गरब्याच्या रात्रीची एक छान आठवण आहे माझ्याकडे. तेव्हा मी बहुधा चार-पाच वर्षांची असेन. आमच्या कॉलनीत एका बिल्डींगखाली अतिशय शांतपणे गरबा खेळला जायचा. बाबांच्या सायकलवर लहानशी सीट मला किंवा भावाला बसण्यासाठी लावलेली होती. त्या सीटवर बसवून बाबा मला तो गरबा बघण्यासाठी घेऊन गेले होते.
कॉलनीत अजून रस्त्यावरचे दिवे आले नव्हते. त्या इमारतीच्या खालच्या चौकात तेवढ्याच भागापुरती दिव्यांच्या माळांची रोषणाई केलेली असायची. त्याच उजेडात फेर धरून पाच-सहा स्त्रिया गरबा खेळत. बहुधा गाणी देखील त्याच गायच्या. त्या गरब्याचा कोणाला त्रास व्हायचा नाही. उलट तिथलं वातावरण मंत्रमुग्ध करणारं असायचं. अवतीभोवती फार गर्दीही नसायची.
आम्ही थोडा वेळ तो गरबा पाहिला. मग बाबा मला नाक्यावर घेऊन गेले. तिथे हरी ओम् आईसक्रीमवाल्याची गाडी असायची. आम्ही केसर पिस्ता आईसक्रीम पानांमध्ये बांधून घेतलं. घरी आल्यावर आम्ही चौघांनी ते खाल्लं. बास, एवढंच आठवतं.
तो माझ्या आयुष्यातील मी पाहिलेला पहिला गरबा होता. तेव्हा फोटो काढले नव्हते. मोबाईल हा तर शब्दही कोणाला माहित नव्हता पण एवढा प्रसंग आठवताना ती दृश्यं डोळ्यांसमोर स्पष्ट दिसतात.