पूर्वी एक हिंदू स्त्री पाचपेक्षा कमी मुलांना जन्म देत नसे. अगदी माता जिजाऊंनाही संभाजीराजांनंतर चार अपत्ये झाली होती पण दुर्दैवाने ती वाचली नाहीत आणि त्यानंतर जन्मलेल्या त्यांच्या पुत्राने इतिहास घडवला.
त्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती. जे उत्पन्न असे ते कुटुंबाचं मिळून असे. बऱ्याचश्या माताही केवळ गृहिणीधर्माचं पालन करत असल्यामुळे आपल्या मुलांना जास्त वेळ देऊ शकत. आपली मुलं, पुतणे असा भेदही होत नसे. आई-वडिलांइतकाच काका-काकूंचाही प्रेमळ धाक असे.
पण हम दो, हमारे दो च्या बजेटवाल्या काळात आणि विभक्त कुटुंबपद्धतीमध्ये दोन मुलांनतर तिसऱ्या मुलाला जन्म देण्यासाठी शरीर, मन आणि खिसा तिन्ही खंबीर असावे लागतात. कारण नऊ महिने नऊ दिवसांचं गर्भारपण, त्यात स्वत:ची आणि बाळाची काळजी घेण्याची धडपड, नोकरीचा ताण, प्रसूतीवेणा, बाळाच्या जन्मानंतर त्याची काळजी घेणं, रात्रीची जाग्रणं, शरीरात झालेले बदल हे सगळं एकदा नव्हे तर दोनदा करून झालेलं असतं.

दुसरं मूल शाळेत जाऊ लागल्यावर तिसऱ्या मुलाचा विचार करताना पहिल्या दोन मुलांना सांभाळताना उडालेली तारांबळ डोळ्यांसमोर असते. पहिल्या दोन मुलांइतकंच त्याचंही भवितव्य उज्ज्वल व्हावं म्हणून आर्थिक तरतूद करून ठेवल्याशिवाय निर्णय घेता येत नाही. पहिल्या दोन मुलांइतकंच त्याच्याकडेही लक्ष पुरवता येणं आवश्यक असतं.
त्यापलिकडे जाऊन समाजाचाही विचार करावा लागतो. कारण दोन मुलं झाल्यानंतर तिसऱ्याची अपेक्षा कोणी ठेवलेलीच नसते. दैवी आशिर्वादाने जुळी, तिळी मुलं झाल्यानंतर कौतुकाचा वर्षाव होतो पण स्वेच्छेने तिसऱ्या मुलाला जन्म देणाऱ्यांना थट्टा, ‘तिसरं कशाला’ असा तिरकस प्रश्न, टिका, खंवट बोलणं ह्या सगळ्याला सामोरं जावं लागतं.
वास्तविक इथे समाजाची दृष्टी बदलली पाहिजे. एखादं हिंदू कुटुंब दोन मुलांनंतर हट्टाने तिसऱ्या मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेत असेल तर त्याचं स्वागत व्हायला हवं. एक प्रकारे धर्मरक्षणासाठी त्या कुटुंबाने हातभार लावलेला असतो हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवं. उलट, अश्या कुटुंबाना आर्थिक मदतीची आवश्यकता असेल तर तिही मिळायला हवी. एरव्ही मंदिरात केलेला दानधर्म दुसऱ्या पंथाच्या अनुयायांना वापरण्यासाठी मिळतो. त्याऐवजी आपल्या अश्या धर्मबांधवांना थेट मदत केली तर आपल्यालाही पुण्यच लाभेल.