BPO मधील माझ्या एका अनुभवावर काल शेअर केलेल्या लेखावर एका महोदयांनी मला WhatsApp वर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नमस्कार मॅडम, तुमचा ‘नोकरी वाचवणारा screenshot’ हा लेख वाचला. माझ्यावरही हीच वेळ आली होती, पण माझ्याबाबतीत आरोप खोटे आहेत हे दाखवूनही त्याचा उपयोग झाला नाही कारण त्यांना येणकेण प्रकारे मला काढायचेच होते. त्यांचा PIP सुरू होण्याआधी मी मनाविरुद्ध तडजोड करून बाहेर पडलो. वरून चांगुलपणा आणि भरवशाचा देखावा करणारे आतून कसे आहेत ते यावेळी चांगले दिसून आले. असो. या अनुभवाने मला त्रास होण्याऐवजी अजून भक्कम बनवले, त्याबद्दल देवाचे आभार आणि तुम्हाला शुभेच्छा!
माझा अनुभव सोशल मिडीयावर शेअर करताना मी साशंक होते - लोकांना हे माझं रडगाणं वाटू नये अशी इच्छा होती. कारण सोशल मिडीयावर फक्त आपल्या चांगल्याच कामगिरींबद्दल लिहायचं अशी एक अलिखित प्रथा रुढ झाली आहे. खरं तर, प्रत्येकजण बऱ्या-वाईट परिस्थितीमधून गेलेला असतो पण केवळ चांगलेच अनुभव शेअर केल्यामुळे लोकांना हा गोड गैरसमज निर्माण होतो कि ह्यांना कायम यशच मिळतं. पण चकचकाटाच्या मागे असलेला अंधारही आपण पहायला शिकलं पाहिजे.
कोणाच्याही यशाची कहाणी ऐकताना त्याने अपयश कश्या प्रकारे हाताळून पुढे प्रगती केली हे जाणून घेणं जास्त प्रेरणादायी असतं, असं मला वाटतं. समदु:खी मिळाले तर वेदना कमी व्हायला मदत होते. माझा अनुभव शेअर केल्यामुळे किमान एका व्यक्तीच्या मनातून एकटेपणाची, अन्याय सहन केल्याची वेदना कमी व्हायला मदत झाली असेल, मनाचा खंबीरपणा वाढला असेल तर हा अनुभव शेअर करण्यामागचा माझा हेतू सफल झाला असं मी समजते.