एक गंमतीशीर पण विचित्र सत्य आहे. स्वत:ला फेमिनिस्ट समजणाऱ्यांनी आणि न समजणाऱ्यांनीही वाचावं असं हे पुस्तक आहे.

आणखी एक सलणारी गोष्ट आहे, ती म्हणजे मानवाने प्रगती केली तसे नैतिक-अनैतिकतेमधील फरक करणाऱ्या नियमांमध्ये अधिक काटेकोरपणा आणला खरा पण आजचा आपला समाज पुन्हा त्याच जुनाट, पाशवी युगाकडे प्रवास करतो आहे असं वाटत नाही का? लहान बाळांवरील अत्याचार, नात्यांची चाड न ठेवता स्त्री-पुरूषांवर केले जाणारे बलात्कार हे आणखी कशाचं द्योतक आहे?

No comments:

Post a comment